वाढदिवस ठरला उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वा”च्या ब्रँडिंगचा दिवस…!!

विनायक ढेरे

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीवर बोलून चिकित्सा करण्यापेक्षा आणि त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यापेक्षा त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचे” ब्रँडिंग करण्याचाच ठरला. Shiv Sena leaders for branding Uddhav Thackeray’s national leadership

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी त्याची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी शरद पवारांनाही बेमालूमपणे सामिल करून घेतले. हे दोन नेते आघाडीवर आहेत हे पाहून शिवसेनेचे अन्य नेतेही मागे राहिलेले दिसले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका सुद्धा सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचेच” ब्रँडिंग केले.

संजय राऊत यांनी सकाळीच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे लवकरच राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करतील तो दिवस दूर नाही, असे ट्विट केले. वर त्यामध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळचे काही व्हिडिओ शेअर केले. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने कसे स्वीकारले आहे आणि त्यांच्यात राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व करण्याची कशी मोठी क्षमता आहे, याचे “बढ चढ कर” वर्णन संजय राऊत यांनी केले.

त्यानंतर दुपारी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाबद्दल संजय राऊत यांनी जे ट्विट केले त्याविषयी प्रश्न विचारला. तो अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वसंबंधीचा” होता त्याला उत्तर देणे पवारांना भाग होते. त्यानुसार पवारांनी उत्तर दिले की त्यांना जर महाराष्ट्रातला कोणीही नेता पुढे येऊन राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करू शकत असेल आणि त्यांना पाठिंबा मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे.एवढे उत्तर देऊन पवारांनी पुढचा प्रश्न घेतला यात पवारांनी उद्धव ठाकरे यांना सदिच्छा दे देतानाच “पाठिंबा मिळत असेल तर” अशी “जर तरची” भाषा वापरून घेतली. यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय इशाराही देऊन टाकला. यात पवारांची अपरिहार्यता दिसलीच पण वेळ मारून नेण्याची कसबही दिसले.

शिवसेनेचे दुसरे खासदार राहुल शेवाळे यांनी तर लेख लिहून उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचे” ब्रॅण्डिंग केले. उद्धव ठाकरे “बेस्ट सीएम” आहेत असे मध्यंतरी काही सर्वे प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी देखील तिरकस उत्तर देऊन “मग उद्धव ठाकरेंना पंतप्रधानच करा ना…”, असे विधान केले होते. वास्तविक हे तिरकस उत्तर उद्धव ठाकरेंवरील टीका होती. परंतु ही टीका खुबीने सकारात्मक रीतीने बदलून राहुल शेवाळे यांनी, जणूकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तबच केले आहे असा आव आणून लिखाण केले आहे.

अर्थात ते काहीही असले तरी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरी विषयी लिहिण्यापेक्षा त्यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वावरच” शिक्कामोर्तब करण्यात आणि तसे ब्रँडिंग करण्यात धन्यता मानल्याचे आज दिसून आले.

शिवाय या सगळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्याची ही अनाहूतपणे जोड लाभली. ममता स्वतःच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे ब्रँडिंग करण्यासाठी दिल्लीत आल्या आहेत. विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा त्यांचा गंभीर प्रयत्न आहे अशावेळी मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या “राष्ट्रीय नेतृत्वाचे” ब्रँडिंग करणे याचा अर्थ ममता बॅनर्जी यांना देखील त्यांचे राष्ट्रीय नेतृत्व उभे राहण्यापूर्वी त्यांच्यासमोर राजकीय आव्हानच उभे करणे असाही निघू शकतो. आणि यामध्ये कदाचित शरद पवारांनाही “विशेष रस” असू शकतो.

Shiv Sena leaders for branding Uddhav Thackeray’s national leadership

महत्त्वाच्या बातम्या