विशेष प्रतिनिधी
मुंबई , नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना जबरदस्त धक्का दिला असून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्याचे धाडस दाखविले आहे. त्याऐवजी गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, डाॅ. अजित गोपछडे हे तीन नवे ओबीसी चेहरे पुढे आणले आहेत. तसेच लोकसभेला भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही भाजपने विधानपरिषद दिली आहे. त्यामुळे पंकजा व खडसे काय करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगलेली आहे.
विधानपरिषदेच्या चार जागांची घोषणा दिल्लीतून झाली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषद द्यायची नाही, असा दिल्लीचा दंडक पहिल्यापासूनच आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, बावनकुळे यांना नक्कीच उमेदवारी दिली जाईल, असे वाटत होते. स्वतः पंकजा यांनी अर्ज भरण्याची तयारीदेखील सुरू केली होती. त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेले अर्ज चांगलेच व्हायरल झाले होते. “भाजपला चूक उमगेल आणि आपल्याला विधानपरिषद मिळेल”, असे स्वतः खडसे नेहमी बोलवून दाखवत होते. दुसरीकडे बावनकुळे यांच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत होते. पण दिल्ली नेतृत्वाने या तिघांच्या नावांवर काट मारली आणि ओबीसींचे नवे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. याशिवाय या निर्णयाने फडणवीसांच्या दिल्ली दरबारी असलेल्या वजनावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
दिल्लीचा संदेश
पडळकर हे धनगर समाजातील धडाडीची तोफ मानली जाते. त्यांना विधानसभेला बारामतीमधून अजित पवारांविरुद्ध ऐनवेळी उभे केले होते. सडकून पराभव झाला होता. त्यानंतर त्यांचे नाव राज्यसभेसाठीही सुचविले होते. पण ऐनवेळी औरंगाबादचे, वंजारी समाजाचे डाॅ. भागवत कराड यांना पक्षाने निवडले होते. त्याचवेळी पंकजा यांच्याबद्दल पाल चुकचुकली होती. प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर व तेजतर्रार युवा नेते आहेत. त्यांना फडणवीस व नितीन गडकरी या दोघांचाही आशीर्वाद असल्याचे मानले जाते.
डाॅ. गोपछडे हे नांदेडचे आहेत. ते भाजपच्या वैदयकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. चौथे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभेला भाजपमध्ये आले होते. मोहिते पाटील यांच्यामुळे माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा मतदारसंघ भाजपला जिंकता आला होता. यानिमित्ताने मोहिते पाटील घराण्याला ताकत देण्याचे काम भाजपने केले आहे. रणजितसिंहांना संधी मिळाल्यामुळे हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक या अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचा चांगलाच हिरमोड होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App