नितीश कुमार – देवेगौडा : समाजवादी साथी गाती, पंतप्रधान पदाची आरती!!


नितीश कुमारांनी फेटाळली शक्यता; पण त्याच मुहूर्तावर देवेगौडांना “आठवले” जनता दलाचे 3 पंतप्रधान!! Socialist leaders always aimed at prime ministership, but always remain dependent on Congress support


विनायक ढेरे

बिहारमध्ये भाजपची साथ सोडून लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथीने बिहारच्या मुख्यमंत्री पदाची आठव्यांदा शपथ घेताना नितीश कुमार यांनी आपली पंतप्रधान पदाची राजकीय महत्त्वाकांक्षा फेटाळून लावली, पण त्याच मुहूर्तावर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना जनता दलाच्या ऐक्याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला आणि वयाच्या 89 व्या वर्षी एकीकृत जनता दलाचे 3 पंतप्रधान त्यांना आठवले… इतकेच नाही तर देवेगोडा “भविष्यवेत्ते” देखील झाले. जनता दलाने जसे भूतकाळात देशाला 3 पंतप्रधान दिले, तसाच भविष्यात देखील जनता दलाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे ते बेंगलोरमध्ये म्हणाले!!

फूट हे समाजवाद्यांचे वैशिष्ट्य

कोणतीही एखादी राजकीय छोटी घटना घडली की महत्त्वाकांक्षेचे असे धुमारे फुटतच असतात. त्याचबरोबर समाजवादी मनोवृत्तीच्या नेत्यांचे हे वैशिष्ट्यच आहे, की ते स्थानिक पातळीवर किती ताकदवान असोत किंवा नसोत त्यांच्या छोट्या यशात देखील ते “राष्ट्रीय” पातळीवरचे यश पाहत असतात!! समाजवाद्यांमध्ये फूट पडते तेव्हा आणि समाजवादी एकत्र येतात तेव्हा त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा “राष्ट्रीयच” असते.

अगदी 1950 – 60 च्या दशकात मूळच्या समाजवादी पक्षातून संयुक्त समाजवादी पक्ष आणि समाजवादी प्रजा समाजवादी पक्ष असे 2 पक्ष फुटले तेव्हा देखील दोन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षा “राष्ट्रीयच” होत्या. राजकीय अस्तित्व मात्र काही प्रदेशात पुरते मर्यादित होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांना 1950 – 60 च्या दशकात लोकसभेच्याच्या निवडणुकीत 30 पेक्षा जास्त जागा मिळू शकल्या नाहीत. अगदी सगळे समाजवादी एकत्र होते तेव्हा देखील लोकसभेतली पन्नाशी या समाजवाद्यांना गाठता आलेली नाही. हा इतिहास आहे.

नेते राष्ट्रीय, अल्पयश प्रादेशिक

पण डॉ. राम मनोहर लोहिया आचार्य नरेंद्र देव, एस. एम. जोशी ना. ग. गोरे, मधु लिमये यांच्यासारखे नेते राष्ट्रीय पातळीवरचे असल्यामुळे समाजवादी पक्ष फुटलेल्या किंवा एकीकृत अवस्थेत कायम राष्ट्रीय पातळीवर चर्चेचाच राहिला होता, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना कम्युनिस्टांचे अस्तित्व पश्चिम बंगाल केरळ पुरते मर्यादित असल्याने आणि भारतीय जनसंघाचे अस्तित्व मध्य प्रांतात मर्यादित राहिल्याने खऱ्या अर्थाने सत्ताधारी काँग्रेसला संपूर्ण देशपातळीवर विरोध करणारा राजकीय घटक हा फुटलेल्या किंवा एकीकृत कोणत्याही अवस्थेतला समाजवाद्यांचाच होता, ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही.

काँग्रेस नेत्यांशिवाय यश नाही

पण मुद्दा त्या पलिकडचा राजकीय यशाचा आणि त्यातही लोकसभा विधानसभा निवडणुकीतील संख्यात्मक मोजमापाचा येतो तेव्हा मात्र समाजवादी कायम “पराभूत” याच कॅटेगरीत राहिले होते ही वस्तुस्थिती देखील स्वीकारली पाहिजे. जोपर्यंत समाजवाद्यांना काँग्रेसच्या नेत्याचा “राजकीय स्पर्श” होत नसे, तोपर्यंत समाजवाद्यांना संख्यात्मक पातळीवर लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.


नितीश यांनी एनडीए सोडल्यानंतर पी. चिदंबरम यांचा भाजपवर हल्लाबोल, ट्विटरवरून केली टीका


मोरारजी देसाई आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे दोन माजी पंतप्रधान त्याची ठळक उदाहरणे आहेत. मोरारजी देसाई 1969 मध्ये काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाशी टक्कर घेतली आणि 1977 मध्ये जनता पक्षाच्या सरकारचे ते पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारमध्ये मधु दंडवते, साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे समाजवादी नेते महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रीपदावर होते. ना. ग. गोरे केंद्रीय मंत्री नव्हते, तर त्यांना भारताचे ब्रिटन मधील हाय कमिशनर नेमले होते.

विश्वनाथ प्रताप सिंग

1990 च्या दशकात विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेस मधून बाहेर पडले त्यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले. एका बाजूला उभरता भाजप आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट अशा टेकूच्या आधारावर ते पंतप्रधान बनले. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात देखील मधु दंडवते, रवी रे, जॉर्ज फर्नांडिस, मुलायम सिंग यादव यांच्यासारखे समाजवादी महत्त्वाच्या मंत्रिपदावर होते.

देवेगौडा, गुजराल

जी गोष्ट मोरारजी देसाई आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांची तीच गोष्ट स्वतः एच. डी. देवेगौडा इंद्रकुमार गुजराल यांची काँग्रेसच्या टेकू शिवाय हे दोन्ही नेते पंतप्रधानपदाचे स्वप्नही पाहू शकले नाहीत, त्या पदावरचे राजकीय अस्तित्व तर सोडाच. सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या पाठिंब्यावर देवेगौडा आणि गुजरात यांचे पंतप्रधानपद अवलंबून होते. केसरींनी आपल्या राजकीय वकुबानुसार या दोन्ही नेत्यांना पंतप्रधान पदावर “खेळवले”!! मूळच्या समाजवाद्यांची ही राजकीय अवस्था आहे!!

नितीश कुमार यांची समाजवादी परंपरा

नितीश कुमार याच परंपरेतल्या समाजवाद्यांचे बिहारचे नेते आहेत. देवेगौडा यांना नितीश कुमार + लालूप्रसाद यादव यांच्या बिहार मधल्या ताज्या युतीमुळे जनता दलाचे 3 पंतप्रधान आठवले असतील, तरी हे तीनही पंतप्रधान स्वबळावर अथवा आपल्या राजकीय प्रतिभेवर पंतप्रधान झालेले नव्हते. तर ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. नंतर राजकीय जुगाडातून ते पंतप्रधान बनले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात समाजवादी नेते बड्या मंत्री पदांवर होते ही वस्तुस्थिती आहे.

नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टकरीत 2024 मध्ये कसे उभे राहतील?? त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल?? खरं म्हणजे नितीश कुमार हे 2024 मध्ये मोदींचे स्पर्धक असतील की त्यांनी भाजपची साथ सोडून विरोधकांच्याच पंतप्रधानपदाच्या स्पर्धकांमध्ये भर घातली आहे?? हे लवकरच सिद्ध होईल!!कारण आजची 11 ऑगस्ट 2022 रोजीची राजकीय वस्तुस्थिती पाहिली, तर नितेश कुमार हे मोदींचे पंतप्रधान पदाचे एकमेव स्पर्धक नाहीत. रांगेत त्यांच्या आधी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान पदाचे कायमचे स्पर्धक शरद पवार हे आहेत. त्यामुळे देवेगौडांनी जनता दलाच्या 3 पंतप्रधानांचे स्मरणरंजन करायला हरकत नाही… राजकीय वस्तुस्थिती मात्र बरेच काही वेगळं सांगते आहे!!

Socialist leaders always aimed at prime ministership, but always remain dependent on Congress support

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात