येवल्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाची कसोटी; भुजबळांनी कोणते निर्देश दिले?

येवला मतदारसंघातील पाणीपुरवठा, वीज आणि विकासकामांचा आढावा

विशेष प्रतिनिधी

नाशिक : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, तसेच येवला मतदारसंघातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

येवला येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह महसूल, पोलीस, कृषी, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी, बोअरवेल आणि अन्य पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.



दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या उपाययोजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतिमान ठेवावी. पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना वेळीच राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन

दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले. वनविभागाच्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी नियमानुसार चारा लागवडीची शक्यता तपासावी. आवश्यक नियम आणि परवानग्यांच्या अधीन राहून मेंढपाळ तसेच चराऊ जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, असे भुजबळ यांनी सांगितले.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा

बैठकीत येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली रेट्रोफिटिंगची कामे आणि अन्य प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करा

येवला आणि निफाड तालुक्यांतील शेती तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.

वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे शेतकरी आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी. प्रलंबित तक्रारींचा निपटारा करून वीजपुरवठा नियमित ठेवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रस्ते, घरकुल आणि नदी संवर्धनाच्या कामांना गती

बैठकीत विविध पायाभूत सुविधा आणि नागरी विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये लासलगाव येथील घरकुल आवास योजना, शहरातील कचरा डेपोसाठी पर्यायी जागा निश्चित करणे, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्ता, लासलगाव-विंचूर चौपदरी रस्ता आणि खेडलेझुंगे येथील काँक्रीट रस्त्याच्या कामांचा समावेश होता.

राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव येथील शीव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धनाच्या कामांचीही माहिती घेण्यात आली. संबंधित कामांतील प्रलंबित बाबींची पूर्तता करून विकासकामांना गती द्यावी आणि नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.

प्रशासनाला समन्वयाने काम करण्याच्या सूचना

दुष्काळी परिस्थितीतील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासोबतच मतदारसंघातील पाणीपुरवठा, वीज आणि पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंत्री भुजबळ यांनी अधोरेखित केले. सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडताना परस्पर समन्वय राखावा आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीला येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Administration faces a test in preventing water scarcity in Yeola; what instructions did Bhujbal give?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात