विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वांत चांगला राहिल्यावर देखील मुख्यमंत्री पदावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दावे करून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी काँग्रेसला डिवचत ठेवले. उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी केली, तर शरद पवारांनी छुप्या पद्धतीने सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे आणि नंतर आमदार रोहित पवार हे आपल्याच घरातली नावे पुढे करायला सुरुवात केली, पण या सगळ्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी झटक्यात पाणी फेरले.
काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीरपणे आकडेवारी मांडताना पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे मुख्यमंत्री पदावरचे उघड आणि छुपे दावे उद्ध्वस्त करून टाकले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक स्ट्राईकरेट असल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 65 % जागा मिळाल्या. याचे विधानसभांच्या जागांच्या आकड्यांत रूपांतर केले, तर 183 जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळला, असा अर्थ निघतो. यामध्ये सर्वांत चांगला स्ट्राईक रेट काँग्रेसचाच राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या पवारांच्या नावडत्या नेत्याकडून इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये ठणकावले गेल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली. कारण पृथ्वीराज चव्हाण हे काही काँग्रेस पक्षाचे केवळ प्रवक्ते किंवा दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते नाहीत, की जे उगाच माध्यमांमध्ये येऊन बडबड करतील. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला निश्चित महत्त्व आहे.
Congress : मराठी माध्यमांमधून पवार + ठाकरेंना सहानुभूतीचे चित्र; प्रत्यक्षात काँग्रेसकडेच इच्छुकांचा मोठा ओढा!!
पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेसमध्ये चांगले “वजन” आहे. ते गांधी परिवाराच्या निकटवर्तीयांमधले नेते मानले जातात. सोनिया गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदी नेमल्यानंतर त्यांनीच पवारांच्या वर्चस्वाखालच्या राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला होता. शिखर बँकेतला घोटाळा बाहेर काढला होता. पृथ्वीराज बाबांनीच सिंचन घोटाळ्यातले वेगवेगळे तपशील बाहेर काढले होते. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी पूर्णपणे अडचणीत सापडली होती. त्यामुळे पवारांचा पृथ्वीराज बाबांवर प्रचंड राग आहे. या रागातूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाताला फायलींवर सह्या करण्यासाठी लकवा मारतो, असे अश्लाघ्य उद्गार काढले होते.
अशा पृथ्वीराज बाबांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल हे ठणकावल्यामुळे मुख्यमंत्रीपदावरचे उद्धव ठाकरेंचे प्रत्यक्ष आणि शरद पवारांचे अप्रत्यक्ष दावेच उद्ध्वस्त झाले आहेत.
ठाकरेंची दिल्ली भेट गेली वाया
उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी दिल्लीत जाऊन तीन दिवस तळ ठोकला होता. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेऊन स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग केले होते. पण त्यावेळी त्यांचे प्रयत्न फसले. त्यावेळी पवारांनी आपल्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव नाही, असे जाहीर वक्तव्य केले होते, पण नंतर टप्प्याटप्प्याने छुप्या पद्धतीने सुरुवातीला सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार यांची “प्यादी” त्यांनी पुढे सरकवायचा प्रयत्न चालविला होता. पण काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे पृथ्वीराज बाबांसारख्या वरिष्ठ नेत्याने ठणकावल्यानंतर ठाकरे + पवारांचे हे मनसुबे उद्ध्वस्त झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more