नाशिक : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीवर मात करण्याच्या जिद्दीने महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या पक्षांची साथ मागितली. या पक्षांनी महाविकास आघाडीला तशी साथ देखील दिली. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला महाविकास आघाडीने महायुतीवर मात करून दाखवली.
पण आता लोकसभा निवडणुकीत यश डोक्यात गेल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी छोट्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत लाथ मारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण विधानसभा निवडणुकीत छोट्या घटक पक्षांना वगळून महाविकास आघाडी परस्पर वाटाघाटी करून जागावाटप करत आहे छोट्या बैठक पक्षांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने महाराष्ट्रात आघाडीकडे विधानसभेच्या 12 जागा मागितले आहेत. परंतु आघाडीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करून परस्पर आपापसांमध्ये वाटाघाटी करून जागा वाटपाच्या अंतिम निर्णयापर्यंत येऊन ठेपले आहेत.
महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संघटन चांगले आहे. विशेषतः शेतकरी आदिवासी आणि कामगार असलेल्या पट्ट्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सामाजिक संघटना मजबूत आहेत. नाशिक पश्चिम, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सोलापूर मध्य, विक्रमगड (पालघर) माजलगाव (बीड), किनवट (नांदेड) अकोले (नगर), पाथरी (परभणी) या विधानसभा मतदारसंघात पक्षाची आणि संघटनांची ताकद चांगली असल्याने या जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने मागितल्या आहेत. परंतु, त्या पक्षाला या जागा सोडणे तर दूरच पवार + ठाकरे + पटोले हे महाविकास आघाडीच्या बैठकांना देखील मार्क्सवादी नेत्यांना बोलवत नाहीत.
Congress : मराठी माध्यमांमधून पवार + ठाकरेंना सहानुभूतीचे चित्र; प्रत्यक्षात काँग्रेसकडेच इच्छुकांचा मोठा ओढा!!
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम मास्तर यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना मनापासून मदत केली. प्रणिती शिंदे सोलापूरातून लोकसभेत पोहोचल्या पण आता विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य मतदारसंघावर आडम मास्तरांनी दावा सांगितल्याबरोबर सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस पक्षाने हात वर केले. सोलापूर मध्य मधून काँग्रेसच्या उमेदवार विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर करून टाकले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते रायगड जिल्ह्यातले नेते जयंत पाटील यांना शरद पवारांनी 12 आमदारांच्या मतांच्या बळावर विधान परिषदेची निवडणूक लढवायला लावली. परंतु उद्धव ठाकरेंनी स्वतःचे पीए मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेवर पाठवताना जयंत पाटलांचा पराभव केला. त्यांना विधान परिषद मिळू दिली नाही. शेकापच्या जयंत पाटलांना पवारांना विधान परिषदेवर निवडून आणता आले नाही. याच जयंत पाटलांची लोकसभा निवडणुकीत पवार आणि ठाकरे यांनी मदत जरूर घेतली, पण त्यांना राजकीय वाटा द्यायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांनी हात आखडता घेतला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी संतप्त
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या या राजकीय वर्तणुकीसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातले नेते उदय नारकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून पवार + ठाकरे आणि पटोल यांचे पुरते वाभाडे काढले. लोकसभा निवडणुकीसाठी या नेत्यांनी परस्पर वाटाघाटी करून जागावाटप करून घेतले आणि नंतर ते आमच्याकडे मदत मागायला आले. महाराष्ट्रात पुरोगामी शक्ती विजय झाल्या पाहिजेत, अशी भावनिक साथ घातली मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने त्यांना तशी साथ दिली. परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र वाटायला हेच नेते कबूल नाहीत. त्यांनी आता परिणामासाठी सिद्ध व्हावे असा गंभीर इशारा उदय नारकर यांनी देऊन पवार आणि काँग्रेसच्या पुरोगामीत्वाची हवा पुरती काढून टाकली.
इशाऱ्याचे गांभीर्य
उदय नारकर यांनी दिलेला हा इशारा पुरेसा गंभीर आहे. कारण लोकसभा निवडणुकीतल्या आकडेवारीने ते नेमकेपणाने सिद्ध केले आहे महायुती आणि महाविकास आघाडीतल्या मतांच्या टक्केवारीतला फरक फक्त 0.17 % आहे. जागांच्या आकडेवारीत तफावत जरी मोठी असली, तरी एकूण मतांच्या संख्येत महायुतीच पुढे आहे त्याचबरोबर टक्केवारीतला फरक 0.17 % एवढाच असल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी शेतकरी कामगार पक्ष यांची मते महाविकास आघाडीकडे वळली होती हे उघडपणे त्यावेळी दिसून आले होते.
परंतु लोकसभा निवडणुकीतले यश डोक्यात गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीत या छोट्या पक्षांना जर महाविकास आघाडीने त्यांचा छोटा वाटा देखील द्यायला नकार दिला, तर छोट्या पक्षांची मते महाविकास आघाडीकडे वळतीलच किंवा छोट्या पक्षांचे नेते महाविकास आघाडीकडे मते वळवू देतीलच, याची अजिबात गॅरंटी नाही. उलट हे नेते त्यांची ताकद असलेल्या मतदारसंघांमधून निवडणूक लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना “राजकीय फाऊल” करण्याचा धोका आहे. आणि नेमका तोच महायुती आणि महाविकास आघाडीतल्या “काँटे की टक्कर” मधला निर्णायक घटक करण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more