विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील उपाययोजनांच्या मुंबई मॉडेलचे आयसीएमआर आणि निती आयोगाने कौतुक केले असून ते देशभरात वापरले जाणार असल्याच्या दाव्याचा निती आयोगाने स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. उलट मुंबईची स्थिती ही आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना दुसरीकडे ठाकरे सरकार मात्र बनवाबनवी करण्यात व्यस्त आहे.
निती आयोग आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त बैठकीत मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचे अधिकारी सहभागी झाले होते. त्या बैठकीत निती आयोग आणि आयसीएमआरने मुंबई मॉडेलचे कौतुक केले असून ते देशभरात राबविले जाणार असल्याचा दावा करणारे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रासह काही खासगी वृत्तवाहिन्यांनीदेखील प्रसिद्ध केले होते. त्याचा हवाला देत ठाकरे सरकार कोरोनाविरोधात प्रभावी उपाययोजना करीत असल्याचा भ्रम पसरविण्यात येत होता. कारण प्रत्यक्षात मुंबईमधील स्थिती अतिशय भयावह आहे.
पीआरगिरीवर ठाकरे सरकारचा भर ?
कोरोना संकटाच्या काळात ठाकरे सरकार प्रतिमानिर्मितीसाठी धडपड करीत असून त्यासाठी खासगी पीआर कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वीदेखील ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वारेमाप कौतुक करणारे ट्विट्स करण्याचा सपाटा सिनेकलावंतांनही लावला होता. तसे टिवट्स एका विशिष्ट पीआर कंपनीने करवून घेतल्याचेही आरोप त्यावेळी झाले होते. त्यामुळे ठाकरे सरकारचा सर्व भर पीआरगिरीवरच आहे की काय, अशी शंका निर्माण होते.
इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, मोबाईल फिव्हर क्लिनिक, खासगी डॉक्टर्सचा समावेश, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णखाटांवर विशेष लक्ष, घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आदींचा आयसीएमआरवर मोठा प्रभाव पडल्याचे सांगण्यात आले होते. झोपडपट्टी परिसरात मुंबई महापालिकेने स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने हजारो लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यामुळे आयसीएमआर अतिशय प्रभावी झाल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्याच्या हवल्याने बातमीत करण्यात आला होता.
आणि सत्य काहीतरी वेगळेच…
निती आयोगाने मात्र इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्ताचा साफ इन्कार करून ठाकरे सरकारच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निती आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे खुलासा करीत म्हटले, सदर वृत्त हे चुकीचे आहे. निती आयोग अथवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबईच्या कोरोनाविरोधातील उपाययोजनांते कौतुक केले आहे, असे भासवण्याचा सदर वृत्तातून प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये होणारी मोठी वाढ हा आमच्यासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. असे निती आयोगाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more