BJP – Congress : दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लागलीये एकमेकांना “फॉलो” करण्याची स्पर्धा!!


भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लागलीये एकमेकांना “फॉलो” करण्याची स्पर्धा!!, हे शीर्षक वाचून कोणाला काही तरी “गडबड” वाटेल… पण नाही… ही खरंच आजची राजकीय वस्तुस्थिती आहे. The two national parties compete to “follow” each other

भाजपला “पूर्वीची” काँग्रेस व्हायचे आहे!!, तर काँग्रेसला “सध्याचे” भाजप मॉडेल फॉलो करायचे आहे!!

आता हे कसे होणार किंवा कसे करणार??, तर या दोन्ही पक्षांकडे आपापले फॉर्म्युले आहेत. भाजपला “पूर्वीची” काँग्रेस व्हायचे आहे म्हणजे भाजपला आपला संघटनात्मक विस्तार पंडित नेहरू – इंदिरा गांधींच्या काळातील काँग्रेस एवढा करायचा आहे किंबहुना त्यापेक्षा जास्त विस्ताराचा भाजपचा मनसूबा आहे, तर सध्याच्या काँग्रेसला “सध्याच्या” भाजपचे पार्लमेंटरी बोर्डाचे मॉडेल “फॉलो” करायचे आहे!!

– उदयपूर चिंतन शिबिरातील नवनीत

राजस्थानातील उदयपूर चिंतन शिबिरातील मंथनातून हे “राजकीय नवनीत” बाहेर आले आहे. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी पक्षानेच नेमलेल्या नेत्यांच्या समित्यांनी जे फॉर्म्युले सुचवले आहेत, त्यामध्ये काँग्रेसने राष्ट्रीय प्रश्नांवर भूमिका ठरवण्यासाठी एक पार्लमेंटरी बोर्ड नेमावे आणि त्या पार्लमेंटरी बोर्डाने सर्व काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा एका फॉर्म्युलात व्यक्त केली आहे. आता हा फॉर्म्युला जर चिंतन शिबिरात संमत झाला, तर ते भाजपचे राजकीय फॉलोइंग ठरणार आहे.

– पार्लमेंटरी बोर्डात घराणेशाही नाही

भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही. केंद्रीय पातळीवर घराणेशाहीचा प्रश्नच नाही. भाजपमध्ये 12 जणांचे पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णयासाठी नेमले आहे. धोरण निश्चिती पासून तिकीट वाटपापर्यंत सर्व गोष्टी हे पार्लमेंटरी बोर्डच अंतिमतः ठरवत असते.

– काँग्रेस वरचा ठप्पा टाळायचाय पण…

काँग्रेसला सध्या नेमके हेच मॉडेल फॉलो करावेसे वाटत आहे. त्यातून काँग्रेसला घराणेशाही ठप्पा टाळायचा आहे. आता हे शक्य होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल. कारण काँग्रेसने “चिंतन चतुराई” दाखवत घराणेशाहीच्या मुद्द्यातून गांधी परिवाराला वगळले आहे. गांधी परिवार सोडून इतर परिवारांना निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत अटी-शर्ती लादल्या आहेत. पण तो देखील एक प्रकारे पक्षांतर्गत प्रश्न आहे.

– काँग्रेससाठी खरा उपयुक्त मॉडेल

पण त्यापलिकडे जाऊन खरंच काँग्रेसमध्ये पार्लमेंटरी बोर्ड अस्तित्वात आले, तर राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांवर काँग्रेसला स्वतःची एक सुसंगत भूमिका घेता येईल, की जी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात ते स्वतःच हायकमांड असल्याने घेत असत!!
मग भले आता काँग्रेसला भाजपचे मॉडेल फॉलो करायचे असेल, पण ते काँग्रेससाठी खरंच मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरू शकते ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.

– भाजपचे नेहरू – इंदिरा फॉलोईंग

आता भाजपला पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेस व्हायचे आहे, म्हणजे नेमके काय??, तर त्यांना त्या काळात जशी काँग्रेस संघटना तळागाळापर्यंत पोहोचली होती. गावागावांमध्ये काँग्रेसचे झेंडे बुलंद होते, तशा पातळीपर्यंत भाजपची संघटना पोचवायची आहे. किंबहुना प्रत्येक घराघरापर्यंत आणि व्यक्तीपर्यंत भाजप संघटना पोहोचवायची आहे. ही मोदी – शहा यांच्या भाजपची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीने भाजप सध्या पावले देखील टाकत आहे. बूथ प्रमुख पन्ना प्रमुख हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. जास्तीत जास्त बुध मजबुतीकरण आणि पन्ना मजबुतीकरण यावर सध्या भाजप भर देतो आहे.

– 73000 बुथवर लक्ष केंद्रित

सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशाच्या 9 राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. या राज्यांमधील 73000 बुथवर जिथे भाजपला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले, त्या बुथवर राजकीयदृष्ट्या लक्ष केंद्रित करण्याचा अमित शहा यांच्या दौऱ्याचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर्वेकडची आणि दक्षिणेकडची राज्ये यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये भाजपचे संघटन पश्चिमेकडच्या आणि उत्तरेकडच्या राज्यांपेक्षा कमकुवत आहे, हे हे सांगायला फार मोठ्या राजकीय तज्ञाची गरज नाही.

– पूर्व – दक्षिणेकडे विस्तार

त्यामुळेच पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमधल्या भाजपचा संघटनात्मक उणीव दूर करून 2024 च्या निवडणुकीपर्यंत भाजप संघटनात्मक पातळीवर संपूर्ण देशभरात सर्वदूर पोहोचवण्याची जबरदस्त तयारी भाजपने चालविली आहे. याचाच अर्थ सध्याच्या भाजपला “पूर्वीची” काँग्रेस व्हायचे आहे. या अर्थाने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांना “फॉलो” करण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत, हे स्पष्ट होते!!

The two national parties compete to “follow” each other

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”