राहुल गांधींचा political behavioral pattern आणीबाणीतल्या संजय गांधींसारखा

राहुल गांधी सध्या राजकीय दृष्ट्या सक्रीय होऊन जे निर्णय घेताहेत ना, ते पाहता ते आपले पिताजी राजीव गांधी यांच्यासारखे न वाटता ते आणीबाणीतल्या संजय गांधी यांच्या सारखे वाटू लागले आहेत. अनुभवी, प्रगल्भ नेत्यांना बाहेरचा रस्ता आणि आक्रस्ताळ्यांना पायघड्या हे त्यांचे राजकीय धोरण आणीबाणीतल्या संजय गांधी यांच्या राजकीय धोरणासारखे वाटते आहे. Rahul Gandhi`s political behavioral pattern is more like Sanjay Gandhi than Rajiv Gandhi

आज राहुल गांधी हे चरणजित सिंग चन्नी, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी यांच्या सारख्या नेत्यांना जवळ करून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सारख्या अनुभवी नेत्यांना बाहेरचे रस्ते दाखवत आहेत ना… तेच नेमके संजय गांधी यांच्या आणीबाणीतल्या वर्तणूकीसारखे आहे.

संजय गांधींनी आणीबाणीत पंतप्रधान इंदिरा गांधीना यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम, कासू ब्रह्मानंद रेड्डी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवायला भाग पाडले होते. त्यांच्या ऐवजी ओम मेहता, प्रणव मुखर्जी, कमलनाथ, अंबिका सोनी, रूक्साना सुलताना यांच्या सारख्या नेत्यांना तरूण नेते म्हणून मोरपिसे लावून पुढे केले होते. हे नेते संजय गांधींची ताबेदारी मानून काम करीत होते.

यशवंतराव चव्हाण, बाबू जगजीवन राम ब्रह्मानंद रेड्डी हे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री होते. पण अधिकार ओम मेहता, प्रणव मुखर्जी, चंद्रजित यादव यांच्या सारख्या नेत्यांकडे म्हणजे राज्य मंत्र्यांकडे एकवटलेले होते. ते संजय गांधींना इमाने इतबारे रिपोर्टिंग करीत होते. कमलनाथ, अंबिका सोनी, रूक्साना सुलताना तेव्हा युवक काँग्रेसचे नेते बनून देशात धुमाकूळ घालत होते.



आज कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेसमध्ये घेऊन, त्यांना मोठ – मोठी पदे देऊन राहुल गांधी तरी दुसरे काय करीत आहेत… तेच करीत आहेत, जे संजय गांधींनी आणीबाणीत केले. कॅप्टन अमरिंदर सिंगांना त्यांनी घरी बसविले आहे. नवज्योत सिंग सिध्दू आणि चरणजित सिंग चन्नी यांच्या हाती त्यांनी पंजाब सोपवून दिला आहे. जिग्नेश मेवाणीच्या हाती गुजरात सोपवून देण्याचा त्यांचा विचार आहे. कन्हैय्या कुमारला असेच मोठे पद देण्याचा ते मनसूबा राखून आहेत.

यातून आपण काँग्रेस मजबूत करतोय असे राहुल गांधींना वाटत आहे. प्रत्यक्षात ते फक्त मोदी विरोधी तोफा परजून ठेवत आहेत. पण त्याचा उपयोग नेमका किती होईल हे येणारा काळच सांगू शकेल… १९७५ मध्ये संजय गांधी यांना देखील आपण काँग्रेस मजबूत करतोय असेच वाटत होते. युवक काँग्रेसच देशातली खरी काँग्रेस आहे. देशाचे भवितव्य आहे. म्हाताऱ्या नेत्यांनी युवक नेत्यांसाठी मोठ्या जागा खाली करून द्याव्यात, असे ते जाहीर भाषणांमध्ये बोलत असत. त्यामुळे तरूण नेत्यांना आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चेव चढत असे.

संजय गांधींची तर आणीबाणीनंतर १९७७ लोकसभा निवडणूकीत एवढी मजल गेली होती, की त्यांनी लोकसभेची २०० तिकीटे युवक काँग्रेसच्याच उमेदवारांसाठी मागितली होती. ती इंदिरा गांधींनी दिलीही असती. पण बाबू जगजीवन रामांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तसे घडले नाही. इंदिरा गांधींनी आपला निर्णय सावधपणे बदलला आणि जुन्या अनुभवी नेत्यांबरोबर काही प्रमाणात जुळवून घेतले. त्यामुळे काँग्रेस जरी निवडणूक हरली तरी तिची संख्या आताएवढी कमी झाली नाही. काँग्रेसला तेव्हा १५१ जागा मिळाल्या होत्या.

आता राहुल गांधी देखील संजय गांधी यांच्या सारखेच वागून अख्ख्या काँग्रेसला आणीबाणीतल्या युवक काँग्रेसच्या दिशेनेच नेताना दिसत आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूकीत “२०० जागा तरूणांना” असा फॉर्म्युला त्यांनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या सल्ल्याने राबविला तर आश्चर्य वाटायला नको. अनुभवी नेत्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहेच. निर्णय प्रक्रियेतून देखील ते त्यांना हाकलून देतील.

राजस्थानतही नजीकच्या भविष्यात तसे घडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तेथे सचिन पायलट यांच्याबरोबर राहुल गांधींच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे सांगण्यात येते. अर्थात सचिन पायलट यांची कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. ते प्रगल्भ नेते आहेत आणि त्यांनी राजस्थानात काँग्रेससाठी काम करून देखील त्यांना न्याय्य असे मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे राहुल गांधींनी ते पद त्यांना दिले तर तो अपवाद मानावा लागेल.

…पण बाकीच्या राहुल गांधी यांच्या राजकीय खेळ्यांमधून ते आपले पिताजी राजीव गांधी यांच्या नव्हे, तर आपले काका संजय गांधी यांच्या सारखी राजकीय वर्तणूक करताना दिसून येत आहेत.

Rahul Gandhi`s political behavioral pattern is more like Sanjay Gandhi than Rajiv Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात