श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. दुर्गमहर्षी साहित्यिक कै. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा बहुत दोस्ताना होता. बाबासाहेबांविषयी गोनीदा ‘दुर्गभ्रमणगाथा’मध्ये काय लिहितात वाचा Babasheb purandare in the words of go. ni. Dandekar
१९४४-४५ साली इतिहास-संशोधक-मंडळांतच एक सांवळा, तेजस्वी डोळ्यांचा मजपेक्षां सहासात वर्षानी लहान तरुण वारंवार दिसे. संघाच्या शाखेवरही त्याची गांठ पडे. परिचय कुठं कसा झाला, हें कांहीं आतां ध्यानीं राहिलं नाहीं. नांव बाबा पुरंदरे. संपूर्ण बळवंत मोरेश्वर पुरंदरे. आजचे जे सुविख्यात, शिवचरित्राचे अद्वितीय व्याख्याते शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, त्यांचं तें पूर्वरूप होतं. फुलपाखरू अजून कोषांत होतं. स्मरतं, कीं बाबा त्या वेळीं इतिहास-संशोधक-मंडळांत कांहीं संशोधनच करीत असे. ग. ह. खरे आणि शं. ना. जोशी दोघेही बुजुर्ग. सारं आयुष्य इतिहास संशोधनांत घालविलेले. नवल असं, कीं बाबा त्यांच्याशीही वाद घालायचा. झट्या घ्यायचा.
कळलं, कीं पुरंदरे घराणं ऐतिहासिक आहे. पर्वतीवर मुख्य मंदिराच्या पलिकडे नारायणाचं मंदिर, त्याची पुजाच पुरंदरे घराण्याकडे. असा मुळांतच त्या घराण्याला ऐतिहासिक वास. बाबाचे चुलते कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे ख्यातकीर्त संशोधक. मोडीचे चांगले जाणकार. जुनीं कागदपत्रं वाचायला तेही मंडळांत मांडा ठोकून बसायचे. त्याचे तीर्थरूप मोरेश्वर पुरंदरे उत्तम चित्रकार. मातुश्री उत्तम कथाकथक. या दोघांचेही संस्कार घेऊन हें मूल इतिहासाच्या मैदानांत पांची हत्यारं लेऊन घुसलं होतं.
शिवाजीराजा हा परम आदराचा विषय. त्याचं चरित्र संशोधावं, वाचावं, गावं, अशी मोठी हौस. त्या हौशीला खतपाणी मंडळांत मिळत होतं. बाबाचा स्वभाव नकल्या. भल्या भल्यांच्या तो उत्तम नकला करायचा. इतिहासाचा वक्ता झाला नसता, तर तो उत्तम नकलाकारच झाला असता. शाखेवर शिवाजी राजाविषयी मोठं कुतूहल. त्याचं चरित्र बाबा तिथं सांगू लागला. स्वयंसेवक मोठ्या आवडीनं तें ऐकूं लागले. अशी ही बाबाच्या शिवचरित्रकथनाची सुरुवात.
बखरी सगळ्या वारंवार वाचून झालेल्या. ऐतिहासिक रंग चढलेला, त्यामुळं भाषेची अडचण सहजच दूर झाली. स्वतः मोडी वाचू शकत असल्यामुळं तो अडसर उरला नाहीं. बाबाचं बोलणं ऐकतांना असं वाटे, कीं हा आजचा इंटरपर्यंत पोंचलेला बळवंत मोरेश्वर पुरंदरे नव्हे, तर कुणी बखरकार पुरंदरेकुलोत्पन्न मोरेश्वरसूनु बळवंतशर्माच शिवाजीराजाचं चरित्र गातो आहे.
बाबानं कष्टही फार केले. जुन्या जाणत्यांनी वाटा शोधून ठेवल्या होत्या. त्यांवरून बाबा तहान-भुकेची पर्वा न करतां रक्त ओकीस्तंवर धांवला. कागदपत्रं गोळा केलीं. तीं वाचलीं. त्यांचा अर्थ लावला. असा इतिहास संशोधकांमध्ये बाबाचा दबदबा निर्माण झाला.
बाबा शिवचरित्रविषयक पुस्तकं लिहूं लागला. तीं भराभरा खपूं लागली. प्रकाशक कोण शोधावा ? मग बाबानं स्वतःच तीं प्रकाशित करावीं. स्मरतं, कीं इकडून तिकडून किडुक मिडुक त्यासाठी विकून पैसा उभा करतांना बाबानं स्वतःच्या पत्नीच्या अंगाखांद्यावर घातलेलंही विकून टाकलं!
आज बाबाला शिवचरित्रानं पुरतं झपाटून टाकलं आहे. रंगरूपात बदल करणं बाबाच्या हातीं उरलं नाहीं, हें तर खरं. फेटाबिटा बांधला, कीं बाबा शिवरायासारखा नव्हे, पण एखाद्या शिवरायाच्या सेनापतीसारखा दिसतो. मुद्रेवरलं जरा सावळं वळण लक्षांत घेता तो एखाद्या आरमारावरल्या नौसेनाध्यक्षासारखा – दौलतखानासारखा नक्कीच दिसतो. एक कीटकभृंगन्याय आहे. भुंग्याचं चिंतन करतां करतां कीटक भुंग्यासारखा दिसूं लागतो. तसं बाबाचं बोलणं, चालणं, अदब, मुजरा, मर्यादा, हें सर्व इतिहासकालीन झालं आहे. कधीं कधीं तो हें कवच उतरून ठेवतो, त्या वेळी तो थेट आमच्यांत उतरून थट्टामस्करी करूं लागतो. एक तरतरीत, थट्टेखोर, इतिहासप्रेमी युवा म्हणून मी बाबाला ओळखू लागलो. वडिलांना तो तीर्थरूप म्हणे, आईला आऊसाहेब.
आम्हां दोघांच्याही ध्यानीं आलं, कीं उभयता शिवचरित्रानं झपाटले गेलों आहोंत. बाबा शिवचरित्राच्या इतिहासानं आणि मी शिवचरित्रविषयक भूगोलानं. गड भटकणं हा दोघांचाही छंद आहे.
असा हा छंदी बाबासाहेब पुरंदरे दुर्गभ्रमणांत माझा सखासुहृद झाला, यापरतं आणखी हवं तरी काय !
– गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर (‘दुर्गभ्रमणगाथा’).
– संकलन : प्रणव कुलकर्णी
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App