विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या दरांचा लाभ घेत भारताने ३ कोटी २० लाख टन तेलसाठा करून ठेवला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. भारताच्या एकूण गरजेच्या २०% एवढ्या प्रमाणात हा साठा आहे.
तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत होत्याच. त्यात कोविड १९ संकट आल्याने जगभर लॉकडाऊन झाले त्यामुळे तेलाची मागणी अभूतपूर्व घसरली. ऊर्जा आणि इंधन क्षेत्रात अशी परिस्थिती नजीकच्या इतिहासात जगाने कधीच अनुभवली नव्हती. अमेरिकेत तर तेलाच्या किमती उणे झाल्या.
या परिस्थितीचा लाभ घेत केंद्र सरकारने संपूर्ण देशाच्या गरजेचा तेलसाठा भरून घेण्याचा एप्रिलमध्ये निर्णय घेतला. साधारण महिनाभरात देशाच्या एकूण साठवण क्षमतेचा साठा भरला गेला. सौदी अरेबिया, युएई, इराक या देशांकडून तेल आयात करण्यात आले.
मेंगलोर, पडूर आणि विशाखापट्टणम येथील जमिनीखाली बांधण्यात आलेल्या दगडी खाणींमध्ये (५.३३ दशलक्ष टन) तेलसाठा करण्याबरोबरच समुद्रावरील सर्व तेल टँकर (७० लाख टन) तेलसाठा करण्यात आला आहे. याखेरीज देशभरातील तेल शुद्धीकरण केंद्रे, जमिनीवरील तेल टँकर, तेल वाहिन्या, साठवणूक टाक्या, तेल डेपो येथे देखील सुमारे २ कोटी ५० लाख टन तेलसाठा करवून ठेवण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात चढ उतार झाल्याचा फटका कमी बसावा म्हणून भारताने ५.३३ दशलक्ष टन एवढी साठवण क्षमता पूर्वीच तयार केली आहे. संपूर्ण देशाला सामान्य परिस्थितीत साडे नऊ दिवस पुरेल एवढी तेलसाठ्याची क्षमता आहे. या तुलनेत आता भारताकडे एेतिहासिक कमी किमतीत ३ कोटी २० लाख टन एवढा तेलसाठा करण्यात आला आहे.
या खेरीज इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना तसेच मेंगलोर रिफायनरीला आखाती देशातून आताच तेल आयात करण्यास सांगण्यात आले आहे. या बिलाचा परतावा केंद्र सरकार नंतर देणार आहे.
भारताला गरजेच्या ८५% तेल आयात करावे लागते. तेलाच्या आयातीचे बिल भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा ताण मानला जाते. या पार्श्वभूमीवर तेलसाठा करण्याच्या भारताच्या निर्णयाकडे पाहिले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App