शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभर शिवसेना लोकसभेची निवडणूक लढवले, अशी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह घोषणा आहे. ती संजय राऊत यांनी केली म्हणून स्वागतार्ह घोषणा आहे असे नव्हे, तर आदित्य ठाकरे तरुण नेतृत्व आहे. त्यांच्या पुढे जाण्याची धमक आहे म्हणून ही घोषणा स्वागतार्ह आहे…!! Aditya Thackeray’s leap of nationwide leadership should not fall on the fence of Maharashtra !!
महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे. मराठी माणसाने पंतप्रधान व्हावे. ही महत्त्वाकांक्षा धरून आता 60 वर्षे उलटून गेली आहेत. मधल्या काळात गंगा, यमुना गोदावरी, कृष्णा कोयना, बारामतीची कऱ्हा यातून बरेच पाणी वाहून देखील गेले आहे…!!
आता पुन्हा एकदा जर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक शिवसेना लढवेल अशी घोषणा होत असेल तर तिचे स्वागतच केले पाहिजे. कारण या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राचा एक तरुण नेता देशाचे नेतृत्व करण्यासाठी झेप घेणारा ठरणार आहे. मार्ग सोपा नाही. खडतर आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली जय हिंदुत्वाचे बीज रुजवले त्याचे रूपांतर जर देशव्यापी हिंदुत्वाच्या वटवृक्षात होणार असेल, तर महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या पक्षाच्या पोटात दुखले तरी हरकत नाही. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व जरूर फुलावे आणि फळावे…!!
पण प्रश्न फक्त हा आहे ज्या शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर संपूर्ण बहुमत आणि सत्ता स्थापन करता आली नाही तिने एकदम देशव्यापी नेतृत्वाची निवडणूक लढवण्याची घोषणा करावी करावी का…?? याचे उत्तर अजिबात तसे करायला हरकत नाही किंबहुना 2 खासदारांच्या पक्षाचा नेता जर आज 303 खासदार मिळवून लोकसभेत बहुमत मिळवू शकतो पंतप्रधान होऊ शकतो, तर आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाने का नाही पुढे यायचे?? का नाही देशाचे नेतृत्व करायचे?? जरूर पुढे आले पाहिजे. जरूर देशाचे नेतृत्व केले पाहिजे.
पण त्यासाठी 2 खासदारांवरून 303 खासदार करणाऱ्या पक्षाच्या नेतृत्वाचे कष्ट उपसण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राबाहेर झेप घेऊन रात्रंदिवस काम केले पाहिजे. “घार उंच उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी”, अशा स्वरूपाने देशव्यापी नेतृत्वाची झेप घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात आपले मन गुंतवता कामा नये. उलट महाराष्ट्रातल्या पूर्वसुरींच्या नेतृत्वाने ज्या राजकीय चुका केल्या, दिल्लीचे राजकारण करताना कायम महाराष्ट्रा च्या राजकारणात लुडबूडी धोरण ठेवले, त्यातून महाराष्ट्रातल्या दोन बड्या नेत्यांच्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. तसे आदित्य ठाकरे यांनी अजिबात न करता संपूर्ण महाराष्ट्राला कवेत घेऊन देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी जरूर दाखवावी…!! त्यासाठी हवा तेवढा वेळ घ्यावा. पुढची 20 – 25 वर्ष त्यासाठी खपावे लागले तरी चालेल. यश – अपयश आले तरी चालेल पण देशाच्या नेतृत्वावर एकदा केंद्रित केलेली नजर खाली येऊ देऊ नये. ती तिथेच स्थिर ठेवावी…!!
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत नेतृत्वाचा स्पर्धेत उतरलेल्या प्रत्येकावर मात करण्याची क्षमता दाखवावी. म्हणजे मग कराडकर किंवा बारामतीकर यांच्या अपयशाच्या निमित्ताने महाराष्ट्राला जो कटू राजकीय अनुभव आला तो अनुभव आदित्य ठाकरे यांना येणार नाही. उलट दिल्लीच्या नेतृत्वावर मात करणे जे कराडकरांना आणि बारामतीकरांना जमले नाही, ते आदित्य ठाकरे यांनी करून दाखवले असा मान त्यांना महाराष्ट्रासह देशात मिळेल…!! अन्यथा आदित्य ठाकरे यांची देशाचे नेतृत्व करण्याची उडी महाराष्ट्राच्या कुंपणात येऊन पडेल आणि हे महाराष्ट्राचे तिसरे दुर्दैव ठरेल…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App