विशेष प्रतिनिधी
पुणे : Mohan Bhagwat धर्म म्हणजे केवळ पूजा नाही. सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या यातून धर्माची मूल्ये पुढे आली आहेत. त्यामुळे “हे खा”, “ते खा” किंवा “ते खाऊ नका”, “शिवू नका”, हे सांगणे म्हणजे धर्म नाही. हिंदू धर्म हे नाव नाही, तर एका विचाराने जगणारे आणि सर्वांना स्वीकारणारे ते एक उदात्त विशेषण आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.
‘साप्ताहिक विवेक’ आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने डॉ. मिलिंद पराडकर लिखित ‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्रीमंत राजश्री बाबाजी राजेसाहेब भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाश संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात आदी या वेळी उपस्थित होते. हिंदवी राष्ट्रीय प्रेरणा या ग्रंथ प्रकल्पाचे या वेळी उद्घाटन झाले.
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन
आणखी वाचा-विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत
‘जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. सत्ययुगापासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहिली आहे. यालाच हिंदू प्रेरणा असे म्हटले जाते. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही, तर सर्व समाजाचे रूप दर्शविणारे विशेषण आहे. सर्व विविधतांना स्वीकारणारे तो उदात्त भाव आहे,’ असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
‘तंजावरमधील मराठ्यांचा इतिहास हा एका घराण्याचा इतिहास नाही,’ असे बाबाजीराजे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘तंजावरमध्ये केवळ भोसलेच नाही, तर डोंगरे, केसरकर, कुलकर्णी, महाडिक, गाडे आदी आडनावांची घराणी आहेत, ज्यांचे मूळ महाराष्ट्रात आहे. हा केवळ एका घराण्याचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाचा इतिहास आहे. महाराष्ट्र आणि तंजावरचा संबंध वाढायला हवा.’
‘भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भाने तंजावरचा अधिक अभ्यास व्हायला हवा,’ असे मत लेखक डॉ. मिलिंद पराडकर यांनी व्यक्त केले. साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविक केले.
भारतावर हजारो वाटांनी अतिक्रमण
धर्मप्राय देशाचा धागा एकतेचा आहे. सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे. हिंदू हा गौरव आहे. मात्र, पत्ता लागू न देता, हजारो वाटांनी त्यावर अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध बाबींचे असून, ते देशासाठी घातक आहे. भारत देश मोठा झाला, तर राजकीय दुकान बंद होईल, ही भीती या अतिक्रमणामागे आहे. अस्तित्व टिकविण्यासाठी राष्ट्र किंवा राज्य निर्माण झालेले नाही. ते चोहोबाजूंनी सुरक्षित असून, समृद्ध आहे. इस्लामी आक्रमणाचे स्वरूप लक्षात न आल्याने अनेक दैदिप्यमान संघर्ष विफल झाले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा उपाय लागू पडला. त्याचीच प्रेरणा घेऊन राजस्थानमध्ये भारत दुर्गादास राठोड, छत्रसाल अशा अनेकांनी संघर्ष केला. अगदी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यातही शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App