2019 पेक्षा 20227 सत्तांतराची कहाणी अधिक अद्भुत रम्य आणि अधिक गुंतागुंतीची आहे. यातला नायक ठरवताना आणि खलनायक ठरवताना मराठी माध्यमे पुरती भंजाळून गेली आहेत. 2019 च्या सत्तांतराच्या वेळी निदान मराठी माध्यमांचा “नायक” तरी ठरलेला होता. त्याच्याच भोवती सगळ्या कथा गुंफायच्या होत्या. एकदा शरद पवारांना मराठी माध्यमांनी “चाणक्य” ठरवून टाकले असल्यामुळे 2019 च्या कथा रंगवणे सोपे गेले. पवारांना “चाणक्य” ठरविल्यामुळे आपोआपच उद्धव ठाकरे यांचे “चंद्रगुप्त” ठरले आणि देवेंद्र फडणवीस तर माध्यमांचे आधीच खलनायक होतेच. त्यामुळे 2019 च्या सत्तांतर कादंबरीचा आकृतीबंध, पटकथा, रचना संवाद सगळे आधीच ठरले होते ते फक्त आपल्या शब्दात मांडायचे होते ते त्यावेळी मराठी माध्यमांनी रंगवून रंगवून जरूर मांडले.2022 power shift in maharashtra : marathi media confused due to lack of proper information
पण 2022 च्या सत्तांतराची कहाणी तितकी सोपी नाही. त्यात अद्भुतरम्यता तर आहेच पण गुंतागुंत जास्त आहे आणि ती गुंतागुंत मराठी माध्यमांच्या मूलभूत बौद्धिक आकलनाच्या आणि प्रतिभेच्या पलिकडची आहे. त्यामुळेच मराठी माध्यमांना 2022 च्या सत्तांतर नाट्यातील नायक, खलनायक, चाणक्य चंद्रगुप्त हेच ठरवता येईनासे झाले आहेत. ज्याला जसे वाटेल तशी सत्तांतर कादंबरी जो तो लिहितो आहे. दाखवतो आहे. कुणाला देवेंद्र फडणवीस यांचा त्याग भावतो आहे तर कुणाला देवेंद्र फडणवीस यांची ठरवून कीव येते आहे. बाकी “पत्ता कापला”, “पंख छाटले” ही भाषा जुन्या जाणत्यांनी वापरून गुळगुळीत केली आहेच तीच पुन्हा पुन्हा वापरली जात आहे.
पूर्वी काँग्रेसमध्ये सत्तांतरे होत तेव्हा मराठी माध्यमांच्या पत्रकारांचे निदान सोर्सेस तरी पक्के होते. त्यांची कारणमीमांसा वास्तवाशी तरी जुळत होती. आता मुद्दलातच मराठी माध्यमांच्या सोर्सेसचा अभाव आहे. निर्णायक ठिकाणी आणि त्या पातळीपर्यंत पोहोचण्याची त्यांची झेपच नाही. त्यामुळे मूलभूत माहितीचा अभाव असल्याने 2022 ची सत्तांतराची कहाणी अधांतरी लटकती वाटते.
वाऱ्याच्या अभावी आपल्याला हवे तसे पतंग जसे उडत नाहीत तसेच 2022 च्या सत्तांतर नाट्याचे पतंग अनुकूल वाऱ्याअभावी हवेतल्या हवेत गिरक्या खाऊन पडत आहेत. आधीच वारा आणि हवा प्रतिकूल, पतंगाचा मांजा तुकडा आणि मूळात पतंग फाटके अशी मराठी माध्यमांची अवस्था असल्याने 2022 च्या सत्तांतराची कहाणी मनासारखी रंगत नाही.
त्यामुळे मग फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेच कसे?? त्यासाठी कोणी कोणाचा कसा गेम केला??, याचीच अद्भुतरम्य वर्णने करण्यात मराठी माध्यमे गुंतली आहेत. यातली नेमकी पक्की खात्रीशीर माहिती कुणाकडेच उपलब्ध नाही. त्यामुळेच मग “जर तर”च्या भाषेत सगळे रिपोर्टिंग सुरू आहे आणि भाजप मधले आपले सोर्सेस कसे “पक्के” आहेत आणि त्या सोर्सेसकडची माहिती कशी “पक्की” आहे हे ठसवण्यातच 2022 च्या सत्तांतराचा बहुतांश भाग खर्च होताना दिसतो आहे. त्यातून मारून मुटकून अद्भुतरम्य केलेली कहाणी वाचायला मिळते पण हाती काही लागत नाही!!
शिंदे फडणवीस सरकारचे काम तर सुरू झाले आहे. तसे काम तर 2019 मध्ये ठाकरे – पवार सरकारचेही सुरू झाले होते. पण निदान त्यावेळी नायक, चाणक्य, चंद्रगुप्त हे सगळे ठरलेले असल्यामुळे त्यामध्ये फक्त आपापल्या चटकदार भाषेची फोडणी घालून ते वाचकांपुढे किंवा प्रेक्षकांपुढे पेश करायचे होते. इथे मुदलातच चाणक्य कोण?? चंद्रगुप्त कोण?? हे ठरवण्याचा दुष्काळ आहे!! त्यामुळे 2022 च्या सत्तांतराची नेमकी कहाणी मराठी माध्यमांच्या अज्ञान अंधःकारात दडून राहिली आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App