विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आजपासून वादळ घोंगावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढील 48 तासांमध्ये राज्यात तब्बल अर्धा डझन सभांचा धडाका लावणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही आज 2 सभांच्या फुलबाज्या लावणार आहेत.6 meetings of Modi in 2 days in Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान झाले. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या. आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाकडे आहे. त्यासाठीच आज मोदी पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा घेत आहेत.
सोलापूर आणि साताऱ्यात सभा
मोदी आज सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी 1.30 वाजता होम मैदानावर सभा घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपाचे साताऱ्यातील राज्यसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी कराडमध्ये दुपारी 3.45 वाजता सभा घेणार आहेत.
पुण्याच्या रेसकोर्स वर सभा
पुण्याचे माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी हडपसरमधील रेसकोर्स मैदानावर संध्याकाळी 5.45 वाजता मोदी सभा घेणार आहेत. मोदींची आजची पुण्यातील सभा ही 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी असेल.
मंगळवारच्या सभा कोणसाठी?
उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. माढामधील उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे दुपारी 11.45 वाजता प्रचारसभा घेतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिव येथे दुपारी 1.30 वाजता सभा घेणार आहेत. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी मोदी लातुरमध्ये मंगळवारी दुपारी 3.00 वाजता सभा घेणार आहेत.
6 आणि 10 मे रोजीही मोदी महाराष्ट्रात
याशिवाय 6 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा बीडमध्ये होणार आहे. पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदी सभा घेतील. त्यानंतर 10 मे रोजीही पंतप्रधान मोदींच्या राज्यात सभा घेणार आहेत. कल्याणमधील महायुतीचे उमेदवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे, अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधानांच्या सभा होतील.
शरद पवारांच्याही आज 2 सभा
सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. वाईत संध्याकाळी 4.00 वाजता होणा-या या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत. शरद पवारांची आजची दुसरी सभा संध्याकाळी 6.00 वाजता फलटणमध्ये होणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App