नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सुनामी लाटेत उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची काँग्रेस वाहून गेल्या असल्या, तरी त्यांचे जे काही आमदार निवडून आलेत, ते त्यांच्याच पक्षात टिकून राहतील की नाही??, याविषयी आता मुंबईतल्या राजकीय वर्तुळात मोठी शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार निवडून आले आहेत. Sharad Pawar
यापैकी काँग्रेस आणि शिवसेनेचा विषय सध्या बाजूला ठेवून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आलेले 10 आमदार त्यांच्याच बरोबर कायम राहतील का??, असा दाट संशय मुंबईच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. याला कारणेही तशीच आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी पाठोपाठ महाराष्ट्रातल्या 10 मोठ्या महापालिकांच्या निवडणुका जानेवारी किंवा फेब्रुवारीत घेण्याचा घाट नवीन सरकार घालेल, असा राजकीय वर्तुळाचा होरा आहे. अर्थातच मुंबई महापालिकेची निवडणूक इतकी जवळ आली असताना ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेले आमदार मुंबई महापालिकेवर आपले उरलेले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी झटतील. ते शिवसेना स्टाईलचे भावनात्मक राजकारण करून मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करतील. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तशीही आता फारशी जागा उरली नसल्याने त्यांना तिथे लगेच प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत इतक्या लवकर .”भूकंप” होण्याची शक्यता कमी आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बाबतीत मात्र तसे काही दिसत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आमदारांनी त्यांच्याशी राजकीय कारणांसाठी निष्ठा ठेवलीच पाहिजे, असे कारणच आता उरलेले नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात “शरद पवार” नावाचा फॅक्टर आता एवढा घटला आहे की, त्याचा “इम्पॅक्ट नजीकच्या कुठल्या महापालिका निवडणूक मध्ये होऊन सत्तेचे लाभ आपल्याला किंवा आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना मिळतील, असे आकर्षणही आता पवारांनी निवडून आणलेल्या आमदारांना उरलेले नाही.
या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की, शरद पवार यांचे राजकारण मूळातच भावनात्मक आधारापेक्षा व्यवहारी आधारावर जास्त चालते.
एरवी खासदार सुप्रिया सुळे नेहमी आपल्या भाषणात आई वडिलांच्या संस्कारांचा उल्लेख करत असल्या तरी प्रत्यक्षात “सत्तेचा व्यवहार, हाच राष्ट्रवादीचा आधार आणि संस्कार” ही शरद पवारांच्या राजकारणाची गुरुकिल्ली राहिली. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना किंवा नेत्यांना सत्तेची चटक लागली, विरोधी बाक त्यांना बोचू लागले, तर त्यात नवल नाही. विरोधी बाकांवर बसून पुढची 5 वर्षे काढणे हे पवार संस्कारीत आमदारांना शक्य नाही.
त्याउलट अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सत्तेच्या वळचणीला गेले, तर सत्तेचे निदान थोडेफार लाभ तरी पदरात पडतील, असा विचार शरदनिष्ठांनी केल्यास त्यात आश्चर्य नाही. त्यामुळे पवारांनी आपल्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडून आलेले आमदार टप्प्याटप्प्याने अजितदादांच्या सत्तेच्या वळचणीला गेले, तर नवल वाटायला नको. उलट त्यांनी शरद पवारांचे “सत्तेच्या व्यवहाराचे संस्कार” जपले, असेच मानावे लागण्याची शक्यता आहे. मग सुप्रिया सुळे यांचे काय व्हायचे ते होवो, त्याने शरदनिष्ठ आमदारांना फरक पडण्याची शक्यता नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App