नाशिक : काकांची पुंगी निघाली नागोबा डुलाया लागला, पण “तो” नेमका कोणता??, असे विचारायची वेळ एका व्हायरल झालेल्या मस्त व्यंगचित्रांनी आणली आहे.
आजच्या नागपंचमीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यात काका पुंगी वाजवत आहेत आणि तीन नागोबा डोलताना दाखविले आहेत. अर्थातच पुंगी वाजवणारे काका शरद पवार आहेत आणि त्यावर डोलणारे नागोबा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत. व्यंगचित्र दिलखेचक आहे. किंबहुना शिवसेनेच्या मूळ परंपरेशी सुसंगत आहे.
कारण जी शिवसेना मूळातच बाळासाहेबांच्या प्रखर व्यंगचित्रांमधूनच जन्माला आली, त्या परंपरेतून एकमेकांवर टीका होणे अगदीच स्वाभाविक आहे आणि नागपंचमीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर व्यंगचित्रात्मक टीका करून ती परंपराच पाळली आहे. यात कुठलीही शंका नाही.
काकांची पुंगी निघाली नागोबा डुलाया लागला pic.twitter.com/L4qFdNLknU — Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) August 9, 2024
काकांची पुंगी निघाली नागोबा डुलाया लागला pic.twitter.com/L4qFdNLknU
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) August 9, 2024
पण तरी देखील वर उल्लेख केलेला सवाल तयार होतोच, तो म्हणजे काकांची पुंगी जरूर निघाली, पण नागोबा नेमका कोणता डूलायला लागला??, हा तो सवाल आहे. कारण केल्या काही दिवसांमधल्या ज्या राजकीय घडामोडी मुंबईत घडल्या, त्यातून तर काही वेगळेच चित्र महाराष्ट्रात दिसायला लागले. काकांनी म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकदा नव्हे, दोनदा भेट घेतली. ती धारावीच्या विकासाचे कंत्राट अदानी समूहाला देण्याच्या मुद्द्यावर होती, हे आता उघड गुपित राहिले आहे, किंबहुना हे गुपित आता उघड झाले आहे.
त्या उलट धारावीच्या मुद्द्यावर जे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना एक आहेत, या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी काल परवाच दिल्लीत झाल्या. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची एकूणच फेरमांडणी होते का??, असा सवाल तयार झाला आहे. किंबहुना महाराष्ट्राचे राजकारण त्या दिशेनेच निघाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला!!, असा व्यंगचित्र बाण जरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर सोडला असला, तरी प्रत्यक्षात काकांच्या पुंगी वर नेमका कोणता नागोबा डूलाया लागलाय??, हा खोचक पण गंभीर सवाल तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more