महाराष्ट्रात आता साहेब कोण??, असा वाद महायुतीच्या शिंदे – फडणवीस सरकारचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात सुरू झाला आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहोत. त्यामुळे आता आपणच साहेब आहोत, असे वक्तव्य अजितदादांनी केल्याची बातमी आली आणि अजितदादांना प्रत्युत्तर देताना डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रात फक्त दोनच साहेब. एक शरश्चंद्र पवार साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे असे प्रत्युत्तर दिले.
पुणे जिल्ह्यातल्या खेड मध्ये बोलताना अजितदादांनी उमेदवारी कोणाला द्यायची हे आता आपल्याला कोणाला विचारावे लागत नाही आपणच साहेब आहोत असे वक्तव्य केले होते. त्यावर फक्त पक्षाचा अध्यक्ष झाल्याने कोणी साहेब होत नाही महाराष्ट्रात फक्त दोनच आहेत एक शरश्चंद्र पवार साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे असे प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिले होते.
अजितदादांनी स्वतःच स्वतःला “साहेब” म्हणवून घेणे आणि अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर देणे हे वाचायला आणि व्हिडिओ पाहून ऐकायला वरवर ठीक वाटते. पण ते तसे ठीक वाटत असले, तरी ते तेवढे पण “ठीक” नाही. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा निःपक्षपाती विचार केला, तर ते बिलकूलच ठीक नाही, असे मान्य करावे लागेल.
कारण अजितदादा आणि अमोल कोल्हे यांच्यातला “साहेबी” वाद वाटतो तितका उथळ आणि वरवरचा नाही. त्यामध्ये आणि त्यामागे आपणच निर्माण केलेली “साहेबी” वळणाची मक्तेदारी आणि तिचा राजकीय वर्चस्वाचा दर्प आणि अहंकार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बाळासाहेब ठाकरे यांचा उदय होण्यापूर्वी त्यांना “बाळ ठाकरे” म्हणूनच ओळखले जायचे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ओळख होती. बाळासाहेबांच्या राजकीय उदयाच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एकच “साहेब” होते, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. ती त्यांच्या समर्थकांनी केलेली प्रतिमा निर्मिती होती. वास्तविक यशवंतरावांच्या कर्तृत्वाच्या तोडीचे अनेक नेते महाराष्ट्रात होते. मोरारजी देसाई, भाऊसाहेब हिरे, शंकरराव देव, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. विरोधी पक्षात देखील त्यावेळी आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, कृष्णाराव धूळप, रामभाऊ म्हळगी, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे असे दिग्गज नेते होते.
यशवंतरावांचा “साहेबपणा” इंदिरा गांधींनी उतरविला
परंतु यशवंतरावांचे समर्थक फक्त यशवंतरावांचा “साहेब” म्हणून उल्लेख करत आणि बाकीच्यांचे उल्लेख “साहेब” हा त्यांच्या नावातला भाग आहे म्हणून करत असत. यशवंतरावांची केंद्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली कारकीर्द त्यांच्या समर्थकांनी “साहेब” म्हणूनच गाजवली. पण त्यामागे यशवंतरावांचा “साहेबपणा”चा नॅरेटिव्ह चालवायचाच जास्त भाग होता आणि तो इतर कुणीही जाणीवपूर्वक तोडला नाही म्हणून तो तसाच चालू राहिला होता. यशवंतरावांच्या “साहेबपणात” त्यांच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा त्यांच्या स्पर्धकांचे आणि विरोधकांचे नॅरेटिव्ह कमी पडले म्हणून यशवंतरावांचा “साहेबपणा” महाराष्ट्रात चालून गेला, पण दिल्लीत मात्र यशवंतरावांचा “साहेबपणा” इंदिरा गांधींनी पुरता उतरवून ठेवला होता.
Bhagyashree Atram : अजित पवार यांनी मला ज्ञान शिकवू नये, भाग्यश्री आत्राम यांनी थेटच सुनावले
पवारांची रेटून “साहेबी” प्रतिमा
यशवंतरावांचा “साहेबी” वारसा आपोआप शरद पवारांना “साहेबी” स्वरूपात मिळाला. पवारांच्या समर्थकांनी त्यांची छबी महाराष्ट्रात “साहेब” म्हणून चालवत ठेवली. आजही विरोधकांनी जुन्या काँग्रेसी वळणाच्या “साहेबी” नॅरेटिव्ह मधून काही शिकून ते तोडायचा प्रयत्न केलेला दिसत नाही. वास्तविक पवारांच्या कर्तृत्वाच्या तोडीचे किंबहुना त्यांच्याही पेक्षा जास्त कर्तृत्वाचे नेते महाराष्ट्रात तेव्हाही होऊन गेले आणि आजही आहेत. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे हे काही पवारांपेक्षा कर्तृत्वाने फार कमी असणारे नेते नव्हते. शंकरराव चव्हाण तर केंद्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये पवारांना “भारी” ठरलेलेच नेते होते, तरी देखील पवारांच्या समर्थकांनी त्यांची “साहेबी” प्रतिमा महाराष्ट्रात रेटून चालवली, तशी “साहेबी” प्रतिमा शंकरराव चव्हाण विलासराव किंवा सुशील कुमार यांची त्यांच्या समर्थकांनी चालवली नाही म्हणून पवारांची “साहेबी” प्रतिमा महाराष्ट्रात धकून राहिली.
बाळासाहेबांची “साहेबी” प्रतिमा 1990 नंतर जास्त उदयाला आली. त्यापूर्वी त्यांचा उल्लेख काँग्रेस नेते जाणीवपूर्वक “बाळ ठाकरे” असाच करीत होते. “साहेब” फक्त काँग्रेसचेच काही नेते असतात. बाकीच्या पक्षातले नेते “साहेब” होऊ शकत नाहीत, असा त्यामागचा राजकीय दर्प होता. हा इतिहास फारसा जुना नाही. 1995 मध्ये बाळासाहेबांनी पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड काँग्रेसचा पराभव करून दाखवल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना ठाकरेंची “बाळासाहेब” ही प्रतिमा मान्य करावी लागली.
देवरसही “बाळासाहेब”, पण…
भाजप या सगळ्या साहेब प्रतिमा निर्मितीपासून कित्येक मैल दूर होता आणि आहे. मूळात भाजपची संघ संस्कृती “साहेबी” संस्कृतीच्या विरोधात असली तरी, “साहेबी” संस्कृतीला तोड काढण्यात त्यांना यश आलेले नाही. वास्तविक तिसरे सरसंघचालक देवरस देखील “बाळासाहेबाच” होते. पण संघ परिवाराने त्यांची तशी प्रतिमा निर्मिती कितपत केली??, याविषयी दाट शंकाच आहे. वास्तविक वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांपेक्षा संघ परिवार आणि भाजपच्या नेत्यांचे राजकीय कर्तृत्व, राजकीय प्रभाव टप्प्याटप्प्याने कितीतरी वाढत गेलेला दिसतो. त्या तुलनेत त्यांच्या नेत्यांची प्रतिमा निर्मिती मात्र फारच तोकडी पडलेली दिसते. त्या उलट यशवंतराव असतील, पवार असतील किंवा बाकीचे कुठले नेते असतील, त्यांच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा प्रतिमा निर्मिती मोठी हेच चित्र “साहेबी” प्रतिमेतून निर्माण झाले. पण राजकीय कर्तृत्वात कमी पडलेल्या “साहेबांची” प्रतिमा तोडण्याची जबाबदारी आज प्रभावशाली असलेल्या भाजप आणि संघ परिवारावर आहे. पण ती जबाबदारी ते कसोशीने पार पाडत आहेत का??, हा खरा सवाल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more