विशेष प्रतिनिधी
मुंबई ५ लोकसभेला अनपेक्षित यश मिळालेल्या काँग्रेसने विधानसभेसाठी मविआमध्ये ११५ जागा खेचण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार गट १२१ जागांवर दावा करणार आहे. उद्धवसेनेचा आकडाही १२०चा आहे. शरद पवार गटाने २०१९ मध्ये १२१ जागा लढल्या होत्या. त्याच ठिकाणी ताकद दाखवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यात्रेची अधिकृत घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने राज्यात जनसंवाद यात्रा काढण्याची घोषणा करताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनही यात्रेचे नियोजन केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांवर त्याची जबाबदारी असेल. ही यात्रा 121 ठिकाणी जाणार असल्याने तेवढ्याच जागा मविआकडे मागितल्या जातील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ज्या ठिकाणी अजित पवारांच्या सभा होतील त्या ठिकाणी शरद पवारांच्या प्रत्युत्तर सभा होण्याचीही दाट शक्यता आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मठिकाण असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी गडावरून सुरुवात केली जाणार आहे. गडावर सकाळी ९ वाजता यात्रेला सुरुवात होणार असून ती पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्रभरात पोहोचणार असल्याचे यामुळे दिसणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App