सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले.
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्यासोबतच देश जोडण्याचेही कार्य केले त्यामधील संत नामदेव एक आहेत, असे मनोगत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
Governor Bhagat Singh Koshyari latest news
सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संत नामदेव अध्यासन आणि सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव यांच्या 750 व्या जयंती वर्षात देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आरंभही यावेळी करण्यात आला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्तीचा संगम महाराष्ट्रात आहे. संतांचा सन्मान हा आपला सन्मान आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र म्हणून संत नामदेव यांच्याकडे गौरवाने पाहिले जाते. त्यांनी देशभर भक्तीचा प्रचार केला.
संत नामदेव यांचे स्मरण करतांना साहित्यिकांनी नवीन पिढीला संतांविषयी माहिती करुन देण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य लेखन केले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास शिख समाजाचे नेते संतसिंग मोखा यांच्या विशेष उपस्थितीसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.
सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकात संत नामदेवांची एकसष्ट पदे मराठी अन्वयार्थासह समाविष्ट केली आहेत. त्याचबरोबर त्या पदांचे संक्षिप्त सारग्रहणही दिलेले आहे. कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव रचित ‘अमृताहूनी गोड तुझे नाम देवा’ या अभंगगायनाने झाली. धनश्री हेबळीकर यांनी हा अभंग गायिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख व प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. आभार प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी यांनी मानले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App