लोकसभा निवडणूक 2024 जवळ येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा बहुमत मिळवणार की नाही??, याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची तुलना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अनेक जण करतात. मोदी आणि इंदिराजी या दोन्ही पंतप्रधानांची राजकीय वर्तनशैली समान असल्याचे हवालेही अनेक जण देतात. त्यात बरेच तथ्यही आहे ते नाकारण्यात मतलब नाही.PM Modi more adventurous than Indira Gandhi in changing chief ministers of any state!!
पण इंदिरा गांधी आणि मोदी यांच्यात सर्वच राजकीय वर्तनशैली समान आहे असे मानणेही चूक आहे. भिन्न भिन्न काळातल्या दोन राजकीय नेते दोन वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये निर्णय घेतात आणि त्यात “कणखरता” हा एक मोठा समान दुवा असतो, ही बाब वगळली तर इंदिराजी आणि मोदी यांच्या राजकीय वर्तनशैलीत भिन्नता देखील खूप आढळते. मुख्यमंत्री पदांमध्ये बदल ही या भिन्नतेची सर्वात मोठी खुण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांनी आपापल्या कारकीर्दीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. त्यासाठी राजकीय धक्कातंत्र वापरले. आपल्याच पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांना त्यांनी अनेकदा चकवा दिला, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी इंदिरा गांधींपेक्षा धाडसी ठरल्याची उदाहरणे अधिक असल्याचे राजकीय वास्तव समोर येते.
मध्य प्रदेशात पंतप्रधान मोदींनी आजच घेतलेला मुख्यमंत्री पदाचा निर्णय हे त्याचे द्योतक आहे. किंबहुना त्याआधी देखील महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, आसाम मध्ये हेमंत विश्व शर्मा, उत्तराखंडात पुष्कर सिंह धामी गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या नेत्यांकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे देताना मोदींनी जे धक्का तंत्र वापरले, ते केवळ राजकीय नेते कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांच्या पुरतेच मर्यादित धक्कातंत्र नव्हते, तर ते त्यापलीकडे काँग्रेसी शैलीचे रिपोर्टिंग करणाऱ्या माध्यमांना सर्वात मोठे धक्के होते. माध्यमांचे कयास इंदिरा गांधींनी जेवढे चुकविले, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात माध्यमी कयास मोदींनी चुकविले आहेत!!
इंदिरा गांधींच्या राजकीय स्वभावाचे अंदाज त्या वेळचे माध्यम प्रतिनिधी बांधू शकत असत. अनेक माध्यमांच्या उच्चपदस्थांशी इंदिरा गांधींचे अतिशय निकटचे संबंध होते. पण मोदींचे राजकीय स्वभावाचे अंदाज सध्याची माध्यमे संख्येने जास्त असूनही आणि सोशल मीडिया अत्यंत प्रभावी असूनही बांधू शकत नाहीत, ही आजची वस्तुस्थिती आहे. शिवाय मोदी आजच्या “माध्यमवीरांना” आपल्या जवळ फिरकूही देत नाहीत. त्यामुळेच मोदी नेमके कुठले निर्णय घेतील?? कोणाला मुख्यमंत्री करतील??, याविषयीचे माध्यमांचे अंदाज एक दोनदा नव्हे, तर प्रत्येक वेळेला चुकल्याचे दिसून येते. तेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाबतीत घडले!!
3 राज्यांमध्ये भाजपने कोणताही मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे माध्यमांनी किमान डझनभर नावे मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये चालवली होती. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात माध्यमांचे कयास फोल ठरले. त्यांनी रेसमध्ये उतरवलेले एकही नाव मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकले नाही. त्या ऐवजी छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय आणि मध्य प्रदेशात मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. राजस्थानमध्ये देखील असेच होण्याची दाट शक्यता आता माध्यमे वर्तवू लागली आहेत. परंतु,ते तसेच घडेल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही.
इंदिराजींची “पसंत” लवकर बदले
पण त्या पलीकडे जाऊनही मोदी राजकीय निर्णयात इंदिरा गांधींपेक्षा धाडसी आहेत, हे जे शीर्षक दिले आहे, त्याला जास्त मोठा अर्थ आहे, तो म्हणजे इंदिरा गांधी आपल्या राजकारण शैली नुसार कोणत्याही राज्यातले मुख्यमंत्री बदलताना त्या राज्यांमध्ये काँग्रेसमधलेच गट तट एकमेकांमध्ये झुंजवत असत. या गटातटांच्या झुंजीतच त्या आपल्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडत असत इंदिरा गांधींची “पसंत” फार लवकर बदलतही असे. त्यामुळे राज्यांचे मुख्यमंत्री त्या मनमानी पद्धतीने बदलत असत. महाराष्ट्रात बॅरिस्टर अ. र. अंतुले, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर ही त्याची उदाहरणे होती. अशीच उदाहरणे अनेक राज्यांमध्ये देखील सापडतील.
इंदिराजींना मुख्यमंत्र्यांपासून धोका वाटे
त्याचबरोबर इंदिरा गांधींच्या सुरुवातीच्या पंतप्रधान पदाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या हेवीवेट मुख्यमंत्र्यांकडून राजकीय धोका असल्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांना कोणताही मुख्यमंत्री स्थिर राहू नये याची काळजी घेऊन त्याला बदलणे भाग पडत असे. नंतर तर ती त्यांची राजकीय वर्तनशैलीच बनली. अगदी अखेरच्या काळात मुख्यमंत्र्यांकडून असलेला धोका कमी झाल्याची जाणीव इंदिरा गांधींना झाली पण तोपर्यंत त्यांची कारकीर्द संपुष्टातही आली होती.
मोदींना भाजप अंतर्गत आव्हान नाही
त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या विशिष्ट राजकीय पार्श्वभूमीमुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि एकूणच भाजपच्या राजकारण शैलीमुळे असे कुठल्याही भाजपच्या कॉर्नर मधून आव्हान मिळण्याची बिलकुल शक्यता नाही.
मोदींना भाजपमध्ये आव्हाने आहेत, असे फक्त माध्यमे म्हणत असतात आणि “माध्यमवीरांची” ती “सूत्रे” भाजपच्या कुठल्याही अति वरिष्ठ वर्तुळांपर्यंत पोहोचतच नसतात. त्यामुळे माध्यमांचे मोदींना आव्हानाचे कयास गेली 10 वर्षे पूर्णपणे फोल गेले आहेत.
अर्थातच मोदी मुख्यमंत्री बदलतात त्यामध्ये स्वतःच्या पदाविषयीची असुरक्षितता हे कारण नसून भाजपच्या पुढच्या 10 ते 15 वर्षांच्या वाटचालीची तसेच त्या – त्या राज्यांमध्ये दमदार नेतृत्व उभी करण्याची राजकारण शैली आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि आसाम मध्ये हेमंत विश्वशर्मा यांना मुख्यमंत्री करणे ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. मोहन यादव हे त्या पुढचे नाव असण्याची शक्यता आहे.
खरंतर मोदी स्वतः हेच भाजपचा राजकारण शैलीचे उत्तम उदाहरण आहे. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता संघटन मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री त्यानंतर पंतप्रधान अशा चारच पदांवर ते राहिले. त्यामुळे कार्यकर्त्यातून उत्तम प्रशासक असणारा नेता कसा घडतो, हे ते स्वानुभवातून शिकले आहेत. त्यामुळे हाच स्वानुभव ते इतर राज्यांच्या मुख्यमंत्रीपदावर माणसे निवडताना वापरतात. हा इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकारण शैलीतला मूलभूत फरक आहे.
अर्थातच इंदिरा गांधींपेक्षा नरेंद्र मोदी हे राजकीय निर्णय घेण्यात अधिक धाडसी आहेत. कारण कुठल्याही नेत्याचा प्रत्येक निर्णय 100 % बरोबर येतोच असे नाही तो कमी अधिक प्रमाणात बरोबर ठरतो अथवा चूकतो. पण तो चूक ठरू शकतो या भीतीने निर्णयच घ्यायचे नाहीत असे कधी इंदिरा गांधींनी केले नाही आणि तसे मोदीही करत नाहीत.
इंदिरा गांधीं सारखे मोदी पत्ते पिसत नाहीत
पण त्यातही इंदिरा गांधींपेक्षा मोदी अधिक धाडसी राजकीय निर्णय घेतात, हे यातून लक्षात येते की, ते पठाडी बाहेर जाऊन कोणताही प्रयोग करायला कचरत नाहीत. नेता निवडीतला प्रयोग चुकण्याची भीती निदान मोदींना तरी वाटल्याची उदाहरणे नाहीत. इंदिरा गांधी मुख्यमंत्री “वरून नेमत” असत, तर मोदी मुख्यमंत्री “निवडतात” हा कदाचित दोन नेत्यांच्या राजकीय वर्तनशैलीचा प्रमुख भेद असेल, हे त्यांनी निवडलेल्या मुख्यमंत्री पदाच्या नावांमधून अधिक समजते!! कारण पत्ते पिसल्यासारखे मुख्यमंत्री बदलल्याची उदाहरणे इंदिरा गांधींच्या बाबतीत सापडतात, पण मोदींच्या बाबतीत तशी उदाहरणे अजून तरी आढळलेली नाहीत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App