विनायक ढेरे
नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आजचे काँग्रेस नेते पराकोटीचा व्देष करीत असले तरी नजीकच्या इतिहासातले चित्र काहीसे वेगळे होते. सावरकरांशी वैचारिक मतभेद राखूनही नेते पराकोटीच्या व्देषभावनेत अडकलेले नव्हते. उलट देशासाठी हालअपेष्टा भोगलेल्या नेत्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न करीत होते. याचा धांदोळा सावरकरांच्या टपाल तिकीटाच्या प्रकाशनाच्या राजकीय कहाणीतून घेण्याचा हा प्रयत्न… Veer Savarkar postal stamp, intresting political history behind the publication
सावरकरांचे टपाल तिकीट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७० साली प्रकाशित केले ही वस्तुस्थिती आहे. पण त्यासाठी त्यांनी सावरकरांच्या निधनानंतर ४ वर्षे लावली. आणि त्यासाठी फक्त हिंदुत्ववादी नेत्यांनीच प्रयत्न केले होते, असे नाही तर सर्वपक्षीय खासदारांनी प्रयत्न आणि पत्रव्यवहार यातून सावरकरांचे टपाल तिकीट प्रकाशित झाले होते, हा वास्तव इतिहास आहे.
सावरकर विषयाचे अभ्यासक श्रीधर दामले यांनी याबाबतचा सगळा संसदीय पत्रव्यवहार आणि लेखी प्रश्नोत्तराच्या प्रती या परिश्रमपूर्वक मिळविल्या आणि त्यावर आधारित टपाल तिकीटाच्या प्रकाशनाचा रंजक राजकीय इतिहास चंद्रशेखर साने यांनी मांडला आहे. यातून सावरकरांच्या देशव्यापी राजकीय कर्तृत्वाचाही प्रत्यय येतो. सावरकरांवर केंद्र सरकारने टपाल तिकीट काढावे ही सूचना कोणा हिंदुत्ववादी खासदाराने नव्हे, तर त्यावेळच्या संयुक्त समाजवादी पक्षाचे (संसोप) खासदार एच. व्ही. कामथ यांनी लोकसभेत केली होती. त्यावर सावरकरांचे टपाल तिकीट काढण्याचे आश्वासन इंदिरा गांधी सरकारने ३० मार्च १९६६ रोजी लोकसभेत दिले.
पण यानंतर लगेच टपाल तिकीट प्रकाशित झाले नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत याचा जवळजवळ सर्व पक्षांच्या खासदारांनी पाठपुरावा केला. यामध्ये खासदार रघुवीर सिंग, प्रकाशवीर शास्त्री, शिवकुमार शास्त्री, रामगोपाल शालवाल, राम अवतार शर्मा, सूर्यप्रकाश सूरी, अर्जुनसिंग भंडारी यांचा समावेश होता. या सर्व खासदारांनी वेगवेगळ्या वेळी सरकारला सावरकरांच्या टपाल तिकीटाच्या प्रकाशनाबाबत संसदेत प्रश्न विचारले. या प्रश्नांना इंदिरा सरकारने २१ जून १९६७ रोजी लेखी सकारात्मक उत्तर दिले. पण त्यानंतरही दोन वर्षे काही झाले नाही.
१९६९ च्या बजेट अधिवेशनात जनसंघाचे खासदार ओमप्रकाश त्यागी, नरेन स्वरूप शर्मा आणि राम स्वरूप विद्यार्थी यांनी पुन्हा एकदा सावरकरांच्या टपाल तिकीटाचा प्रश्न संसदेत उपस्थित केला. याचा पाठपुरावा १९७० च्या बजेट अधिवेशनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) खासदार प्रा. हिरेन मुखर्जी यांनी केला.
त्याचवेळी राज्यसभेतील १२ खासदारांनी इंदिरा सरकारचे संसदीय कामकाजमंत्री सत्यनारायण सिन्हा यांना सावरकरांचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यासंबंधी पत्र पाठविले. या पत्राला सत्यनारायण सिन्हा यांनी सकारात्मक उत्तर पाठविले. सरकारचा याबाबत निर्णय झाला आहे, असे खासदार निरंजन वर्मा यांना संबोधलेल्या पत्रात सत्यनारायण सिन्हा यांनी लिहिले होते.
अखेरीस सावरकरांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन २८ मे १९७० रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. त्याच दिवशी अंदमानच्या सेल्यूलर जेलमध्ये कार्यक्रम झाला. याला सावरकरांचे सुपुत्र विश्वासराव सावरकर उपस्थित होते. सावरकरांच्या टपाल तिकीटाचे मूल्य २० पैसे किमतीचे होते. तशी ३० तिकीटे छापण्यात आली होती.
सावरकरांच्या टपाल तिकीटाच्या प्रकाशनाचा इतिहास आज धुंडाळायचे कारण असे, की सावरकरांवर केवळ “माफीवीर” शब्दासारखे खोटे आणि नकारात्मक शिक्के मारून त्यांना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचा कुटील हेतू असणारे नेते जरी त्या काळापासून होते, तरी सावरकरांची बाजू संसदेत लावून धरणारे नेतेही मोठे होते आणि मुख्य म्हणजे हिंदुत्ववादी पक्षांपासून समाजवादी, डाव्या पक्षांच्या खासदारांपर्यंत अनेकजण सावरकरांच्या सन्मानासाठी पुढे आले होते, याची आठवण सावरकर जयंतीच्या निमित्ताने करून द्यायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App