विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावाचा धोका भारत सरकारने वेळेआधीच ओळखून लॉकडाऊन केले त्यामुळे फैलावाची व्याप्ती वाढण्यास अटकाव झाला, अशी ग्वाही WHO चे विशेष दूत डॉ. डेव्हीड नाबारो यांनी दिली. लॉकडाऊनचा धाडसी निर्णय घेणाऱ्या भारत सरकारची त्यांनी प्रशंसा केली. कोरोना इतक्यात आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. अर्थात अमेरिका आणि युरोपातील सरकारांची तुलना करण्यास डॉ. नाबारो यांनी नकार दिला. लॉकडाऊनमुळे जनतेला कोरोनाचे गांभीर्य समजले. बहुसंख्य लोकांनी त्याचे अनुकरण केल्याने संसर्ग टळला. त्याच वेळी आरोग्य यंत्रणांना सतर्क करून सज्ज राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकली नाही. ती आटोक्यात राहिली, याची दखल WHO नेही घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “सरकारच्या निर्णयावर कदाचित टीका टिपण्णी झाली असेल तरी लोकांनी सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय स्वीकारला.
सरकार आणि प्रशासन व्यवस्थेने प्रामाणिकपणे आपली लॉकडाऊन मागची भूमिका लोकांच्या मनात रुजविली याचा सकारात्मक परिणाम भारतभर दिसून आला. बहुसंख्य लोकांच्या रोजगाराला फटका बसला तरी त्याची फारशी नकारात्मक प्रतिक्रिया उमटली नाही कारण| सरकारच्या पँकेज आणि थेट रक्कम जमा योजनांचा फायदाही लोकांना झाला. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवला नाही. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता असूनही त्याचे रुपांतर सामाजिक असंतोषात झाले नाही.” भारतातील लॉकडाऊन उठविण्यात आले तरी सोशल डिस्टंसिंग नियम पाळावेच लागतील. त्यातूनच कोरोनाचा फैलावाचा धोका टाळता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिका – युरोपमधील सरकारांची तुलना करण्यास नकार देऊन डॉ. नाबोरो म्हणाले, “काही देशांमध्ये कोरोनाचा धोका ओळखायला उशीर झाला. लोकांमध्ये जागरूकता आली नाही परिणामी कोरोना वेगाने पसरला. आता काही देशांमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तेथे कामाच्या प्रचंड तणावामुळे डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ देखील कोरोनाग्रस्त होतोय आणि कोरोनाचा धोका कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. आता प्रगत देशांची सरकारे ६ ते ८ आठवड्यांच्या लॉकडाऊनची भाषा बोलत आहेत. पण हे वेळीच व्हायला हवे होते.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App