विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसल्याच्या ठाकरे आणि पवारांच्या पोकळ गप्पा, पण प्रत्यक्षात आपल्या पक्षासाठी 2 – 4 जागा जास्त वाढवून मागण्यासाठी काँग्रेस हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीच्या चकरा मारण्याची वेळ काँग्रेसने आणली आहे. Uddhav thackeray and sharad pawar have to run to New Delhi for seat sharing talks
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जागावाटप महाराष्ट्रातले काँग्रेस नेते सोडवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही थेट दिल्लीशीच बोलतो, अशी भूमिका ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मांडली. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे शरद पवारांसकट दिल्लीला जाऊन सोनिया गांधींना भेटणार आणि महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा तिढा सोडवणार अशी बातमी आली.
एरवी महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही आणि झुकणार नाही असे लिहून सामनाचे शेकडो रकाने भरले गेले. शरद पवारांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर “महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नाही हा इतिहास आहे,” असे लिहून झाले. पण प्रत्यक्षात जागा वाटपाचा तिढा सोडवायला मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोनिया गांधींच्याच दारात म्हणजे दिल्लीला जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.
शिवसेनेने 23 आणि काँग्रेसने 22 जागांवर लढण्याची तयारी केल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातल्या 48 पैकी फक्त 3 जागा लढायला उरल्या. आता उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एवढ्या कमी म्हणजे 3 जागांवरच त्यांची बोळवण करणार नाही, हे खरे पण शरद पवारांना या दोघांनी तिसऱ्या क्रमांकावर ढकलून ठेवले ही देखील वस्तुस्थिती आहे. पण आपल्या जागा वाढवून घेण्यासाठी पवारांना सोनियांच्या घरी जावे लागणार आहे ही जास्त बोचणारी वस्तूस्थिती आहे.
एरवी शरद पवारांचे अनुयायी पवार खूप मोठे बलाढ्य “राष्ट्रीय” नेते आहेत, असे सांगत असतात. ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पवारांच्या वयानुसार त्यांना मानही देतात, पण प्रत्यक्ष निवडणूक आणि राजकीय व्यवहाराची वेळ आली की फणा काढून पवारांना प्रत्यक्षात त्यांची महाराष्ट्रातील राजकीय जागा महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकाची आहेत हे दाखवून देतात, हा इतिहास आणि वर्तमान आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेने 23 आणि काँग्रेसने 22 जागा लढवण्याची तयारी करून पवारांना नेमकी त्यांची तिसऱ्या क्रमांकाची जागा दाखवून दिली आहे आणि आता विशिष्ट तडजोड करण्यासाठी ठाकरे आणि पवार दिल्ली गाठणार असल्याची बातमी आली आहे.
ठाकरे आणि पवार महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना गिनत नाहीत. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते त्यांना आपल्या स्वतःच्या तुलनेत “छोटे” वाटतात त्यामुळे आपल्या पक्षांचे “स्वबळ” वाढवण्यासाठी ते थेट दिल्लीशी म्हणजेच काँग्रेस हायकमांडशी वाटाघाटी करतात. पण म्हणून ठाकरे आणि पवारांना 2 – 4 जागा वाढवून देण्यापेक्षा दुसरा कोणताच निर्णय काँग्रेस हायकमांड घेत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे, तो इतिहास पुन्हा 2024 च्या जागा वाटपात रिपीट होण्याची दाट शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App