मृत्यूची अन्य कारणे देऊन मृतदेह परस्पर सोपविल्याचे प्रकार?; फडणवीस यांची ठाकरे यांच्याकडे तक्रार

  •  एकट्या नायर रूग्णालयात अशी 44 प्रकरणे
  •  अन्यही रूग्णालयातही अशी अनेक प्रकरणे
  •  पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपविले जात असल्याने आणि परिणामी पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका अधिक आहे. एकट्या नायर रूग्णालयातील अशी 44 प्रकरणे आपल्याकडे आहेत, अशी तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या व मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृत्यूची अन्य कारणे देऊन मृतदेह परस्पर सोपविल्याने मृत्यूसंख्या कमी दिसून असली तरी त्यामुळे कोरोनाचा धोका प्रचंड वाढत आहे. यासंदर्भातील एकट्या नायर हॉस्पिटलमधील 44 प्रकरणे निदर्शनास आली आहेत. यातील दोन उदाहरणे देताना ते म्हणाले की, यातील पहिला रूग्ण 40 वर्षीय आहे. तो रुग्ण दि. 12 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी रुग्णालयात दाखल झाला. सायंकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या रेकॉर्डवर मृत्यूचे कारण ‘लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिस्ट्रेस सिंड्रोम इन अ कोविड सस्पेक्ट’ असे लिहिले आहे. त्यांच्यावर झालेल्या उपचारांचे कागदपत्र पाहता त्यावर ‘शिफ्ट टू आयसोलेशन वॉर्ड अँड टेक थ्रोट स्वॅब’ असे लिहिले आहे. प्रत्यक्षात मात्र तो स्वाब घेण्यात आल्याचे दिसत नाही. पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचा मृतदेह तसाच परस्पर देण्यात आला आहे.

दुसरे उदाहरण: दुसरे एक रुग्ण वय वर्ष 49 यांना 4 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 8 एप्रिल 2020 रोजी चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्यूचे कारण हे 1. ‘टाईप 1 लोअर रिस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन इन नोन केस ऑफ डायबेटिस आणि 2 कोविड सस्पेक्ट विथ अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ असे लिहिले आहे. याही रुग्णाचे केस पेपर्स पाहता आयसोलेशनमध्ये ऍडमिट करून कोविड स्वॅब घेण्याबाबत डॉक्टरांनी लिहिले आहे. मात्र या संपूर्ण चार दिवसातही त्यांची टेस्ट झाल्याचे व त्याचा रिझल्ट आल्याचे कुठेही दिसत नाही. मृत्यूनंतर याही रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी सोपविण्यात आला. एकट्या नायर हॉस्पिटलमधील आतापर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार 44 रुग्ण अशाचप्रकारे स्वॅब न घेता कोरोना संशयित म्हणून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहेत.

इतरही वेगवेगळ्या हॉस्पिटलमधले काही रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत. एकूणच या सर्व प्रकारामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या नोंदी तर कमी होतच आहेत. परंतु त्यांना नॉन-कोवीड समजल्याने त्यांच्या घरची मंडळी किंवा जवळच्या नित्य संपर्कातील अतिजोखमीच्या लक्षणे नसलेल्या (हायरिस्क असिम्टोमॅटिक) व्यक्तींचे विलगीकरण आणि टेस्टिंगही होत नाही. त्यामुळे अजाणतेपणामुळे त्यांना संक्रमण झाले असल्यास ते मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होतो आहे. ही प्रथा तत्काळ बंद करावी. एखादा रुग्ण दाखल झाल्याबरोबर तपासणीचा नमुना घेण्यासाठीचा जो प्रोटोकॉल आहे, त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. दुर्दैवाने मृत्यू झाल्यास टेस्टच्या निकालावर आधारित अतिजोखमीच्या व्यक्तीला चिन्हांकित करून त्यांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील कारवाई तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भातील कोरोना नियमावलीचे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे आदेश आपण द्यावे, अशी विनंतीही फडणवीस यांनी केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात