विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांच्या (मार्ड) आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे. राज्य सरकारसोबत बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र राज्यने 6 ऑगस्टपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. शासनाने मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी अधिकृत निर्णय न झाल्याने आंदोलन मागे घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला.
बुधवारी सेंट्रल मार्ड आणि बीएमसी मार्डच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव, वैद्यकीय शिक्षण आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निबंधकांसोबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे, मुख्य समन्वयक डॉ. विनायक शहा आणि बीएमसी मार्डचे सरचिटणीस डॉ. शंकर जगताप यांनी निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या आणि आंदोलनामागील कारणे शासनासमोर मांडली.
शासनाने मार्डच्या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेतल्याचे सांगत, हा विषय तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. काही मुद्दे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांचा कायदेशीर चौकटीत विचार सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांबाबत कोणतीही ठोस घोषणा न झाल्याने आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मार्डने स्पष्ट केले की, आंदोलन सुरू असले तरी रुग्णहिताला प्राधान्य दिले जाईल. अतिदक्षता विभाग (ICU), अपघात विभाग, आपत्कालीन सेवा आणि गंभीर रुग्णांवरील उपचार पूर्ववत सुरू राहतील. वरिष्ठ डॉक्टरांकडून अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, संपाचा परिणाम नियमित ओपीडी सेवांवर दिसून येत असला तरी रुग्णसेवा पूर्णपणे ठप्प झालेली नाही. जे. जे. रुग्णालयात 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत 1,333 रुग्णांची नोंद झाली. या कालावधीत 12 आयपीडी रुग्ण दाखल झाले, 39 रुग्णांवर कॅज्युअल्टीमध्ये उपचार करण्यात आले, तर 4 मोठ्या आणि 10 लहान शस्त्रक्रिया पार पडल्या. आयसीयूमध्ये 87 रुग्ण उपचाराधीन होते, तर बायोकेमिस्ट्री विभागात 512 तपासण्या करण्यात आल्या.
नायर रुग्णालयात सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत 432 नवीन आणि 700 जुने असे एकूण 1,132 रुग्णांची ओपीडी तपासणी झाली. याशिवाय 11 मोठ्या, 18 लहान शस्त्रक्रिया आणि दोन सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या. कूपर रुग्णालयात चार प्रसूती, आठ मोठ्या आणि पाच लहान शस्त्रक्रिया पार पडल्या. रुग्णालयातील 124 प्राध्यापकांपैकी 118 जण उपस्थित होते. मात्र, 175 निवासी डॉक्टरांपैकी नियमित सेवेसाठी केवळ पाच डॉक्टर उपस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून नोंदणी देण्याचा निर्णय. या निर्णयासाठी इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन (IDA) अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होती. अखेर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने CCMP पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी सुरू केली आणि डॉ. नेहा पवार यांना पहिले नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर आयडीएच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
मात्र, मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. CCMP केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत नोंदणी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते, असा त्यांचा दावा आहे. तसेच यामुळे आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या व्यावसायिक अधिकारांवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे, आयडीएचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. योगेश भालेराव यांनी या निर्णयाचे स्वागत करत, ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल तसेच अनेक डॉक्टरांना कायदेशीर मान्यता मिळाल्याने दिलासा मिळेल, असे सांगितले.
सेंट्रल मार्डने स्पष्ट केले आहे की, शासनाकडून निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर अधिकृत आणि समाधानकारक निर्णय होईपर्यंत राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत आणि राज्यातील सर्व स्थानिक मार्ड युनिट्ससाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, नागरिकांनी नियमित ओपीडीसाठी संबंधित रुग्णालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, अत्यावश्यक आणि गंभीर रुग्णांसाठी आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहतील, असे मार्डने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App