विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांच्यात झालेल्या कथित शाब्दिक वादाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. दीपके यांच्या वर्तनावर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तातडीने काढून घेण्याची मागणी केली आहे.
दीपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कारवाई न झाल्यास दीपके यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासह राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांसमोर निदर्शने करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
7 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील दीपके यांच्या निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. दीपके यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते येत असल्याने त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप दीपके यांनी केला.
याच मुद्द्यावरून दीपके आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. दीपके यांनी “मी कुणाला भेटायचे हे पोलीस ठरवणार नाहीत,” अशी भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्याला त्यांचे पद आणि पोलीस ठाण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्याला घराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचेही सांगण्यात येते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. दीपके यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाचा फेरविचार करून ते तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
असोसिएशनचे प्रतिनिधी शंकर दरांगे यांनी या प्रकाराची पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबळे यांनीही कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अपमान किंवा त्यांना धमकावण्याचा प्रकार सहन केला जाणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणात कारवाई न झाल्यास राज्यातील विविध पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याची भूमिका घेतली जाईल, असेही संघटनेकडून सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App