विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य परिवहन मंडळामध्ये लवकरच 17 हजार 742 पदांची कंत्राटी भरती करण्यात येणार असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने 8300 बस गाड्या येणार असल्याने ही भरती करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. मुंबईत लवकरच 30 स्लीपिंग कोच बसेस आणि 170 बैठ्या खुर्च्यांच्या वोल्वो गाड्या दाखवतील, असेही ते म्हणाले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास
त्याआधी प्रताप सरनाईक यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आज विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
– कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका
एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी तसेच काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज सकारात्मक चर्चा केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हीच महामंडळाची भूमिका आहे. कर्मचारी संघटनांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत एस.टी. प्रशासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याची महामंडळाची भूमिका आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. त्यामुळे एस.टी. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सामोपचाराने तोडगा काढावा, असे निर्देश दिले.
– बदल्या करायचेही आदेश
विधानभवनातील दालनात झालेल्या या बैठकीत एस.टी. महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक व प्रवासी तसेच कर्मचारी हिताचे करण्यावर विशेष भर देण्यात आला. एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश एस.टी. प्रशासनाला दिले. या संदर्भात कर्मचारी संघटनांच्या भावना तीव्र असून, या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App