वृत्तसंस्था
हैदराबाद : हैदराबादमधील राजकारणाने तेलंगणाबरोबरच शेजारच्या आंध्र प्रदेशात राजकीय भूकंप घडविला आहे. कोविडचे कारण दाखवून फेब्रुवारी २०२१ मध्ये नियोजित असलेल्या ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक टाळण्याचा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा डाव उघड झाला आहे. कोविड १९ च्या लाटेमुळे आंध्र प्रदेशात २०२१ च्या फेब्रुवारीत या निवडणूका घेणे धोकादायक आहे, असा ठराव आंध्र विधानसभेत काही वेळापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. एएनआयने ही बातमी दिली आहे. andhra vidhan sabha news
हैदराबादच्या महापालिका निवडणुकीत प्रचंड घमासान होऊन भाजप तेलंगणाच्या राजकारणात एक निर्णायक शक्तीच्या रूपात पुढे आल्याबरोबर जगनमोहन रेड्डींच्या आंध्रात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. त्यांनी विधानसभेचा आधार घेत २०२१ ची नियोजित निवडणूका टाळण्याचेच पाऊल उचलले आहे. राज्य विधानसभेत जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसला संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे तेथे ठराव संमत होणे अवघड नव्हते. त्यानुसार जगनमोहन रेड्डींनी हा ठराव मंजूर करवून घेतला आहे. andhra vidhan sabha news
कारण कोविड १९ चे सांगितले जात असले, तरी बिहार, हैदराबाद, जम्मू – काश्मीर येथील निवडणुका कोविडच्या काळातच व्यवस्थित संपन्न झाल्या आहेत. तेथे कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. काही अडचणी आल्या तरी केंद्र सरकार आणि तेथील राज्य सरकार तसेच प्रशासनाने त्यांच्यावर यशस्वी मात केलेली दिसली आहे. तेथील विधानसभा अथवा स्थानिक संस्थांनी अशा प्रकारे निवडणूका टाळण्यासाठी ठराव मंजूर केलेले नाहीत. त्यामुळे जगनमोहन रेड्डींनी खेळलेल्या चालीकडे वेगळ्या राजकीय दृष्टीने पाहण्यास सुरवात झाली आहे.
राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये निवडणूका घेण्यावर वाद झाला होता. १८ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूका नियोजित वेळेतच म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आता विधानसभेतच त्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय झाल्याने वाद पुन्हा उफाळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more