महाराष्ट्रातील तरुणांसाठी परदेशात नोकरीची संधी! ‘जीएसएमएआय’सोबत करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य; फडणवीसांची घोषणा

महिमा उपक्रमातून जागतिक रोजगाराचे दरवाजे उघडणार; कौशल्य प्रशिक्षण, परदेशी भाषा आणि आर्थिक सहाय्यावर भर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया (जीएसएमएआय) सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या सहकार्यामुळे राज्यातील युवकांना परदेशात रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत असताना महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय रोजगाराशी जोडणे आवश्यक आहे. राज्यातील दुर्गम भागातील युवक-युवतींनाही परदेशात करिअर घडविण्याची संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षणासोबत आर्थिक सहाय्य आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘महिमा’ उपक्रमातून जागतिक रोजगाराची संधी

महाराष्ट्र शासनाने परदेशातील रोजगाराच्या संधी सुलभ करण्यासाठी ‘महिमा’ अर्थात महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन केली आहे. कलम ८ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील मनुष्यबळाची मागणी आणि राज्यातील युवकांची कौशल्ये यांच्यात समन्वय साधला जाणार आहे.

प्रत्येक देशातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राच्या गरजांचा अभ्यास करून जिल्हास्तरावरील युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी उद्योग भागीदार, आंतरराष्ट्रीय नियोक्ता नेटवर्क, भरती व्यवस्था आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये समन्वय वाढविण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षणासोबत परदेशी भाषा, सांस्कृतिक समज आणि रोजगार मिळाल्यानंतर आवश्यक सहकार्यावरही भर दिला जाणार आहे.

‘जीएसएमएआय’ची स्थापना; जागतिक रोजगारासाठी पुढाकार

नवी दिल्लीतील आयटीसी मौर्या येथे १२ ऑक्टोबर रोजी ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडियाची औपचारिक स्थापना करण्यात आली. जागतिक मनुष्यबळ गतिशीलतेमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी १७ संस्थापक संस्थांसह सरकारी प्रतिनिधी, राजनैतिक दूतावास, राज्य सरकारे आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणण्यात आले.

या कार्यक्रमाला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, खासदार शशांक मणी, डेन्मार्कचे भारतातील राजदूत रास्मस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन, जर्मनीचे उपराजदूत जॉर्ज एन्झवायलर, इटलीच्या दूतावासाच्या उपप्रमुख ऑरोरा रुसी, महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या हस्ते संस्थेच्या लोगोचे आणि वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. जागतिक स्तरावर काम करण्याची संधी ही केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून, तरुणांना नवीन अनुभव मिळविण्याची, कौशल्ये आत्मसात करण्याची आणि भारताच्या विकासात योगदान देण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.



उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षणावर भर

‘स्थानिक कौशल्य, जागतिक महत्त्वाकांक्षा’ या विषयावर झालेल्या परिसंवादात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी जागतिक रोजगारासाठी भारतीय युवकांना तयार करण्याबाबत चर्चा केली. कौशल्य विकास, उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण, भाषेचे ज्ञान, सांस्कृतिक समज आणि रोजगारानंतरचे सहकार्य हे आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी महत्त्वाचे घटक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

‘जीएसएमएआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना यांनी जागतिक रोजगारासाठी विश्वासार्ह मार्ग निर्माण करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या कौशल्य विकास व्यवस्थेला बळ

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील युवकांना जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जीएसएमएआय’च्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या कौशल्य विकास व्यवस्थेचा आणि आंतरराष्ट्रीय रोजगार क्षेत्राचा दुवा अधिक मजबूत होईल. जागतिक गरजांनुसार प्रशिक्षित झालेल्या युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यास मदत होईल. या अनुभवाचा आणि कौशल्यांचा उपयोग देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीही होऊ शकेल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

राज्यात १,००० हून अधिक आयटीआय

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या कौशल्य विकास परिसंस्थेत १,००० हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १,८०० हून अधिक तांत्रिक शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ तयार करण्याची मोठी क्षमता राज्याकडे आहे.

या यंत्रणेचा उपयोग करून महाराष्ट्रातील युवकांना परदेशातील रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या कौशल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणे आणि रोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हे ‘महिमा’ उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Job opportunities abroad for the youth of Maharashtra

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात