विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यासह विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. “दुष्काळ जाहीर करावा, ही आजची गरज आहे. तो आपोआपच जाहीर होईल,” असे भरणे यांनी सांगितले.
कृषी आणि महसूल विभागाकडून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली जाणार असून, आपण स्वतः पाच ते सहा जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे भरणे यांनी सांगितले. पावसाच्या कमतरतेमुळे पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
महिला शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र पोर्टल सुरू
महिलांना शेतकरी म्हणून ओळख देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा दावा कृषीमंत्री भरणे यांनी केला. अनेक महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा नसतो. मात्र, त्या प्रत्यक्ष शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करीत असतात. अशा महिलांसाठी शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून पात्र महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. त्यामुळे सातबाऱ्यावर नाव नसलेल्या, पण शेती व्यवसायात सहभागी असलेल्या महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
चारा छावण्यांबाबतही विचार
राज्यातील शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत भरणे यांनी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास चारा छावण्यांबाबतही विचार केला जाईल. पशुधन आणि दुग्ध व्यवसायासंदर्भातील निर्णय दिवाळीच्या आसपास घेतला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पावसाच्या कमतरतेमुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पीक नुकसानीचे मूल्यांकन करून त्यानुसार मदत आणि इतर उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
५० हजार रुपयांच्या अनुदानाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने
राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली. या योजनेसाठी अंदाजे ४० हजार ८८५ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. कर्जमाफी आणि अनुदानासंदर्भात शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटनांचे रास्तारोको आंदोलन
दरम्यान, पावसाअभावी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते.
कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा आणि गावनिहाय पीक कापणी प्रयोग घेण्यात यावेत, अशा मागण्याही करण्यात आल्या.
पावसाची स्थिती, पीक नुकसानीचा अहवाल आणि संबंधित विभागांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे दुष्काळाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App