मातोश्रीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठली. गांधी परिवाराची भेट घेतली. बाकीच्या काँग्रेस नेत्यांशी वाटाघाटी केल्या. विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा या दोन मागण्या केल्या. पण काँग्रेस नेत्यांनी या दोन्ही मागण्या नाकारल्या. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या चुका दाखवून दिल्या. वगैरे बातम्या गेल्या तीन दिवसांत महाराष्ट्रात गाजल्या. भाजपच्या नेत्यांनी त्यावर टीकाटिपण्या केल्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यांनी त्यांचे कार्यक्रम सुरू ठेवले. Congress central leaders never relented in front pawar and thackeray
पण उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात झालेल्या फलनिष्पत्तीच्या बातम्यांमुळे वर उल्लेख केलेला सवाल तयार झाला. विधानसभा निवडणुकीत अखंड राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या नंतरही शरद पवारांना न बधणारे काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिष्टाईपुढे नमतील का??, हा तो सवाल आहे. त्याचे उत्तर नजीकच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात दडले आहे.
त्याचे झाले असे :
पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच विधानसभा निवडणुकीत 2004 मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी करत 71 जागा मिळवल्या. काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. संख्याबळाच्या आधारावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. काँग्रेसला राष्ट्रवादीचा तो मुख्यमंत्रीपदावरचा दावा मान्य करणे देखील भाग होते. सत्तेत राहायचे असेल, तर दुसरा पर्याय नाही, हे काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आलेही होते.
परंतु शरद पवार नेमक्या त्याच वेळी तिहेरी खोऱ्यात अडकले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा, तर नेमकी कुणाला संधी द्यायची?? आणि ती संधी एखाद्या नेत्याला दिली, तर दुसरे नेते नाराज होऊन राष्ट्रवादीत फूट पडून दुसरा गट काँग्रेसची हातमिळवणी करणार नाही कशावरून??, ही भीती त्यांना वाटली. त्यावेळी त्यांच्या गाठीशी आधीच “सुधाकरराव नाईक प्रयोगा”चा नकारात्मक अनुभव होताच. सुधाकरराव नाईक यांना आपण मुख्यमंत्री करून देखील नंतर वर्षा दीड वर्षातच त्यांनी आपले ऐकणे सोडून दिले. आपल्याच पप्पू कलाने आणि हितेंद्र ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांना तुरुंगात घातले. दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांचे आपल्या विरोधात सुधाकरराव नाईक यांना आशीर्वाद होते, हे पवार विसरले नव्हते. एकीकडे काँग्रेस नेत्यांची ताणून धरण्याची कपॅसिटी जास्त. दिल्लीतले प्रणव मुखर्जी अहमद पटेल यांच्यासारखे मुत्सद्दी आपल्याला भारी, दुसरीकडे आपल्या पक्षाला जास्त जागा मिळूनही पक्ष फुटीची भीती आणि तिसरीकडे काँग्रेसने तेच राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी पुरवठा करत असलेले राजकीय इंधन या तिहेरी कोंडीत पवार सापडले होते.
परंतु, वस्तुस्थिती मात्र काँग्रेसचे नेते पवारांपुढे बधले नव्हते आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर घसरून देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडले नव्हते, हीच होती!!
आता जर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर घसरून देखील काँग्रेसचे नेते पवारांना बधले नाहीत, तर पवारांच्या तुलनेत दिल्लीच्या राजकारणात खूपच नवख्या असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पुढे काँग्रेसचे नेते नमतील, ही शक्यता तरी होती का?? हा सवाल आहे. …आणि याचे उत्तर “बिलकुल नाही” याच शब्दांमध्ये अप्रत्यक्षरीत्या मिळाले.
पवार तरी दिल्ली आणि मुंबईतल्या राजकारणात उद्धव ठाकरे पेक्षा जास्त मुरलेले नेते होते. पण काँग्रेस नेत्यांपुढे त्यांची कधीच डाळ शिजली नाही. काँग्रेस पुढे त्यांना कायम दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. मग भले त्यांच्या निष्ठावंत माध्यमांनी त्यांच्या मुत्सद्देगिरीचे कितीही “डेकोरेशन” करो, त्यामुळे काँग्रेस वरचढ असणे आणि पवार दुय्यम भूमिकेत राहणे ही वस्तुस्थिती कधी बदलली नाही.
त्यामुळे शरद पवारांच्या तुलनेत दिल्लीच्या राजकारणात नवख्या असलेल्या उद्धव ठाकरेंची शिष्टाई दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेत्यांपुढे चालली नाही यात फार काही विशेष घडले नाही. तसेही 2024 लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सच्या आधारे काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आणि पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वरचष्मा राहणार हे उघड आहे. म्हणूनच पवारांनी चतुराईने धारावी – अदानी मुद्द्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्यावर गळ टाकून ठेवला आहे. ते निवडणुकीनंतर वेगळा मार्ग होईल अवलंबू शकतात असे त्यांनी सूचक पद्धतीने दाखवूनच दिले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिष्टाई कामी येणारच असेल तर ती विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या मुद्द्यावर येण्याची शक्यता नसून काँग्रेस बरोबर किमान समान कार्यक्रमाच्या आधारे एकत्र येण्यास बरोबरीचे किंवा जवळपासचे स्थान मिळण्यातच होण्याची शक्यता आहे त्यापलीकडे ठाकरेंची शिष्टाई कामी येण्याची शक्यता नाही.
यात उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांपुढे कमी पडले वगैरे वर्णन बातम्यांमधून करण्यात मतलब नाही. कारण पवारांसकट कुठलेच मराठी प्रादेशिक नेते केव्हाच काँग्रेस नेत्यांपुढे मर्यादा ओलांडून वरचढ ठरल्याचे उदाहरण नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more