स्वातंत्र्यवीर सावरकरांची “आयडिया ऑफ इंडिया” स्थापित होतेय म्हणून लेफ्ट लिबरल्सची पोटदुखी वाढलीय का…??

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून त्यांच्यावरती बौद्धिक टीका करणाऱ्यांचा आक्षेप प्रामुख्याने त्यांच्या भारत विषयक संकल्पनेबद्दल असतो. मोदी विरोधकांची भारत विषयक कल्पना ही पंडित नेहरूंच्या “आयडिया ऑफ इंडिया” या संकल्पनेशी संलग्न आहे.Pt. Nehru`s Idea of India vs Veer Savarkar`s Idea of India; left liberals narrative is being defeated

पण पंडित जवाहरलाल नेहरू हे काही एकमेव नेते नव्हेत, की ज्यांनी “आयडिया ऑफ इंडिया” ही संकल्पना मांडली. असे अनेक नेते आहेत ज्यांनी आपल्या मनातला भारत कसा असेल?, अर्थात त्यांची स्वतःची “आयडिया ऑफ इंडिया” मांडली. यापैकीच एक महत्त्वाचे नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.सावरकरांनी सुद्धा “आयडिया ऑफ इंडिया” मांडली होती. ही आयडिया ते १९२३ पासून मांडत होते. पण 1965 मध्ये दिल्लीच्या ऑर्गनायझर या नियतकालिकाच्या दिवाळी अंकासाठी श्रीधर तेलकर दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली “आयडिया ऑफ इंडिया” अधिक ठळकपणे आणि कालसुसंगत मांडलेली आढळते.

सावरकरांची ही मुलाखत त्या वेळी खूप गाजली होती. सावरकरांचे चरित्रकार विक्रम संपत यांनी सावरकर चरित्राच्या दुसऱ्या खंडात तिचा विस्तृत परामर्श घेतला आहे. कारण पंडित नेहरुंच्या “आयडिया ऑफ इंडिया” पेक्षा सावरकरांची “आयडिया ऑफ इंडिया” मूलतः भिन्न होती. पण लोकशाहीची संकल्पना दोन्ही नेत्यांनी मांडल्याचे साम्य येथे दिसून येते. अर्थात लोकशाही विषयक संकल्पनांमध्ये देखील दोन्ही नेत्यांचे काही मतभेद दर्शविते.

सावरकरांनी मांडलेल्या “आयडिया ऑफ इंडिया”मध्ये कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला कोणतीही विशेष सवलत देण्यात आलेली नाही अथवा नाकारण्यात आलेली नाही. सावरकर त्याला “परफेक्ट इक्वलिटी” असे नाव देतात. भारतातल्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला “परफेक्ट इक्वलिटी”ने वागविण्यात येईल. कोणालाही कोणतीही विशेष सवलत देण्यात येणार नाही. प्रत्येकाचे वैयक्तिक धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक भाषिक स्वातंत्र्य जपले जाईल. पण कोणालाही एकमेकांवर अतिक्रमण करू दिले जाणार नाही, हे ते स्पष्ट करतात.

स्वतःच्या हिंदू राष्ट्रवादाविषयी देखील त्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत. हिंदू राष्ट्रवादी व्यक्ती फॅसिस्ट असल्याचे ते संपूर्णपणे नाकारतात. उलट हिंदू राष्ट्रवाद हा ते लोकशाही संकल्पनेशी जोडतात. लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला एक मत ही संकल्पना ते आग्रहाने प्रतिपादन करतात. लोकशाहीचे हक्क एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाहीत. तर देशहिताशी संलग्न आहेत. या देशहिताशी कोणीही कोणतीही तडजोड करता कामा नये हे ते स्पष्टपणाने बजावतात.

हिंदूंना ते विशेष सवलती मागत नाहीत. त्याचबरोबर मुसलमानांनाही विशेष सवलती देण्यास त्यांचा विरोध आहे. हा विरोध धार्मिक दृष्टीकोनातून नसून लोकशाही विषयक दृष्टिकोनातून आलेला आहे. इथेच त्यांचे पंडित नेहरुंच्या “आयडिया ऑफ इंडिया”शी मतभेद आहेत. कोणालाही विशेष सवलती धर्माच्या, लिंगाच्या, पंथाच्या आधारावर देणार नाही हा त्यांचा आग्रह पंडित नेहरूंच्या “आयडिया ऑफ इंडिया”शी विसंगत आहे. पंडित नेहरूंच्या “आयडिया ऑफ इंडिया”मध्ये उदारमतवाद असला तरी या उदारमतवादाचा गैरफायदा भारतातील अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांनी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र विषयक धोरणात पंडित नेहरूंच्या “आयडिया ऑफ इंडिया”ने अनेक समस्या निर्माण करून ठेवल्या. पंडित नेहरूंच्या “आयडिया ऑफ इंडिया”मध्ये बहुविध संस्कृती, गंगाजमनी तहजीब वगैरे बाबी प्रामुख्याने दिसत असल्या तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्यातून मुस्लिम वर्चस्ववाद आढळतो.

अशा प्रकारचा धार्मिक-सांस्कृतिक मुस्लिम वर्चस्ववाद सावरकरांच्या “आयडिया ऑफ इंडिया”मध्ये नाही. त्यांना हिंदूंचा वर्चस्ववादही धार्मिक पद्धतीने अभिप्रेत नाही. तर जागतिक स्पर्धेत आपला देश टिकला पाहिजे आणि देशाची शक्ती वर्धिष्णू असली पाहिजे, हा सावरकरांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर सावरकरांची “आयडिया ऑफ इंडिया” वेगळी ठरते. सावरकर हिंदू राष्ट्रवादी असले तरी सावरकरांचे Nation – State धर्माच्या आधारावर चालणारे नाही. ते आधुनिक लोकशाहीच्या आधारावरच आणि राज्य घटनेच्या चौकटीतच चालणारे आहे. ही राज्यघटना कोणत्याही धर्मपीठाची नव्हे, तर आधुनिक लोकशाहीची तत्त्वे मानणारी आहे. ही गोष्ट त्यांनी स्वतःच त्या ऑर्गनायझरच्या मुलाखतीत स्पष्ट केली आहे.

ही सावरकरांची “आयडिया ऑफ इंडिया” सध्याच्या लेफ्ट लिबरल्सना खटकतेय. कारण ती त्यांच्या नॅरेटिव्हला सूट होत नाही. भारत एक प्रबळ देश असल्याची संकल्पनाच लेफ्ट लिबरल्सना मान्य नाही. भारत हा अनेक राष्ट्रकांचा समूह आहे. त्याच्यात अखंडतेची बीजे नाही, ही लेफ्ट लिबरल्सची वर्षानुवर्षांची मांडणी आहे. तिला सावरकरांच्या “आयडिया ऑफ इंडिया”तून धक्का बसतोय.

२०१४ नंतर लेफ्ट लिबरल्स फक्त सत्तेतून हटले नाहीत, तर त्यांच्या वैचारिक वर्चस्वाला देखील ओहोटी लागलेली आहे. इथेच सावरकरांची “आयडिया ऑफ इंडिया” पुढे सरकली आहे आणि त्यातून लेफ्ट लिबरल्सची खरी पोटदुखी वाढली आहे.

Pt. Nehru`s Idea of India vs Veer Savarkar`s Idea of India; left liberals narrative is being defeated

महत्त्वाच्या बातम्या