मनोज जरांगेंवर “ट्रॅप” लावलाय हे खरे, पण तो लावलाय नेमका कोणी??


मनोज जरांगे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मराठा समाजाला वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून आवाहन करताना एक शब्द नियमित वापरत आहेत, तो म्हणजे मराठा समाजाने सावधान राहावे. त्यांच्यावर ट्रॅप लावण्यात येतो आहे. यातला “ट्रॅप” हा शब्द महत्त्वाचा आहे.MVA and VBA leaders politically trapping manoj jarange by trying to field him in loksabha elections

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आई माई वरून शिवीगाळ करताना मनोज जरांगे यांनी फडणवीसांवरच मराठा समाजावर ट्रॅप लावल्याचा आरोप केला आहे. मराठा समाजाला डिवचायचे. दंगल घडवून आणायची आणि नंतर कायद्याच्या कचाट्यात अडकवायचे. गुन्हे दाखल करायचे, हा ट्रॅप फडणवीस यांनी लावल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीतून या ट्रॅप विषयी जे काही असेल, ते सत्य बाहेर येईलच. ते सत्य कोर्टात मांडून त्याची शहानिशा देखील केली जाईल. त्यावेळी देखील मनोज जरांगे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल.



पण मनोज जरांगे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्रॅप लावला की नाही त्याचा खरे – खोटेपणा नंतर सिद्ध होईल, पण त्याआधीच मनोज जरांगे यांच्यावर एक राजकीय ट्रॅप लावण्यात येतोय, हे मात्र निश्चित… आणि हा ट्रॅप दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून महाविकास आघाडीतले नेतेच लावत असल्याचे गेल्या दोन-तीन दिवसांपासून उघड होत चालले आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते मनोज जरांगे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा आग्रह धरीत आहेत, आज तर त्यांना राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील उघड पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तसा कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचे सांगून त्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले आहे. …आणि नेमका हाच तो मनोज जरांगे यांच्यावर लावलेला “राजकीय ट्रॅप” आहे, तो नेमका समजून घेण्याची गरज आहे.

मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन जोपर्यंत “प्रायमाफेसी” म्हणजे सकृतदर्शनी अराजकीय होते, तोपर्यंत जरांगेंना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत होता. त्यांच्या लाखा – लाखांच्या सभा सगळ्याच राजकीय नेत्यांच्या विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या पोटात गोळा आणत होत्या. मनोज जरांगे ही महाराष्ट्रातील मोठी अराजकीय ताकद निर्माण होत असल्याचा आभास तयार होत होता. मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाच्या ताकदीतून शिंदे – फडणवीस सरकारला वाकविले. ते दररोज आपल्या मागण्या बदलत होते आणि वाढवत होते, तरी देखील शिंदे – फडणवीस सरकार त्या मागण्या मान्य करत होते. मोठमोठे मंत्री, अधिकारी अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांच्या नाकदुऱ्या काढत होते. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत होते.

मराठा आंदोलनाचा तो चढता काळ होता. त्यामुळे मनोज जरांगे हे मराठा समाजाचे तारणहार नेते असल्याचा आभास निर्माण झाला होता. ही ताकद कुठल्याच राजकीय पक्षाच्या मराठा नेत्याला कमवता आलेली नव्हती. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष मनोज जरांगे यांच्या विषयी बोलताना जपून बोलत होते. बचावात्मक पवित्र्यात प्रतिक्रिया व्यक्त करत होते. जोपर्यंत मनोज जरांगे यांचे आंदोलन मराठा आरक्षण केंद्रित होते, तोपर्यंत त्यांची ताकद आणि त्याचा आभास फार मोठा होता.

पण चारच दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची भाषा घसरली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्व पक्षांच्या एकमताने मराठा आरक्षण मंजूर होऊन देखील त्यांनी ते मान्य केले नाही. उलट आपली सगेसोयरे वगैरे भाषा वापरून शिंदे – फडणवीस सरकारला पूर्ण घेरून टाकले. पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई माईवरून शिवीगाळ केली. तिथेच मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्याला लागलेला राजकीय डाग ठळक झाला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलना मागची सगळी इंगिते टप्प्याटप्प्याने बाहेर येऊ लागली. त्यांच्या आंदोलनामागे शरद पवारांची राष्ट्रवादी असल्याचे बोलले जातच होतेच. भुजबळांनी तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान फक्त एकाच पक्षाच्या नेत्यांना गाव बंदीतून वगळले असल्याचे उघड्यावर आणले होते. त्यानंतर मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना देखील शिवीगाळ केली होती. त्यांना सातत्याने टार्गेट वरच ठेवले होते. भुजबळांपाठोपाठ त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही आई माई वरून शिव्या दिल्यानंतर मात्र मनोज जरांगे हे प्रकरण फारच चिघळल्याचे महाराष्ट्राला दिसले. तिथेच मोठी “खटकी” पडली आणि मनोज जरांगे महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर आले. त्यांच्याविरुद्ध एसआयटी चौकशी लागली. मनोज जरांगेंना एक पाऊल मागे घ्यावे लागले. टप्प्याटप्प्याने आक्रमक भाषेत मनोज जरंगे मागे जात असल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.

 निवडणुकीच्या ट्रॅप

…आणि तेवढ्यातच मनोज जरांगेंवर आता एक ट्रॅप लावला जातो आहे. मनोज जरांगे यांना महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणे हा तो ट्रॅप आहे. मनोज जरांगे यांना अराजकीय आंदोलनातून जेवढा पाठिंबा मिळाला तेवढ्या पाठिंबा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होताच घटणार आहे, हे महाराष्ट्रातले उघड राजकीय सत्य आहे. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांची नुकतीच मागासवर्गीय आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी लक्षात घेतली, तर महाराष्ट्रात मराठा समाज 32 % नव्हे, तर 28 % आहे हे स्पष्ट झाले आहे. तो 28% समाज देखील संपूर्णपणे मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहे असा दावा करणे कठीण आहे.

त्यातही जेव्हा मनोज जरांगे आक्रस्ताळी भाषा वापरत राहतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश सावंतांसारखे नेते आणि कार्यकर्ते ब्राह्मणांसारख्या एका समाजाला संपवण्याची भाषा करतील, त्यावेळी मनोज जरांगेंचा पाठिंबा दिवसेंदिवस घटत जाईल.

पत्रकार परिषदांमध्ये आक्रस्ताळी भाषा वापरणे निराळे, नेत्यांना अरे तुरे करून शिवीगाळ करणे निराळे, कुठल्यातरी बड्या नेत्याच्या नादी लागून त्याच्या पैशाने आंदोलन चालविणे निराळे आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात येऊन विशिष्ट जातीच्या मतांची टक्केवारी ओलांडून निवडणुकीत जिंकून येणे निराळे!! या सगळ्या पूर्णपणे भिन्न बाबी आहेत. निवडणुकीत जिंकून येण्यासाठी मतांच्या टक्केवारीचे बेरजेचे राजकारण करणे ही सगळ्यात गंभीर बाब आहे. कुठल्याही विशिष्ट समाजाच्या आंदोलनातून निवडणुकीचा फड जिंकण्याच्या टक्केवारीची संपूर्ण बेगमी करणे फार अवघड आहे.

याचा सरळ साध्या सोप्या शब्दांमध्ये अर्थ असा की मनोज जरांगे हे जर निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीकडून उतरले, तर त्यांना विशिष्ट टक्क्यांमध्ये मते जरूर मिळतील. ती कुठल्याही निवडणुकीतल्या बलाढ्य अपक्ष उमेदवारापेक्षा जास्तही असतील, पण ती विजयासाठी पुरेशी ठरतीलच याची कोणतीही शाश्वती नाही. किंबहुना मनोज जरांगे यांच्या बाजूने जर मराठा समाजाच्या मतांच्या टक्केवारीचे ध्रुवीकरण झाले, तर त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने बाकी सर्व समाजांच्या मतांचे ध्रुवीकरण होणे अपरिहार्य ठरणार आहे आणि इथेच खरी निवडणुकीची राजकीय मेख दडली आहे. बहुमत हे नेहमी शांत पाण्यासारखे असते. ते कधीच “उथळ पाण्याला खळखळाट फार” असे नसते. भारतीय मतदार शांतपणे त्याला हवे ते परिवर्तन घडवतो त्यासाठी तो उगाच आदळआपट करत नाही, हा गेल्या 70 वर्षांचा इतिहास आहे.

मनोज जरांगे यांनी हे नेमकेपणाने समजून घेण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या ट्रॅपमध्ये न अडकण्यासाठी त्यांची खरी बौद्धिक कसोटी लागणार आहे. आपण अराजकीय राहूनच आपली मतांच्या टक्केवारीची झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची, की ती उघड करून 12 आण्याची दाखवायची, हे मनोज जणांचे हातात आहे!!

 प्रकाश आंबेडकर – राजू शेट्टी

मनोज जरांगे यांच्या उमेदवारीची शिफारस आणि तरफदारी करणारे नेते प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी हे महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुकीत स्वबळावर लोकसभेत पोहोचलेले नेते नाहीत. प्रकाश आंबेडकर हे अखंड काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर शरद पवारांच्या पाठिंब्याने लोकसभेत पोहोचले होते, तर राजू शेट्टी हे भाजपच्या पाठिंब्याने लोकसभेत पोहोचले होते. त्यांनी भाजपला दूर सारल्यानंतर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर ते लोकसभा निवडणुकीत उतरले होते. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता, हा इतिहास पाच वर्षांपूर्वीचा आहे.

 आमरस पुरी पचली नाही

राजू शेट्टींना शरद पवारांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीचा शब्द दिला होता. राजू शेट्टींनी शरद पवारांच्या गोविंद बागेत जाऊन त्यांच्याबरोबर आमरस पुरीचे जेवण घेतले होते, पण ते आमरस पुरीचे जेवण त्यांना राजकीय दृष्ट्या पचले नाही. राजू शेट्टींना दिलेल्या आमदारकीचा शब्द शरद पवारांना अद्याप पुरा करता आलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या आग्रहाने आणि पाठिंब्यावर महाविकास आघाडीचा उमेदवार व्हायचे की नाही??, हे ठरवावे लागेल. यासाठी त्यांना बाकी कुठली आंदोलनाची किंवा आक्रस्ताळी भाषा उपयोगी ठरणार नाही. त्यासाठी शांत आणि थंड डोक्याने विचार करूनच त्यांना निर्णय घ्यावा लागेल!!

MVA and VBA leaders politically trapping manoj jarange by trying to field him in loksabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात