सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या विनय दुबेने ११ एप्रिलरोजीच रेल्वे चालू न झाल्यास १४ एप्रिलपासून हजारो मजूर पायी चालत निघण्याची धमकी दिली होती. ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. हजारोंनी त्यास लाइक केले होते. एवढेच नव्हे, तर काही वृत्तवाहिन्यांनी त्याच्या मुलाखतीदेखील घेतल्या होत्या. एवढे असूनही पोलिसांनी त्याची का दखल घेतली नाही? सोशल मीडियावरून अफवा पसविणारया सुमारे २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे; पण दुबेने जाहीर धमक्या देऊनही त्याला पोलिसांनी वेसण का घातली नाही?
विशेष प्रतिनिधी
मुंबई, नवी दिल्ली : लाॅकडाऊन झुगारून वांद्रे येथे जमलेल्या हजारो स्थलांतरित मजूरांच्या मागे असलेला मेंदूचा पर्दापाश हळूहळू होऊ लागला आहे. त्याचे नाव आहे विनय दुबे, ज्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली!
कोण आहे विनय दुबे? आणि वांद्रे येथे गर्दी त्याने कशी जमवली? त्याचा प्लान काय होता?, असे अनेक प्रश्न पुढे उभे राहतात. दुबे या मुंबई पट्ट्यातील उत्तर भारतीयांचा स्वयंघोषित नेता. खोटी व अर्धवट माहिती दिली म्हणून एका मराठी चॅनेल्सच्या वार्ताहराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असताना, प्रत्यक्षात मात्र विनय दुबे हाच कर्ताकरविता असल्याचे स्पष्ट होत आहे. मजुरांसाठी रेल्वे गाड्या चालू केल्या जात असल्याची बातमी ‘त्या’ वृत्तवाहिनीवर १४ एप्रिलरोजी दाखविण्यात आली; पण प्रत्यक्षात या दुबेने ११ एप्रिलरोजीच फेसबुकवरून आक्रमक आवाहने चालू केली होती. “मजुरांना खाय़ला काही नाही. ना केंद्र, ना राज्य सरकार त्यांची व्यवस्था करीत आहे. १४ एप्रिलला लाॅकडाऊन उठल्यानंतर या मजुरांना आपापल्या गावी पाठविण्याची व्यवस्था करा. नाही तर ‘घर वापसी’ आंदोलन चालू करू. रेल्वेची व्यवस्था झाली नाही तर आम्ही दिल्लीप्रमाणे आमच्या गावी पायी चालत जाऊ. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधील मजुरांनी या… सरकारने अडविले तर जेलमध्ये जाऊच; पण थांबणार नाही..,” असे त्याने ११ एप्रिलरोजीच म्हटले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती.
दुबे हा सोशल मीडियावर लोकप्रिय असल्याचे दिसते आहे. त्याला फेसबुकवर २ लाख १८ हजार फाॅलोवर्स आहेत. १४ एप्रिल रोजी रेल्वे गाड्या चालू न झाल्यास हजारो मजूर पायी चालत जाण्याची धमकी त्याने दिली होती, ती वारयासारखी व्हायरल झाली होती. हजारोंनी त्यास लाइक केले होते, शेकडोंनी त्याला शेअर केले होते. एवढेच नव्हे, तर काही वृत्तवाहिन्यांनी त्याच्या मुलाखतीदेखील घेतल्या होत्या. एवढे असूनही पोलिसांनी त्याची का दखल घेतली नाही? सोशल मीडियावरून अफवा पसविणारया सुमारे २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे; पण दुबेने जाहीर धमक्या देऊनही त्याच्याकडे पोलिसांनी का दुर्लक्ष केले? असा प्रश्न पडलेला आहे.
नागमोडी राजकीय वळणे…
मूळचा उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवाशी असणारया दुबेची राजकीय कारकिर्द नागमोडी वळणांची आहे. सध्या तो नवी मुंबईत उद्योजक असला तरी त्याने २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. अर्थातच तिथे डाळ शिजली नाही. पुढे मुंबईत बस्तान बसविल्यावर त्याने उत्तर भारतीयांचे नेतृत्व हातात घेण्याची धडपड सुरू केली. पुढे तो मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संपर्कात आला. त्याने उत्तर भारतीय व मनसे यांच्यातील दरी बुजविण्यासाठी राज ठाकरे यांचा मोठा मेळावा लोकसभेच्या पूर्वी आयोजित केला होता. पुढे त्याने कल्याण लोकसभा निवडणूक मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, शिवसेना-भाजपचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध अपक्ष निवडणूक लढविली होती. कल्याणमधील सुमारे ८ लाख उत्तर भारतीयांवर त्याचा डोळा होता. पण तेव्हाही अजिबात डाळ शिजली नाही. त्यानंतर तो कधी मनसे, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशा वर्तुळात फिरत राहिला. नागरिकता कायद्याविरोधातील आंदोलनामध्येही तो सक्रिय होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका तो करीत असे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे त्याने व त्याचे वडील जटाशंकर दुबे यांनी नुकताच २५ हजार रूपयांचा निधी कोरोनागस्तांसाठी दिला होता.
दुबे याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी आयपीसीमधील ११७, १५३ अ,१८८, २६९,२७०, ५०५(२) आदी कलमांखाली व साथरोग नियंत्रण कायद्यान्वयेदेखील गुन्हा दाखल केला आहे. त्याला रात्रीच अटक झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App