विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून वरिष्ठ पातळीवर या निकालाचे विश्लेषण केले जाईल, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या टिळक भवन येथे कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यात नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले म्हणाले, विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून वरिष्ठ पातळीवर या निकालाचे विश्लेषण केले जाईल. परंतु नव्या सरकारने जनतेल्या दिलेली लाडकी बहिण योजना सुरु ठेवावी, शेतकरी कर्जमाफी, शेतीला २४ तास वीज पुरवठा, सोयाबीनला ६ हजार, कापसाला ९ हजार तर धानाला १ हजार रुपये बोनस, एमएसपीपेक्षा कमी भाव मिळाला तर फरकाची रक्कम देणे, तरुणांना नोकऱ्या, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या आश्वासवाची पूर्तता करावी तसेच महाराष्ट्राची संपत्ती विकण्याचे थांबवून राज्याची तिजोरी चांगली करावी, असे नाना पटोले म्हणाले.
निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या सभांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला उलट भाजपा युतीचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेलाही जनतेचा प्रतिसाद मिळत नव्हता अशा परिस्थितीत आलेला निकाल अनपेक्षित वाटतो. या पराभवावर चिंतन करु व जनतेच्या प्रश्नासाठी काम करत राहू असेही नाना पटोले म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App