नाशिक : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या यशानंतर काँग्रेसचा हुरूप वाढल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हिरीरीने उतरत आहे. त्याचाच परिणाम म्हणून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi ) या भावा-बहिणींच्या सभांचा धडाका काँग्रेस महाराष्ट्रात लावणार आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी फक्त नांदेड आणि लातूर या दोनच शहरांमध्ये सहभाग घेतल्या होत्या. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप त्यांनी मुंबईत केला होता, पण त्यानंतर राहुल गांधींच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तरी सभा महाराष्ट्रात झाल्या नव्हत्या, तरी देखील काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्या नंबरचे यश मिळाले. त्यांचे 14 खासदार निवडून आले.
आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यापलीकडचे यश मिळवण्यासाठी काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका लावायचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांच्या साधारण 15 ते 20 सभा घेण्याचे काँग्रेसचे नियोजन आहे. राहुल आणि प्रियांका यांच्या प्रचाराच्या धडाक्यातून काँग्रेसने विधानसभेत पहिल्या नंबरचे स्थान पटकावायचा इरादा ठेवला आहे.
विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या की काँग्रेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा ठोकणार, हे उघड आहे. त्यामुळे काँग्रेसला जितक्या जास्त जागा, तेवढा शरद पवारांच्या पोटात गोळा!!, अशी राजकीय स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता आहे. शरद पवारांना आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी नको आहेत. त्यांना त्यांच्या “मनातला” मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे, पण त्यांच्या “मनातल्या” मुख्यमंत्र्याला बाकी कुणाचाच पाठिंबा नाही, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बळावर प्रचाराच्या बळावर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणे आणि त्या सर्वाधिक जागांच्या बळावर काँग्रेसने थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकणे म्हणजे पवारांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सत्तेलाच सुरुंग लावण्यासारखे होणार आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी प्रचाराचा धडाका लावताना मोठमोठ्या सभांमध्ये शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुतीला ठोकून काढतील. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची हाक देतील. पण दोन्ही नेत्यांच्या सर्वाधिक सभा या काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये होतील. पण या प्रचाराच्या धडाक्यामुळे काँग्रेसला फार मोठे यश मिळाले, तर प्रत्यक्षात पवारांचा सत्तेभोवतालचा वरचष्मा काँग्रेस नेते संपुष्टात आणतील ही भीती पवारांना वाटत आहे. पवारांचा काँग्रेसच्या सहवासातला तो राजकीय अनुभव आहे. पवारांच्या मनात नसलेले अनेक मुख्यमंत्री काँग्रेसने महाराष्ट्रा दिले. यात विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांचा नजीकच्या इतिहासात समावेश होता. अशोक चव्हाण देखील पवारांच्या फारसे मनातले मुख्यमंत्री नव्हतेच, कारण ते शंकरराव चव्हाण यांचे पुत्र होते. काँग्रेसने पवारांच्या नजीक असणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली, पण नंतर त्यांना बाजूला करून पुन्हा विलासरावांनाच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले होते. हा इतिहास पवारांच्या दृष्टीने जाचक आहे.
हाती सत्तेचा चक्की भोपळा!!
त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रचाराच्या धडाक्यातून शिवसेना – भाजपला मोठी टक्कर मिळणार असली, तरी त्याचा परिणाम मात्र अप्रत्यक्षपणे पवारांच्या पक्षाला आणि ठाकरे यांच्या पक्षालाच भोगावा लागण्याची दाट शक्यता आहे. कारण काँग्रेस पवार आणि ठाकरे यांना अनुकूल ठरेल किंवा त्यांच्या बाजूने उभा राहील, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला देण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले तरी, पवार आणि ठाकरे यांच्या हाती सत्तेची सूत्रे येण्याऐवजी सत्तेचा “चक्की” भोपळाच येण्याची दाट शक्यता आहे. यातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची खरी “राजकीय मेख” दडली आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more