नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षातून हाकालपट्टी केलेले नाशिक मधले नेते सुधाकर बडगुजर यांची भाजप मधली संभाव्य एन्ट्री म्हणजे आपल्या पुढच्या राजकारणाला धोका आहे हे ओळखून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घ्यायला विरोध केलाय. Sudhakar badgujar
सुधाकर बडगुजर यांचे गँगस्टर दाऊद इब्राहिमचा म्होरक्या सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध एकूण 17 गुन्ह्यांची यादी सीमा हिरे यांनी आज जाहीरपणे पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी देखील सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा एकत्रित फोटो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया हँडल वरून शेअर केला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्याला भाजपमध्ये प्रवेश मिळणे कठीण असल्याची अटकळ राजकीय निरीक्षकांनी बांधलीय.
ठाकरे गटात आपली घुसमट होत होती. पक्ष वाढवण्यासाठी काम करण्यासारखे काही नव्हतेच. पक्षात अधिकारी मिळत नव्हते, अशा तक्रारी बडगुजर यांनी करून पक्ष सोडण्याची तयारी केलीच होती पण त्यापूर्वीच संजय राऊत यांचा नाशिक दौरा झाला. त्या पाठोपाठ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी देखील झाली. Sudhakar badgujar
– नाशिक पश्चिमची लढत
याच सुधाकर बडगुजर यांना आमदार सीमा हिरे यांनी सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिनकर अण्णा पाटलांनी भाजपकडे तिकीट मागितले होते पण भाजपने नाशिक पश्चिम मधून भाकरी न फिरवता सीमा हिरे यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यामुळे दिनकर अण्णा पाटलांनी ऐनवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून तिकीट मिळवले. त्यांनी नाशिक पश्चिम मतदार संघात तब्बल 46 हजार 669 मते मिळवली. सीमा हिरे यांच्या मताधिक्यात मोठी सेंधमारी केली. सुधाकर बडगुजर यांनी उभाठा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून 73 हजार 548 मते मिळवली. सीमा हिरे यांना एक लाख 41 हजार 725 मते मिळाले त्यांच्या मतांची टक्केवारी 51.27% राहिली. मतांच्या आकडेवारीच्या हिशेबात बोलायचे झाले तर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आले, तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपची टक्केवारी 70 – 72% पर्यंत जाते. पण राजकारणातले गणित फक्त असे आकडेवारीतल्या बेरीज वजाबाकीत नसते.
– सीमा हिरे यांचे हिशेब
सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये होणारी संभाव्य एन्ट्री हा सीमा हिरे यांना आपल्या भविष्यातल्या राजकारणासाठी धोका वाटतो म्हणूनच त्यांनी बडगुजर यांच्या एंट्रीला जाहीरपणे विरोध केला. भाजप मधली निर्णय स्थानिक पातळीवरून होण्यापेक्षा प्रदेश किंवा केंद्रीय पातळीवरून होतात हे माहिती असून देखील सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या विरोधात सुरुवातीपासूनच रणशिंग फुंकले. यामध्ये त्यांच्या वैयक्तिक राजकारणाच्या हिशेबाबरोबरच नाशिक महापालिकेच्या राजकारणाचा हिशेबही गुंतला आहे. म्हणूनच सीमा हिरे यांनी नाशिक महापालिकेतल्या कंत्राटांमध्ये सुधाकर बडगुजर करत असलेले हेराफेरीचा विषय पत्रकार परिषदेत काढला. बडगुजर यांचा मुलगा कंत्राटासाठी अर्ज भरतो आणि अर्ज मागे घेताना तोडपाणी करतो, असा आरोप सीमा हिरे यांनी केला.
– वेगळाच डाव?
सीमा हिरे यांनी जाहीरपणे विरोध करून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप मधल्या संभाव्य एन्ट्रीत सुरुवातीलाच खोडा घातला असला, तरी भाजपचे प्रदेश पातळीवरचे नेते आणि केंद्रीय पातळीवरचे नेते कोणता हिशेब करतात आणि सुधाकर बडगुजर यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देतील की आणखी कुठली वेगळीच राजकीय खेळी करतील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App