विशेष प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्रात साधूंवरची हल्लेखोरी थांबायलाच तयार नाही. पालघरमधील साधूंचे सेक्युलर मॉब लिंचिंग ताजे असतानाच नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, राज्याच्या गृह खात्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या हत्याकांडातील आरोपीला ताब्यात घेत नाही तोपर्यंत महाराजांचा पार्थिवदेह न स्वीकारण्याची भूमिका भाविकांनी घेतली आहे.
या हत्याप्रकरणातील संशयित गावातच राहणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. त्याच्यावर पूर्वीच खूनाचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी ते प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप होतोय. म्हणूनच साधूंच्या हत्याकांडापर्यंत मजल गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नागठाणा येथे राज्य मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज राहात होते. या मठामध्ये शिष्यगणही मोठ्या प्रमाणावर राहतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. त्यामुळे प्रत्येकजणच स्वतःची काळजी घेत घरामध्येच राहात आहे. या संधीचा फायदा घेत अनेक खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. यातच नागठाणा येथेही पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली.
मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला. हद्द म्हणजे हा संशयीत आरोपी गावातीलच असल्याचे गावकरी सांगत आहेत. महाराजांची हत्या करून त्यांच्याच गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह टाकून आरोपी गाडी पळवून नेण्याच्या बेतात होता. मात्र, शेजारील नागरिक तसेच मठाच्या गच्चीवर झोपलेले शिष्यगण जागे झाल्याने आरोपीने गाडी सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येते.
नागरिकांना गाडीमध्ये महाराजांचा पार्थिवदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. मठाची पाहणी करत असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका शिष्याचाही मृतदेह दिसला. सध्या महाराजांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आहे.
शिष्याचाही खून ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठाशेजारील जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाथरूममध्ये भगवान शिंदे यांचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पालघरमध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरूकडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
असे घडले हत्याकांड
मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास नागठाणा येथे हत्याकांड झाले. सर्वप्रथम आरोपीने शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या शिष्याची हत्या केली. त्यानंतर मठाच्या भिंतीवरून उडी मारून आरोपीने मठात प्रवेश केला. सर्व शिष्यगण मठाच्या गच्चीवर झोपलेले होते. महाराज एकटेच मठाच्या खोलीत झोपले होते. आरोपीने दार तोडून प्रवेश केला आणि महाराजाची तीक्ष्ण हत्याराने (कुऱ्हाड) हत्या केली. त्यानंतर कपाटातील ऐवज घेऊन आरोपीने महाराजांचा पार्थिवदेह महाराजांच्या गाडीमध्ये ठेवला. मात्र, गाडी काढत असताना मठाच्या गेटमध्ये गाडी अडकली. त्या आवाजाने गावकरी, शिष्यगण जागे झाले. दरम्यान ऐवज खिशात टाकून आरोपी तेथून फरार झाला.
“पालघरची पुनरावृत्ती नागठाणा बु. येथे घडल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेतील आरोपी हा गावातीलच असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. यापूर्वीही त्याने गावातील एकाचा खून केला आहे. परंतु, त्यावेळी पोलिसांनी गांभीर्य घेतले नसल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत महाराजांचा पार्थिवदेह आम्ही ताब्यात घेणार नाही.” – शिवाजी पंचलिंगे, सरपंच (नागठाणा बु.)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App