गण्या, आपलं आभाळ वाकलं रे कसं…??; “पंतप्रधानांचे मार्गदर्शक” ते “राजकीय याचक”; ५० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचे १८० अंशांतले वळण…!!

शरद पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील ED ची कारवाई रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे काहींचे म्हणणे आहे. ते तसे गेलेले असोत किंवा सहकारी बँकांच्या माना रिझर्व्ह बँकेच्या कचाट्यातून सोडवायची मागणी घेऊन मोदींकडे गेलेले असोत. शीर्षकात काढलेला निष्कर्ष बदलत नाही… “महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकत नाही हा इतिहास आहे,” हे पवारांच्या ट्विटर हँडलवर लिहिलेले ब्रीदवाक्य आहे. ते आता राष्ट्रवादीचे नेते बदलतील काय…?? कारण तो “इतिहास” खराच आहे… पण राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांचे “वर्तमान” काहीतरी वेगळं सांगतंय…!!Sharad Pawar`s political role has changed in 180 degree; from modi`s political guru to political petitioner??


५० मिनिटांची भेट;१० – १२ तास चर्चेच्या वावड्या; पण अधिकृत निष्कर्ष “शून्य”… असा कालच्या दिवसभराच्या बातम्यांच्या रतीबाचा अर्थ लावता येऊ शकेल. पण हा अर्थ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. त्याच्याही पलिकडचा अर्थ त्यात नक्कीच दडलेला आहे आणि तो दुसऱ्या कुणी नाही, तर राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांनी उलगडून सांगितला आहे…

तो म्हणजे “शरद पवार साहेबांची भूमिका आता १८० अंशांमध्ये बदललेली आहे…!! “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शक – राजकीय गुरू ते मोदींकडे विशिष्ट मागण्या घेऊन जाणारे राजकीय याचक”… अशी शरद पवारांची १८० अंशांमध्ये भूमिका बदलली आहे.अर्थात वर उल्लेख केलेल्या शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रवक्ते नबाब मलिक यांनी शरद पवारांच्या बदलेल्या भूमिकेचे वर्णन केलेले नाही. त्यांनी फक्त शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचे कारण सांगितले होते, ते म्हणजे सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने जे निर्बंध लावले आहेत, ते हटविण्याच्या मागणीसाठी शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याचे जयंत पाटील आणि नबाब मलिक यांनी सांगितले.

या दोन नेत्यांच्या वक्तव्यातून “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शक ते मोदींकडे विशिष्ट मागण्या घेऊन जाणारे राजकीय याचक”… अशी शरद पवारांची भूमिका बदलली आहे. हा मी काढलेला राजकीय निष्कर्ष आहे.

आता हेच पाहा ना… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या संबंधांविषयी कालची भेट होईपर्यंत राष्ट्रवादीचे नेते काय म्हणत असत…?? की शरद पवार हे मोदींपेक्षा ज्येष्ठ नेते आहेत. मोदी साहेब हे पवार साहेबांचे नेहमी मार्गदर्शन घेत असतात. विविध विषयांवरचा पवार साहेबांचा राजकीय अनुभव मोठा आहे. या अनुभवाचा लाभ पवार साहेब हे मोदी साहेबांना नेहमी करून देत असतात.

वगैरे वक्तव्य़े नेहमीच करीत होते ना…!! बरं फक्त राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेच अशी वक्तव्ये करीत होते असे नाही, तर अगदी शरद पवारांचे आमदार नातू रोहित पवार देखील अनेकदा महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना खिजवण्यासाठी शरद पवार हे मोदींचे कसे “मार्गदर्शक” आहेत, याच्या डिंग्या मारतच होते ना…!!

पण कालच्या सकाळच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषा “बदलेली” दिसली. त्यामध्ये कुठेही “मोदींचे राजकीय गुरू”, “मार्गदर्शक, “पवारांचा मोठा राजकीय अनुभव”, “५० वर्षांची त्यांची संसदीय कारकीर्द” असे शब्द नव्हते. रोहित पवारांची तर कालच्या भेटीवर प्रतिक्रिया आल्याचेही पाहायला मिळाले नाही.

मग याचा अर्थ असा काढायचा का…?? की शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्गदर्शन करून संपले आहे. जे काही मार्गदर्शन करायचे होते, ते करून झाले आहे आणि आता मार्गदर्शन करण्यासाठी पवारांकडे कोणताही विषय उरलेला नाही…?? की असा अर्थ काढायचा की मोदींचे पवारांकडून पुरेसे राजकारण शिकून झाले आहे… आता पवारांच्या बारामती कॉलेजमधली त्यांची कोणतीही राजकीय डिग्री घ्यायची राहिलेली नाही…??

की असा अर्थ काढायचा, पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष सहकारी बँकांच्या विषयावर एवढे अडचणीत आले आहेत, की त्यातून सोडविण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, हे पुरते पवारांना कळून चुकले आहे म्हणून पवार हे मोदींना ५० मिनिटे भेटले…?? की तुम्ही मोदींना भेटू शकता तर मी देखील मोदींना भेटू शकतो, हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना दाखवून देण्यासाठी पवार मोदींना भेटले…??

या पैकी कोणतीही कारणे खरी मानली तरी त्यातून अर्थ तोच निघतो, की पवारांची राजकीय भूमिका आता १८० अंशांत बदलेली आहे. ती आता “मोदींचे मार्गदर्शक ते मोदींकडे काही विशिष्ट मागण्या घेऊन भेटणारे राजकीय याचक” अशी बनली आहे.

शिवाय शरद पवारांचे political interest चे विषय देखील सहकार क्षेत्राच्या अवतीभवतीच फिरत राहिलेले आहे. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेली पत्रे याची साक्ष देतात. ऊस उत्पादकांचे प्रश्न, सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न, बिल्डर आणि आता सहकारी बँकांवरील रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाचा प्रश्न या महत्त्वाच्या विषयांवर पवारांनी साधारण गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रे लिहिली आहेत.

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारचे ते जनक आहेत. त्याच्या यशापयशाविषयी त्यांनी कधी मोदींना पत्र लिहिल्याचे दिसले नाही. राज्यातल्या सरकारच्या कामगिरीची जबाबदारी कधी घेतलेली दिसली नाही.

आपण नेमलेले राष्ट्रवादीचे मंत्री अडचणीत आले. तरीही त्यांच्या पाठीशी पवार ठाम उभे राहिल्याचे दिसलेले नाही. आपल्याला न आलेल्या ED च्या नोटीशीवरून त्यांनी पुरेपूर राजकारण करून घेतले. पण ED ने अजितदादांच्या नातेवाईकाच्या कंपनीच्या ताब्यातल्या कारखान्यावर जप्ती आणली तेव्हा ती कारवाई रोखायला शरद पवार पुढे सरसावल्याचे दिसले नाही. आपणच नेमलेल्या गृहमंत्री अनिल देशमुखांची ३०० कोटींची मालमत्ता ED ने जप्त केली तेव्हाही शरद पवार आक्रमक झालेले दिसले नाहीत.

पण काल ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना ५० मिनिटे भेटले. ते सहकारी बँकांच्या विषयाबाबत भेटल्याचे अधिकृतरित्या सांगितले गेले. त्यामागचे राजकीय इंगित अनेकांनी आपापल्या वकूबानुसार “बाहेर काढून” दाखविले.

काहींनी ED च्या कारवाईने राष्ट्रवादीचे नेते जेरीस आले आहेत. त्या कारवाया रोखण्यासाठी पवार हे मोदींना भेटल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे देखील खरे मानले तरी देखील वर काढलेला निष्कर्षच खरा ठरतो. की पवारांची भूमिका ही राजकीय याचकाची बनली आहे…!!

म्हणजे पवार हे आपल्या सहकार्यांवरील ED ची कारवाई रोखायला गेलेले असोत किंवा सहकारी बँकांच्या माना रिझर्व्ह बँकेच्या कचाट्यातून सोडवायची मागणी घेऊन गेलेले असोत. वर काढलेला निष्कर्ष बदलत नाही… “महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकत नाही हा इतिहास आहे,” हे शरद पवारांच्या ट्विटर हँडलवर लिहिलेले ब्रीदवाक्य आता राष्ट्रवादीचे नेते बदलतील काय…?? कारण तो “इतिहास” खराच आहे… पण राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांचे “वर्तमान” काहीतरी वेगळं सांगतंय…!!

Sharad Pawar`s political role has changed in 180 degree; from modi`s political guru to political petitioner??

महत्त्वाच्या बातम्या