विशेष प्रतिनिधी
मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. सर्वच पक्षांनी मन मोठे करून त्यांना पाठिंबा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पोटनिवडणुकीची आठवण काढत, ती निवडणूक देखील बिनविरोध केली असल्याचे सांगितले. CM Fadnavis
या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सुनेत्रा पवारांनी शिवसेनेचा पाठिंबा मागितला
या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.
सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार देणारच
काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि रणनीती यावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App