“अदानी असता तर एका रात्रीत प्रश्न सुटले असते”; आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

विशेष प्रतिनिधी

पुणे : हिंजवडीतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि रखडलेल्या मेट्रो प्रकल्पावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. हिंजवडीच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला. नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगत, ‘तुमचं नाव अदानी असतं तर एका रात्रीत प्रश्न मिटले असते,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांची पाहणी केल्यानंतर रविवारी (२५ ऑक्टोबर) आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ६ सप्टेंबर रोजी आयटी कर्मचारी आणि नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ४२६ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. केवळ निधी जाहीर करून चालणार नाही, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या रखडलेल्या उद्घाटनावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. जुलैपासून मेट्रो सुरू होण्याच्या तारखा ऐकायला मिळत आहेत. आता नोव्हेंबरची तारीख समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्षात मेट्रो सुरू होण्याचे नाव घेत नाही, असे ते म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष म्हणजे दुर्लक्ष म्हणायचं का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आयटी कर्मचाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना केवळ उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मेट्रो सेवा रखडवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.


 


राज्यभर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू असून, ती अदानी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार राज्याचे वाळवंट करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

टोरेंट पॉवर कंपनीचा कर्जतमधील प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात असेल, तर सरकारने त्याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘३०० कोटी वृक्ष लागवड करणार अशी घोषणा केली होती. कुठे आहेत ही झाडं? ऑनलाइन झाडं लावली का?’ असा सवाल करत त्यांनी सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणावर टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (२६ ऑक्टोबर) कर्जत परिसरातील जंगलतोडीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या परिसराला भेट देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्याचा मुद्दाही उपस्थित करत राज्यातील पर्यावरण संवर्धनाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
एकीकडे नागरिक पाणी, रस्ते आणि वाहतूक कोंडीसारख्या मूलभूत समस्यांशी झुंज देत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या औद्योगिक आणि खासगी प्रकल्पांसाठी सरकार तत्परता दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘If your name were Adani, problems would be solved overnight’: Aaditya Thackeray slams government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात