विनायक ढेरे
नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे विश्वासू सचिवआणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींचे विचक्षण साक्षीदार राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. Narasimha rao OSD Ram Khandekar is no more
अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाच्या राम खांडेकरांना दिल्लीतल्या राजकीय जीवनाचा ४० हून अधिक वर्षांचा जवळून अनुभव होता. स्व. यशवंतराव चव्हाणांपासून ते नरसिंह रावांपर्यंत दिल्लीतल्या दिग्गजांचे राजकारण अतिशय जवळून पाहण्याची त्यांना संधी मिळाली. यशवंतराव चव्हाणांचे स्टेनो म्हणून त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला होता. त्यानंतर दीर्घकाळ यशवंतरावांचे पीए. मधल्या काळात मोहन धारियांचे पीए, वसंत साठे यांचे पीए असे काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
पी. व्ही. नरसिंह राव हे केंद्रीय मंत्री ते पंतप्रधान असताना त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत ते त्यांचे विश्वासू सहायक म्हणून वावरले. नरसिंहरावांच्या वैयक्तिक जीवनापासून ते राजकीय जीवनापर्यंतचे अनेक पैलू त्यांना जवळून पाहाता आले. या अनुभवाविषयी त्यांनी वृत्तपत्रीय लेखन देखील केले. त्याचेच पुढे सत्तेच्या पडछायेत हे पुस्तक झाले. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणाचा एक मोठा पट उलगडून दाखविणारा तो एक दस्तऐवज ठरला आहे.
कोणताही अभिनिवेश न बाळगता राम खांडेकरांनी “दिल्ली” मांडली आहे. दिल्लीचे रिपोर्टिंग करणाऱ्यांसाठी तर तो एक लखलखीत आरसा आहे. त्या आरशात आपल्या रिपोर्टिंगचे प्रतिबिंब पाहिले, तर अनेक दिल्लीकर बातमीदारांना आणि मीडियाच्या प्रतिनिधींना आपण किती तोकडे आहोत, याचे खरेखुरे दर्शन घडेल.
राम खांडेकरांनी सत्तेच्या पडछायेत लिहिलेय, की “दिल्लीत जेवढे घडते, त्याच्या ५ टक्केच भाग बाहेर समजतो.” आणि “नरसिंह रावांना आव्हान देणाऱ्या काही नेत्यांना वाटत होते, आपण बारा गावचे पाणी प्यायलो आहोत. पण त्यांना हे माहिती नव्हते, की नरसिंह राव बारा देशांचे पाणी प्यायले होते.” या दोनच विधानांमधले between the lines कितीतरी मोठे राजकारण समजावून सांगतात. महाराष्ट्रातल्या तथाकथित बड्या नेत्यांचे राजकीय अधुरेपण अधोरेखित करतात.
-व्यक्तिगत आठवण
नरसिंह रावांचा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरूभाऊ लिमये यांचा पत्रव्यवहार झाला होता. पुण्याला आल्यावर केसरी कार्यालयात येऊन भेटण्याचे पत्र नरसिंह रावांनी नरूभाऊंना लिहिले होते. पण नरसिंह रावांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच नरूभाऊंचे निधन झाले होते. त्यामुळे ती भेट होऊ शकली नव्हती.
कराडच्या साहित्य संमेलानाचे उद्घाटन करून नरसिंह राव हे काही वेळ पुण्यात मोहन धारियांकडे आले होते. त्यावेळी मोजक्या पत्रकारांसमवेत त्यांना भेटण्याची आणि अनौपचारिक गप्पा मारण्याची संधी मला मिळाली होती. त्यावेळी राम खांडेकरांची भेट झाली होती.
त्यानंतर एकदम सत्तेच्या पडछायेतला कॉलम लोकसत्तेत सुरू झाल्यानंतर मी त्यांच्याशी इमेल द्वारे पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी त्यांना धारियांच्या घरी झालेल्या भेटीची आणि केसरीचे दिल्ली प्रतिनिधी शैलेन चटर्जी यांची आठवण करून दिली होती. त्यावर माझ्या पत्राला राम खांडेकरांनी सविस्तर उत्तर पाठवून नरसिंह रावांच्या आठवणीही शेअर केल्या होत्या. सत्तेच्या पडछायेतला दुसरा भाग लिहिण्याचाही त्यांचा मनसूबा होता. पण त्यांच्या निधनाने हे सगळे राहुन गेले आहे… दिल्लीतल्या सत्तेच्या सारीपाटाचा दुसरा भाग तसाच बंद अवस्थेत राहणार आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App