छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर या अधिदैवतांचे अनन्य पूजक!! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे


गगनाला भेदून जाणाऱ्या कर्तृत्वातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जीवनाचे सर्वस्व वाहून पूजा करणारे पूजक अशीच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख राहिली आहे.Exclusive worshipers of Chhatrapati Shivaji Maharaj, Swatantryaveer Savarkar

बाबासाहेबांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी वाणीने शिवछत्रपतींच्या देदीप्यमान चरित्राची अफाट कर्तृत्वाची ओळख करून दिली. शिवछत्रपतींच्या जीवनावर आणि हिंदवी स्वराज्यावर त्यांनी अक्षरशः लाखो व्याख्याने आपल्या मुखातून दिली. यासाठी लाखो मैलांचा प्रवास केला. संशोधनासाठी पायपीट केली. बाबासाहेबांच्या या व्याख्यानांनी आणि वक्तृत्वाच्या ओघवत्या वाणीने संपूर्ण महाराष्ट्र भिजला. त्याने शिवछत्रपतींच्या गगनाला भेदून जाणाऱ्या अफाट कर्तृत्वातून स्फुरण आणि प्रेरणा घेतली.

जसे शिवछत्रपतींचे तसेच सावरकरांचे…!!

स्वतः सावरकर शिवछत्रपतींचे अनन्य पूजक होते तर बाबासाहेब पुरंदरे हे शिवछत्रपती आणि सावरकरांचे अनन्य पूजक होते. सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी प्रख्यात संगीतकार सुधीर फडके आणि बिंदुमाधव जोशी यांच्यासह बाबासाहेब पुरंदरे यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण देशभर स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी व्याख्याने दिली. सावरकरांचे सर्व कर्तृत्व जनतेसमोर उलगडून दाखविले. सावरकरांवरचा “वीर सावरकर” हा चित्रपट 1985 च्या दशकात जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यांनी कृतकृत्यता व्यक्त केली.

सावरकरांचा बाबासाहेबांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव होता. सावरकरांना प्रत्यक्ष भेटी विषयीच्या आठवणी ते नेहमी सांगत असत. बाबासाहेब हे सावरकरांच्या भाषणाची उत्तम नक्कल करत असत. एकदा पुण्याचे दिवंगत माजी महापौर गणपतराव नलावडे यांनी स्वतः सावरकरांना बाबासाहेबांची ओळख करून देताना, “हा तुमची उत्तम नक्कल करतो”, असे सांगितले होते. त्यावेळी लहान असलेल्या बाबासाहेबांना सावरकरांनी जवळ बोलावले आणि मी कसे भाषण करतो सांग बरं!!, असे विचारले. त्यावर बाबासाहेबांनी संकोचत सावरकरांच्या भाषणाची नक्कल म्हणून दाखविली. सावरकरांचे हावभाव त्यांची उच्चारशैली अक्षरशः बाबासाहेबांच्या वक्तृत्वातून झलकत होती. त्यावेळी सावरकर बाबासाहेबांच्या नकलेवर खूष झाले, पण लगेच सावरकरांनी बाबासाहेबांना विचारले, “नुसत्या नकलाच करीत बसणार का? की आपले स्वतःचे काही करणार?”

… आणि येथेच बाबासाहेबांच्या मनात स्वतंत्र कर्तृत्व फुलवून दाखविण्याची ठिणगी पडली. त्यानंतर सुरू झाली, शिवछत्रपतींच्या संपूर्ण जीवनाची शोधयात्रा…!! यामध्ये त्यांच्या समवेत होते प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर. या दोघांनी शिवछत्रपतींच्या प्रत्येक गड किल्ल्याला भेट दिली. तिथे दिवसेंदिवस – रात्री घालविल्या. गडकिल्ल्यांचा शास्त्रीय अभ्यास केला. बाबासाहेब पुरंदरे हे जीवनाच्या अखेरपर्यंत शिवछत्रपतींचा ध्यास घेतलेले पूजकच राहिले. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र पदस्पर्श झाला त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब जाऊन त्या ठिकाणाचे दर्शन घेऊन आले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर शिवछत्रपतींच्या अफाट कर्तृत्वाचा पट ते उलगडू शकले.

बाबासाहेबांनी फक्त स्फूर्तिदायक शिवचरित्र लिहिले असे नाही, तर सावरकरांच्या प्रेरणेतून त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात देखील प्रत्यक्ष हातात पिस्तूल घेऊन सहभाग घेतला होता. यावेळी देखील त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी म्हणून सुधीर फडके हे होते. शिवछत्रपतींचे जीवन आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे अफाट कर्तृत्व हेच बाबासाहेबांच्या जीवनाचे अखेरपर्यंत सूत्र राहिले…!!

Exclusive worshipers of Chhatrapati Shivaji Maharaj, Swatantryaveer Savarkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात