कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा JN-1 a new variant of Corona, has been found in the state
राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
नागरिकांनो घाबरू नका,काळजी घ्या
विशेष प्रतिनिधी
ठाणे :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नागरिकांना केले.
सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेणे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध् आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ, आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्ययंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती दिली. आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामुग्री, इतर सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी दि. १५ ते १७ डिसेंबर 2023 या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे ४५ रुग्ण (मुंब२७, पुणे-८, ठाणे-८,कोल्हापूर-१ रायगड-१) आढळून आले आहेत, असे श्री. म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App