आपापसांत घाव घालून आपण कोणाला विजयी करीत आहोत?; बाबासाहेब पुरंदरेंचा “त्या”वेळच्या पत्रात खडा सवाल!!


राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय वादात महाराष्ट्रात जेम्स लेन वाद पुन्हा उफाळला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. शरद पवारांनी तर कै. बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच जेम्स लेनचा निषेध केला नसल्याचा आरोप केला आहे. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातल्या अन्य इतिहासकारांसह ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला जेम्स लेनच्या पुस्तकाच्या निषेधाचे पत्र पाठवले होते. त्यानंतर 25 जानेवारी 2004 रोजी सविस्तर पत्र लिहून बाबासाहेबांनी जेम्स लेन प्रकरणात आपली भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली होती. ते हे पत्र…!!


विशेष प्रतिनिधी 

छत्रपति शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या भारताचे आराध्य प्रेरणास्थान आहे. म्हणूनच भारतीयांच्या अशा प्रेरणास्थानांची हीन आणि निराधार चिकित्सा करण्याची खोड पाश्चात्यांमध्ये दिसून येते. ती परंपराच झाली आहे. ती मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचे, विशेषत: आद्य छत्रपति स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जीवनाचे अत्यंत अभ्यासपूर्वक दर्शन जनतेपुढे यावे, अशी अतिशय दूरदर्शी इच्छा महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री, भारताचे माजी संरक्षण, परराष्ट्र मंत्री आणि माजी उपपंतप्रधान मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या मनात तळमळीने होती. मुख्यमंत्री असताना त्यांनी याबाबतीत प्रत्यक्ष योजनाही केली. Who are we winning by hurting each other?

परंतु ती साकार झालीच नाही. हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य न होताच मा. यशवंतरावजी चव्हाण स्वर्गवासी झाले. हे जर कार्य पूर्ण झाले असते तर त्याची जगातील एकूण एक प्रमुख भाषांत भाषांतरे होऊन एक फार मोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काम झाले असते. शिवचरित्राचे मोल मानवी जीवनात किती मोठे आहे आणि महत्त्वाचे आहे हे विवेचन करून सांगण्याची आवश्यकता नाही. शिवचरित्र साधार आणि चिकीत्सापूर्वक ज्ञात्यांकडून लिहवून घेऊन प्रसिद्ध करणे हा खरोखर एक राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महान प्रकल्प महाराष्ट्र राज्याने अजूनही लवकरात लवकर हाती घ्यावा आणि खंडशः हा प्रचंड प्रकल्प पूर्ण करावा, अशी माझी महाराष्ट्र राज्यास आग्रहाची विनवणी आहे.

जेम्स लेन या अमेरिकन लेखकाचे छत्रपति महाराजांविषयीचे (मूळातच चुकीच्या शीर्षकाचे) एक पुस्तक (Shivaji Hindu King in Islamic India) हे ऑक्सर्फड युनिर्व्हसिटी प्रेस इंडिया यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर २००३ या कालखंडात नवी दिल्ली येथे असलेल्या आपल्या कार्यालयाच्या पत्त्यावर प्रसिद्ध केले. युनिव्हर्सिटी प्रेसचे मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने श्री. मनझर खान (Manzar Khan) यांनी ते प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्रातील ज्या काही इतिहास संशोधकांना ते समजले व उपलब्ध झाले त्यांनी ते वाचून तातडीने लेन यांच्या अत्यंत आक्षेपार्ह आणि निराधार अशा लेखनाचा निषेध केला. कोल्हापूरचे इतिहास पंडित प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. डॉ. वसंतराव के. मोरे, लोकसभेतील पुण्याचे मा. प्रतिनिधि श्री. प्रदीपराव रावत, श्री. गजाननराव मेहंदळे, श्री निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिवराव शिवदे आणि मी स्वतः (ब. मो. पुरंदरे) यांनी या पुस्तकाच्या लेखकाचा निषेध करणारे आणि या पुस्तकाचे वितरण तातडीने थांबविण्याची मागणी करणारे एक पत्र सामूहिकपणे दिनांक १० नोव्हेंबर २००३ रोजीच ऑक्सफड प्रेसचे प्रमुख श्री. मनझर खान यांचेकडे पाठविले. श्री. मनझर खान यांचे आम्हास दिनांक २१ नोव्हेंबर २००३ रोजीचे प्रत्येकाचे नावाचे पण एकाच मजकूराचे उत्तर लगेच मिळाले. त्यात त्यांनी आपल्या पत्रात जेम्स लेन यांच्या आक्षेपार्ह, निराधार आणि भावना दुखावणाऱ्या मजकुराबद्दल मनापासून खेद (sincere regret) व्यक्त करून सदरहू पुस्तकाचे अगदी त्वरीत प्रसारण थांबवित असल्याचे आम्हास लिहिले आहे. आम्ही युनिर्व्हसिटी प्रेस व श्री. मनझर खान यांना लिहीलेल्या (Date 10 Nov. 2003), आणि त्यांच्या आम्हास आलेल्या अधिकृत पत्रांच्या (Date 21Nov. 2003) झेरॉक्स प्रती सोबत जोडीत आहोत. या अशा तऱ्हेच्या भयानक निराधार म्हणूनच साफ चुकीच्या मजकुरांना वा ग्रंथांना त्वरीत उत्तर देणे अपरिहार्य असले तरी अखेर कायम स्वरूपात इतिहासाचे सत्य स्वरूप जगाला कळावे म्हणून कै. मा. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेप्रमाणे शिवचरित्राचे, महाप्रकल्प मानून सविस्तर शास्त्रशुद्ध लेखन होणे अत्यंत आवश्यक आहे.

या युरोपियन / पाश्चात्य लोकांच्या नीतिमत्तेच्या कल्पना अत्यंत ढिसाळ असतात. आई-वडील, बहीण-भाऊ, पती-पत्नी या नात्यांपेक्षाही सगळीच नाती ते नर-मादीच्या स्वरूपात पाहतात. त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. लेडी डायना एवढे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. मग अशी अनंत उदाहरणे! त्यातूनच भारतामध्ये ही विचारसरणी हळूहळू डोकावत आहे. याच मापात हे पाश्चात्य लेखक भारतातील पौराणिक महान् स्त्री-पुरुषांना आणि ऐतिहासिक कालीन छत्रपति शिवाजी महाराज, झाशीच्या लक्ष्मीबाई, नाना फडणवीस, वीर सावरकर आणि अशा अनेकांविषयी भारतीय मनाला कधीही न पटणारे असे निराधार विचार केवळ कल्पनेतून काढतात आणि लिहीत सुटतात. ते शास्त्रीय इतिहास साधनांचाही विचार करीत नाहीत आणि येथील जनमनाचा विचार मुळीच करीत नाहीत. पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीतील नीतिमत्तेच्या कल्पनांत जमीन-आस्मानाचे अंतर आहे. पाश्चात्य लेखकांनी अशा तऱ्हेच्या केलेल्या असंख्य लेखांच्या संकलनाचा एखादा मोठा खंडप्राय ग्रंथ होऊ शकेल. आता आण भारतीयांनीच या अशा प्रकारच्या पाश्चात्य आक्षेपांवर कसा दृष्टीक्षेप टाकावयाचा आणि कृती करावयाची याचा विवेकांने अचूक विचार करावयांस हवा.

एकतर निश्चित की पाश्चात्यांनी भारतीयांचे एक नाजूक वर्म अचूक हेरले होते आणि आहे अन् ते म्हणजे नैतिक अब्रु आणि चारित्र्य या वर्मावरच घाव घातला की भारतीय मन स्वतःच संभ्रमीत होते आणि ते स्वतःच्याच अस्मितांवर संशय घेवून स्वतःच घाव घालावयास उठते. मग कुणी कादंबरी लिहितो, नाटक लिहितो वा ग्रंथ लिहितो. आपल्याच इतिहासाचे निराधार विडंबन करण्यासही तो मागे पुढे पाहत नाही अन् इथेच अशा विकृत पाश्चात्य लेखनांचा विजय होतो. अस्वस्थ होऊन शास्त्रीय अभ्यास करणारा वा रागावणारा आमच्यात कुणी तुरळकच असतो.

आजही जेम्स लेन या लेखकाने असाच निराधार आघात आमच्या मनावर केला आहे. त्याने हा घाव कमरेखाली घातला आहे. या आघाताला आम्ही आपसातच एकमेकांवर घाव घालून लेनला विजयी करायचे का? आपणच विचार केला पाहिजे. लेनच्या निराधार लिखाणाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. माझे मत तर असे आहे की, आमच्या केंद्रीय राष्ट्रीय सत्तेने राष्ट्रीय पातळीवर याचा जाब विचारावा, जेम्स लेनचे पुस्तकातील संबंधीत लेखन आणि नंतर त्यांनी केलेला खुलासा शास्त्रीय इतिहासकारास अजिबात शोभणारा व पटणारा नाही. रस्त्यावरील कोणा अपरिचित माणसाने गर्दीत गप्पा मारताना हा ‘ज्योक’ केला म्हणे ! लेनने तो ऐकला म्हणे ! अन् तो त्याने आपल्या इतिहास ग्रंथात (?) दाखल केला. हा शास्त्रीय इतिहास ग्रंथ ठरतो काय? हे जबाबदारीचे लेखन काय ? पण असले लेखन गेली काही शतके करून, पाश्चात्यांनी आमच्यात फूट पाडून आमच्यावरच विजय मिळविले आहेत. असली मिसाईलम् त्यांच्यापाशी तयार आहेत व तयार होत असतात. गर्दीतही असे पोरकट व बेजबाबदार ज्योक करणारे कुणी असतील तर तेही राष्ट्रीय व सामाजिक गुन्हेगारच आहेत.

लेनच्या पातकी विधानांचा पहिला निषेध दिनांक १० नोव्हेंबर २००३ रोजी आम्ही केला. पण या किळसवाण्या लिखाणाचा उल्लेख वा प्रचार जनतेत सतत करणे मला योग्य वाटत नाही. हा एक प्रकारे कुसंस्कार ठरेल. वृत्तपत्रातून लेनचे हे प्रलाप जनतेस समजले तेव्हा जनता दुःखी झाली आणि संतत्पही झाली. प्रचंड प्रमाणात जनतेने आणि वृनपत्रांनी याचा कडक निषेध केला. काही तरूण अतिशय संतापले आणि त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला केला. यात अतिप्राचीन व दुर्मिळ अशा संस्कृत ग्रंथ संपदेचे खुप नुकसान झाले. छत्रपति शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक जिजाबाईसाहेब यांना पूजणाऱ्या युवकांना भयंकर संताप आला आणि लेन ज्या संस्थेत येत होते, त्याच संस्थेवर या युवकांचा राग उफाळला ही एक प्रकोपप्रतिक्रिया नाही काय? या युवकांचा राग दुर्मिळ आणि राष्ट्रीय मोलाच्या संस्थेवर कोसळला. आता हे झालेले नुकसान म्हणजे आपलेच नुकसान, महाराष्ट्रातील आणि जगातीतही अगणित ज्ञान प्रेमी लोकांनी पत्रांनी आपले व्याकूळ दु:ख केले. मी व्यथित झालो. ही मुले एवढी का संतापली, हे ही मला जाणवले. या दुःखातही माझ्या मनात एक विचार फुंकर घालून गेला. आमच्या तरुणांच्या अंत:करणात छत्रपति शिवाजी महाराज आणि महा जगजीवनदानहेतू:’ असलेल्या महान् योगीनीबद्दल म्हणजे मराठी अंत:करणात तेवत असलेल्या अस्मितेबद्दल असलेली ही नितांत प्रेमादरपूर्ण श्रद्धा, मणि जागतेपण पाहून माझे मन सुखावले. कारण त्या तरुणांचे मन मला समजले. त्यांच्या अंत:करणात असलेल्या या अस्मिताभक्तिशी मी एकशे एक टक्के सहमत झालो होतोही, मुले चुकतात, त्यांच्यावर थोडे रागावावेही, पण हीच मुले त्यांच्या भावना लक्षात घेतल्या तर पुढे मौल्यवान अशी देव, देश आणि धर्म याथी नितांत भक्ति करण्यासाठी पुढे येतील. आजही महाराष्ट्रात अशी अनेक लहान मोठी जनसेवेची व राष्ट्रसेवेची उपयुक्त कार्ये अशीन तरुण मुले करताना मी आणि आपण सर्वचजण महाराष्ट्रात पहात आहोतच ना!

माझ्यापाशी एक साक्षात उदाहरण मी नित्य अनुभवतो आहे. महाराजा शिव छत्रपति प्रतिष्ठान ट्रस्टच्या अनेक लोकोपयोगी व लोकजागृतीच्या कार्यात शेकडो तरुण तरुणी, ग्रामीण आणि नागरी भागात काम करीत आहेत. शैक्षणिक, आरोग्यविषयक, अपंगांना मदत आणि शिवअस्मितांचे दर्शन व प्रदर्शन घडविणारे कार्य ही तरुण मुले करीत आहेत. त्यात सामाजिक व आर्थिक सर्व तऱ्हेच्या स्तरांवरील जीवन जगणारी ही मुल आहेत. तो स्वत:चीही जास्तीत जास्त प्रगती करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. जाणता राजा या सामूहिक शिवनाट्य प्रयोगांच्या द्वारे यांच मुलांनी आ महाराष्ट्रातील अनेक लोकहितकारी संस्थांना कमीतकमी 30 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ऐतिहासिक स्थळी जाऊन शक्यतो तेथे चांगली आस्बा व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य ही मुले करीत असतात. एवढे सांगितले तरी युवाशक्तीची आणि युवा अंतःकरणाची मनोप्रेरणा आपणास जाणवेल.

व्हायला नको होते. पण झाले. आता उपाय नाही. पण आमच्या तरुणांना शिवाजीराजांचा आणि पुण्यश्लोक जिजाऊसाहेबांचा अपमान झालेला पाहून एवढी चीड, एवढा संताप येतोय हेही सुचिन्हच आहे. यातच आपला भविष्यकाल तेजोमय आणि उज्ज्वल आहे, याची चाहूल येते. सद्भावनेच्या भरात या तरुणांच्या हातून झालेल्या चुकांकडे आपण सर्वांनीच जरा पालकाच्या मायाममतेने पाहिले पाहिजे. या मुलांचे भावी जीवनात नुकसान होऊ नये, अशीच आपली इच्छा व प्रतिक्रिया ममतेने असायला हवी, छत्रपति शिवाजी महाराजांचे सुपुत्र व हिंदवी स्वराज्याचे तरुण युवराज संभाजीराजे यांच्या हातून इ. स. १६७९ मध्ये काही चुका झाल्या. छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या चुकांवर त्यांना चार विवेकाच्या गोष्टी सांगून जवळ केलेच ना? याचा परिणाम म्हणजेच, पुढच्या इतिहासात याच युवराज संभाजीराज्यांच्या हातून घडलेला दिव्य इतिहास आपण पाहिलाच ना? असामान्य शौर्य, नेत्रदीपक धाडस, प्रतिभाशाली संस्कृत वाङ्ममयाची निर्मिती, स्वराज्य रक्षणार्थ केलेली ‘थोरली मसलत’ आणि अखेर सद्धर्म, हिंदवी स्वराज्य, सार्वभौम छत्रपतीपदाची तेजस्वी अस्मिता आणि शेवटपर्यंत औरंगजेबापुढे अजिंक्य राहून अखेर धीरोदात्तपणे भयानक मृत्युला सामोरा जाणारा या युवक छत्रपति त्यातूनच आपल्याला लाभला ना? आमचा तो आदर्श ठरला ना? आपल्यालाही असे कर्तबगार तरुण उद्या लाभतील अशी मला अतिव खात्री वाटते. विचारवंतांनी आणि महाराष्ट्र राज्याच्या शासनाने याचा पालकाच्या मायेने आत्मियतेने व क्षमाशिल अंतःकरणाने माझ्या या विचारांचा विचार करावा हिच अपेक्षा. माझे विचार मनापासून आणि प्रामाणिकपणाने मी आपणापुढे मांडले आहेत.

जेम्स लेन यांची माझी गाठ भेट परिचय कधीच झाला नाही. झाला असता तर बरे झाले असते. वाईट झाले ते टळले असते. तर ते मला भेटले असते आणि जर त्यांनी माझी अभ्यासासाठी मदत वा मार्गदर्शन मागितले असते, तर त्याचा वेगळाच व चांगलाच परिणाम झाला असता. शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या चारित्र्यांपुढे आणि चरित्र्यांपुढे हे लेन नक्कीच लीन झाले असते. त्यांनी आपल्या ग्रंथाला ‘शिवाजी हिंदू किंग इन मुस्लीम इंडिया’ हे चुकीचे नाव दिले आहे. त्याऐवजी त्यांनी कदाचित् ‘महाराजा शिवछत्रपति : द सुप्रीम हिंदू नरसिंह राजा इन द वर्ल्ड’ असेही नाव दिले असते… पण अखेर लेन नेहमीच्याच पाश्चात्य ‘बायस’ वळणावर गेले.

बहुत काय लिहणे? आमचे अगत्य असो द्यावे ही विज्ञापना…

सेवेसी,

– बाबासाहेब पुरंदरे
२६ पर्वती, पुरंदरे वाडा, पुणे ४११००९

शिवराज्यभिषेक शके ३३० माघ शु. ४ श्रीगणेश जयंती, दिनांक २५ जानेवारी २००४

Who are we winning by hurting each other?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात