विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या सचिवपदाबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी मुंढे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरू असताना, आपल्यासोबत अद्याप अधिकृत पत्रव्यवहार किंवा अधिसूचना जारी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या विषयावर तोंडी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ही भूमिका मांडली. एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान या समितीच्या सचिवपदी मुंढे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
‘अधिकृत आदेश येईपर्यंत बोलणं योग्य नाही’
एमपीएससी चौकशी समितीबाबत विचारले असता तुकाराम मुंढे म्हणाले की, त्यांच्याकडे अद्याप कोणतेही अधिकृत नोटिफिकेशन आलेले नाही. या विषयावर काही चर्चा झाली आहे; मात्र अधिकृत पत्रव्यवहार झालेला नसल्याने सध्या याबाबत अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
या संदर्भात तोंडी संवाद झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, नेमकी कोणाशी चर्चा झाली, हे उघड करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे समितीच्या सचिवपदाबाबत अधिकृत आदेश किंवा अधिसूचना जारी झाल्यानंतरच नियुक्तीची स्थिती स्पष्ट होणार आहे.
एमपीएससीच्या जुन्या कागदपत्रांबाबत काय म्हणाले?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जुनी कागदपत्रे रद्दी करून नष्ट करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर टीका केल्यानंतर आयोगाने निर्णय मागे घेतल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला.
यावर तुकाराम मुंढे यांनी हा प्रश्न एमपीएससीला विचारणे आवश्यक असल्याचे सांगितले. या विषयाची आपल्याकडे माहिती नसल्याचे आणि त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही आपल्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सेफ फूड, सेफ ड्रग्स’ अभियानाची माहिती
दरम्यान, पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग्स’ अभियानाची माहिती दिली. राज्यात अन्नपदार्थ आणि औषधांच्या सुरक्षिततेसाठी विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी अनुपालन आदेश जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. कृत्रिम रंगांचा अनधिकृत वापर, अर्क काढलेले मसाले आणि मसाल्यांमधील भेसळ यांना प्रतिबंध घालण्यावर भर देण्यात आला आहे.
हळद, मिरची, दालचिनी, काळीमिरी आणि खसखस यांसह विविध मसाले व मसाल्यांच्या उत्पादनांचा या आदेशांत समावेश असल्याचे मुंढे यांनी सांगितले. मसाल्यांचे उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांना या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App