विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि सुपरस्टार आमिर खानचा भाचा इम्रान खान याला २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रान खानवर ही कारवाई करण्यात आली आहे. इम्रान हा अमेरिकन नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणामुळे परदेशी नागरिकांचे भारतातील राजकीय आंदोलनातील सहभागाचे अधिकार आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी यांवर चर्चा सुरू झाली आहे.
आंदोलनातील सहभागानंतर नोटीस
१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इम्रान खान या ठिकाणी पोहोचला होता. त्याच्यासोबत त्याची जोडीदार आणि अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन तसेच त्याची चुलत बहीण झेन मेरी खानही उपस्थित होती.
आंदोलनाच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी इम्रान खानसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर काही तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. मात्र, आंदोलनाच्या आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पण त्यावर उत्तर मिळाले नसल्याचा दावा केला होता.
या घटनेनंतर इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. इम्रानने आंदोलनात सहभागी होऊन परदेशी नागरिकांच्या वास्तव्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या कारवाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे.
किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळे वळण
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी इम्रान खानच्या आंदोलनातील सहभागावर आक्षेप घेत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. इम्रान हा अमेरिकन नागरिक असल्याचा दावा करत त्याच्या नागरिकत्वाची आणि ओसीआय कार्डसंबंधीच्या नियमांची तपासणी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली होती.
परदेशी नागरिकाला भारतातील राजकीय आंदोलनात सहभागी होता येते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी इम्रान खानवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्याला भारतातून हद्दपार करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संबंधित प्रकरण परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाकडे (FRRO) पाठवल्याचे वृत्त आहे. त्यानंतर इम्रानला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली.
इम्रान खानची भूमिका काय?
आंदोलनाच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खानने आपण कोणत्याही राजकीय संघटनेचे प्रतिनिधित्व करत नसून मुंबईचा रहिवासी म्हणून तेथे आल्याचे सांगितले होते. लोकांच्या हालचालींच्या स्वातंत्र्यावर निर्बंध का घातले जात आहेत आणि नागरिकांचा आवाज का दाबला जात आहे, हे समजून घेण्यासाठी आपण आंदोलनाच्या ठिकाणी आल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
इम्रानच्या या भूमिकेनंतरही त्याच्या आंदोलनातील सहभागावरून वाद निर्माण झाला. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीमुळे प्रकरणाला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आणि आता भारत सोडण्याच्या नोटिशीमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ओसीआय कार्डधारकांना राजकीय अधिकार कितपत?
ओसीआय कार्ड हे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना भारतात दीर्घकाळ वास्तव्यासह काही विशेष सुविधा उपलब्ध करून देते. मात्र, ओसीआय कार्डधारकांना भारतीय नागरिकत्व मिळत नाही. त्यांना मतदान करणे किंवा संसद आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका लढवणे यांसारखे राजकीय अधिकार प्राप्त होत नाहीत.
मात्र, केवळ सार्वजनिक आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ओसीआय कार्डधारकाला आपोआप भारतातून हद्दपार करता येते का, हा स्वतंत्र कायदेशीर प्रश्न आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ओसीआय नियमांमध्ये सार्वजनिक आंदोलनाला उपस्थित राहण्यासंबंधी सर्व कार्डधारकांसाठी स्पष्टपणे पूर्वपरवानगीची सार्वत्रिक अट नमूद केलेली नाही. संबंधित प्रकरणात कोणत्या विशिष्ट कायदेशीर तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे, हे नोटिशीतील तपशील आणि सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयावर अवलंबून असेल. दरम्यान, इम्रान खानला २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त असून, या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App