मुंबईतलं भीषण वास्तव आणि मुक्या, बहिऱ्या, आंधळ्यांचं महाआघाडी सरकार


धारावीतील सहायक पोलिस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा चीनी व्हायरसबरोबरील लढाईत चटका लावणारा मृत्यू झाला आणि त्यानिमित्ताने मुंबईतील भीषण वास्तव समोर आलंय… ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे लिहिताहेत, की राज्यातलं महाआघाडीचं सरकार हे मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्यांचं सरकार असल्याची खात्री पटत चाललीय….


मित्रांनो, लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मी सातत्यानं लिहितोय की मुंबई, पुण्यात अडकलेल्या माणसांना गावाकडं जाऊ द्या. स्पष्टपणे लिहिण्याचं धाडस झालं नाही, पण आता लिहिण्याची वेळ आलीय की, सरकार कुणाच्याही जगण्याची हमी घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुंबईत करोनाचा प्रकोप वाढत चाललाय. कुणी मरणार असेल तर त्यांना मरायला तरी त्यांच्या जिवाभावाच्या माणसांत गावाकडं सोडावं मायबाप सरकारनं. परंतु महाआघाडीचं सरकार हे मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्यांचं सरकार आहे, याची खात्री पटत चाललीय.

अमोल कुलकर्णी या तरुण पोलिस अधिका-याचा करोनामुळं मृत्यू झाल्याची बातमी आपण वाचली. अमोल कुलकर्णी आमच्या शिराळ्याचे. माझा त्यांचा परिचय नव्हता, परंतु तालुक्यातला माणूस म्हणून मी काही मित्रांकडे चौकशी केली. अमोल कुलकर्णींचे पोलिस दलातले काही मित्र माझेही मित्र आहेत. त्यांच्याकडून अमोल संदर्भातील जी माहिती कळाली ती हादरवून टाकणारी आहे. मुंबईतल्या एकूण व्यवस्थेची, पोलिसांच्या दयनीय अवस्थेची आणि सरकारी यंत्रणेच्या निबरपणाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे.

‘कुणी पाच कोटी देते, कुणी पाचशे कोटी देते, पण आम्ही जीव देतो… ‘ अशी भावनात्मक लिहिणारे आणि कोरोना युद्धात बळी पडलेले धारावीतील सहायक पोलिस निरीक्षक अमोल कुलकर्णी


धारावीतल्या शाहूनगर पोलिस ठाण्यात अमोल कुलकर्णी सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सेवेत होते. तडफदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. धारावीसारख्या संवेदनशील परिसरात झोकून देऊन काम करणा-या अमोलना दहा/अकरा तारखेला ताप आला. त्यानंतर ते सायन हॉस्पिटलला गेले तर तिथं त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही घरीच क्वारंटाइन राहा. त्यांनी बारा तारखेला कोविड टेस्ट केली आणि घरीच विश्रांती घेत होते. बारा तारखेला केलेल्या टेस्टचा रिपोर्ट पंधरा तारखेला रात्री आला, तो पॉझिटिव्ह होता. (कोविड टेस्टच्या रिपोर्टसाठी चार दिवस लागतात ही यातील गंभीर बाब.)

त्याच रात्री त्यांचा त्रास वाढत गेला आणि पहाटे ते अत्यवस्थ झाले. त्यांच्या काही सहका-यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. परंतु १०८ नंबर किंवा सरकारी अँब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. अर्ध्या तासाने खासगी अँब्युलन्स उपलब्ध झाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत खेळ खल्लास झाला होता. (पोलिस अधिका-यांनाही अर्धा तास अँब्युलन्स मिळू शकली नाही.) सकाळी साडेसात वाजता त्यांना मृत घोषित केले. करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे पार्थिव देह काळ्या पिशवीत घालून शवागरात रवाना करण्यात आला. दरम्यान त्यांचे जे मृत्यू प्रमाणपत्र आले त्यावर मृत्यूचे कारण श्वसनक्रिया बंद पडणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे लिहिण्यात आले. म्हणजे करोनामुळे मृत्यू झालेल्या एका पोलिस अधिका-याच्या मृत्यू प्रमाणपत्रावर ते कारणही लिहिले नव्हते.

तिथं उपस्थित असलेल्या अमोलच्या काही मित्रांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला आक्षेप घेतला. प्रमाणपत्रात कोविड १९ चा उल्लेख करण्याची मागणी केली, तर डॉक्टर आता निघून गेले आहेत, उद्या बघू असे उत्तर देण्यात आले. अमोल कुलकर्णी ज्या शिराळ्याचे आहेत, तेथील आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे हा विषय गेल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलून घेतल्यानंतर मग सूत्रे हलली आणि मृत्यू प्रमाणपत्रात कोविड१९ चा उल्लेख करून ते बदलून देण्यात आले. म्हणजे एका पोलिस अधिका-याच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठीही संघर्ष करावा लागला. पोलिस यंत्रणा एवढी तणावाखाली आणि कामात आहे की, आपल्या एका अधिका-याचा कोविडने मृत्यू झाला असताना वरिष्ठ अधिकारी हॉस्पिटलमध्येही उपस्थित राहू शकले नाहीत. सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ अधिका-यांनी पोलिस ठाण्याला भेट देऊन आदरांजली वाहिली.

दस्तुरखुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत, पण अद्यापही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रूग्णांची चौकशी करायला, डाॅक्टर- नर्सेसच्या खांद्यावर शाबासकीची थाप टाकायला आणि यंत्रणा सुरळीत करण्यासाठी अद्याप घराबाहेर पडलेले नाहीत.


अमोल यांच्यामागे पत्नी आणि लहान मुलगी आहे. त्यांची टेस्ट आता केली आहे, त्याचा रिपोर्ट काय येतोय याची चिंता नातलग आणि मित्रपरिवाराला आहे.

कोविड पॉझिटिव्ह व्यक्तिवर अंत्यसंस्कार महापालिकेची यंत्रणाच करीत असते. गावाकडून अमोल यांचे कुणी नातलग येऊ शकले नाहीत. अमोलच्याच एका बॅचमेट मित्राने त्याला अखेरची सलामी दिली आणि एक कोविड योद्धा अनंतात विलीन झाला.

मित्रांनो, अत्यंत जबाबदारीच्या पदावर असलेल्या, मोठ्या यंत्रणेचा भाग असलेल्या एका तरुण अधिका-याची ही कहाणी. कोविड योद्धा, कोविड योद्धा म्हणून नुसता शाब्दिक गौरव होत असतो, परंतु या योद्ध्याच्या वाट्याला प्रत्यक्षात काय येते याचं हे प्रातिनिधिक चित्र आहे. एका पोलिस अधिका-याची ही अवस्था आहे, तर ज्याची कुठंच ओळख पाळख नाही अशा सामान्य माणसांचा इथं कुठं आणि कसा निभाव लागणार? गड्या आपुला गाव बरा म्हणून माणसं रणरणत्या उन्हात उपाशीपोटी बि-हाड पाठीवर टाकून गावाकडं धावत सुटलेत ते उगाच नाही! आता तुम्हीच ठरवा आपल्या माणसांना मुंबईतच राहा म्हणायचं, की गावाकडं या म्हणून प्रेमानं हाक द्यायची ते!

(सौजन्य : फेसबुक)

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात