नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा करिष्मा महाराष्ट्राच्या जनतेने पूर्ण उतरवल्यानंतर त्यांच्या पक्षाला फक्त 10 आमदार निवडून आणता आले. एरवी 50 – 60 आमदार निवडून आणण्याचा “कॉन्फिडन्स” असणाऱ्या पवारांना 2024 च्या निवडणुकीने एकाच झटक्यात खाली आणले. याचा धक्का पवारांना बसण्यापेक्षा पवारनिष्ठ पुरोगामी विचारवंतांना जास्त बसला. त्यामुळे ते दोन महिने हबक्याने गप्प राहिले.
पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताना पवारनिष्ठ विचारवंतांनी पवारांच्या कमबॅकची “विचारवंती” चर्चा सुरू केली. पवार कमबॅक कसा करणार??, त्यांचा पक्ष कसा उभारी घेणार??, त्यांच्या पक्षात कुणाकुणाला म्हणजेच कुठल्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार??, ती संधी मिळताच पवारांचे नवे चेहरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशी राजकीय कमाल करणार??, या प्रश्नांबोवती विचारवंती चर्चा सुरू झाली आहे. पवार म्हणजे राजकीय वातकुकूट, पवारांना राजकारणाच्या दिशेचा अंदाज येतो आणि वाहणारे वारे पटकन समजतात, पवार म्हणजे निवडणुकीतील यशाची खात्री वगैरे समज, गैरसमज आणि अपसमज पवारनिष्ठ विचारवंतांनी आणि विरोधकांनी देखील जोपासले आणि पोसले.
पण 2024 च्या निवडणुकीने पवारांसकट त्यांच्या निष्ठावंत विचारवंतांचे सगळे अंदाज धुळीला मिळवले. खुद्द पवारांसारख्या राजकीय हवामान तज्ञाला आपल्या विरोधात सर्व समाजामध्ये एवढी मोठी लाट आहे, जी आपल्याला धुवून नेणार आहे, याचा अंदाजच आला नाही. खुद्द पवारांना जो अंदाज आला नाही, तो पवारनिष्ठ विचारवंतांना येण्याचे कारण आणि शक्यता नव्हती. पण या सगळ्यामुळे वस्तूस्थिती बदलली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीला जो धडा शिकवायचा, तो मतदारांनी शिकवलाच..
या पार्श्वभूमीवर पवारनिष्ठ विचारवंतांनी जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संस्थांच्या निवडणुकांमध्ये पवारांच्या कमबॅकची “विचारवंती” चर्चा सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात त्यांच्या पक्षातल्या निवडून आलेल्या खासदार आणि आमदारांना राजकीय वास्तवाची जाणीव असल्याने त्यांना प्रत्यक्षात सत्तेच्या वळचणीची आशा लागून राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पवारांच्या पक्षाचे काय व्हायचे ते होऊ दे, त्यांची तुतारी काय वाजायची ती वाजू दे, आपापल्या राजकीय वतनदाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टिकवायच्या असतील, तर भाजपच्या आणि अजितदादांच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव पवारांनी निवडून आणलेल्या 8 खासदार आणि 10 आमदारांना निश्चित झाली आहे, म्हणून तर पवार कुटुंबीयांच्या एकत्रित करण्याच्या चर्चेच्या नावाखाली प्रत्यक्षात काकांच्या पक्षाची पुतण्याच्या पक्षापुढे शरणागतीची तयारी सुरू झाली आहे.
आता या सगळ्यात स्वतः शरद पवार सामील होतील, न होतील, ते राजकीय आयुष्याच्या अखेरीस तत्त्वनिष्ठा दाखवतील किंवा न दाखवतील, पवारांच्या पक्षातले निवडून आलेले खासदार आणि आमदार हे मात्र सत्तेच्या वळचणीला निघून जातील ही पवारांच्याच राजकीय शिकवणीची फलनिष्पत्ती असणार आहे. पण या फलनिष्पत्तीकडे पवारनिष्ठ विचारवंतांचे दुर्लक्ष झाले आहे म्हणूनच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पवार कमबॅक करणार अशी “विचारवंती” चर्चा सुरू करून दिली आहे, जी राजकीय वास्तवाच्या थेट विरोधात गेली आहे. कारण पवार नावाचे राजकीय वातकुकूट महाराष्ट्रातल्या मतदारांनी मोडून काढले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App